? मनमंजुषेतून ?

☆ लोककथा ७८ ☆ सुलू साबणे – जोशी ☆

“लोककथा ७८” 

शोषितांच्या व्यथा मांडणारं – एका घटनेवर आधारित – “लोककथा ७८” हे श्री.रत्नाकर मतकरी लिखित नाटक ‘बालगंधर्व रंगमंदिरा ‘त होणार होतं. मी आणि अशोक डेक्कन जिमखाना बस-स्टँडवर उतरून ‘बालगंधर्व’ कडे चालत निघालो.  रंगमंदिराच्या बरंचसं अलिकडेपासून भिकार लोकं ठिकठिकाणी अर्धेउघडे, कळकट, हातात गाठोडी, अलमिनची भगोली, काठ्याबिठ्या असं किडुकमिडुक सामान घेऊन – खूप चालून आल्यावर दमून अंग टाकतात, तशी दिसू लागली. असे पोटासाठी भटकत फिरणारे तांडे दिसायचे/ दिसतातही अजून अधूनमधून ! तर ही माणसे पार रंगमंदिरांतसुद्धा आडवारलेली दिसली. त्यांचं अवतीभंवती लक्षच नव्हतं. तेवढं त्राणही त्यांच्या अंगात दिसत नव्हतं. समजेचना काही. अशा राजरस्त्याला असा तांडा कधी थांबत नाही. हे लोक कसे, मोकळ्या जागेत, तेही पाणवठ्याकाठी, पण एकत्र दिसत. मनात आलं, यांना कुणी हटकलं कसं नाही? एकीकडे त्यांची अवस्था बघवत नव्हती. पहिली घंटा झाली. आम्ही अस्वस्थ मनाने आत जाऊन बसलो. तिसरी घंटा झाली, पडदा सरकत गेला— आणि मागच्या दारांमधून हे सर्व ‘भिकार’ लोक  आवाज न करता प्रेक्षकांतून चालत रंगमंचावर पोहोचले– आणि नाट्यप्रयोग सुरू झाला. प्रयोग तर  जीवघेणा सुंदर झाला. संपल्यावर सर्व प्रेक्षागृह खिन्नमनस्क,  सुन्नमनस्क अवस्थेत बुडून गेलं होतं. लेखक मतकरींनी दिग्दर्शनातही बाजी मारली होती. या नाट्यप्रयोगाने ठराविक साचा मोडला, रंगमंच आणि प्रेक्षागृहातल्या अदृष्य भिंती नष्ट केल्या– आणि हे नाटक अंगावरच आलं. मनाचा ठाव घेऊन ‘गेलं’, असं म्हणणार नाही, पण ते तिथं ठाव मांडून बसलंय, हे इतक्या वर्षांनीसुद्धा जाणवतं आहे – अशा वयांत, जेव्हा नावं, संदर्भ, सगळं सगळं पुसट होऊ लागतं – तेव्हा श्री. मतकरी आपल्याला किती विविध गोष्टींशी कायमचे जोडून गेलेत आणि आपल्या जाणिवा आणि आयुष्य समृद्ध करून गेलेत, हे लक्षांत घेऊन नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली !!!

 

— सुलू साबणे – जोशी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments