डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
दर वर्षी अमेरिकेचा दौरा होतोच. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीच्या शाळेला सुट्टी असली तरी मुलीला जावयाला ऑफिस असतेच. मग मी नातीला बघायला, तिची शाळा सुरू होईपर्यंत USA मुक्कामी असते.
ते दिवस मोठे सुंदर असतात. उन्हाळा सुरू झालेला, पण उबदार उन्हाळा. झाडे नव्याने हळूहळू छान फुलून येतात.
एकदा फिरताना मुलीच्या कम्युनिटीमध्ये काही घरांसमोर निळे फुगे लावलेले दिसले. कुतूहलाने विचारले, ” हे कसले ग फुगे?”
मुलगी म्हणाली, ” अग पुढच्या आठवड्यात गराज सेल आहे ना–त्याची खूण आहे, की लोकांना समजावे–इथे आहेत सेलच्या वस्तू.”
मी हरखून गेले आणि म्हटले, ” अदिती मला केव्हाचा बघायचाय ग हा सेल. खूप ऐकलंय याविषयी.”
अदिती हसायलाच लागली. म्हणाली, ” आई, मागच्या खेपेला वृद्धाश्रम बघून झाला. आता या वेळी गराज सेल ? ”
” हो, अनायसे आलेच आहे, तर नेच मला. “
ती कबूल झाली. छोट्या आद्याला जावयाने सांभाळायचे कबूल केले आणि त्या रविवारी आम्ही गराज सेल बघायला निघालो.
तिच्या कम्युनिटीत जवळजवळ आठशे बंगले आहेत. आम्ही कारने जिथे फुगे दिसतील तेथे थांबत होतो—प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित सामान लावले होते–गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाच्या गराजमध्ये आणि समोरही खूप जागा असते. तिथे नको असलेले सामान ठेवले होते. समोर खुर्ची टाकून मालक किंवा मालकीण बाई बसल्या होत्या. किती प्रकारचे सामान हो।
मुलांची खेळणी-अगदी नवी चकचकीत असावी अशी, पुस्तके, क्रोकरी, काय नव्हते तिथे ? अगदी फ्रीज-टी.व्ही. सुद्धा बघितले. मला इतकी मजा वाटत होती.
हा सेल शनिवार-रविवार असतो. त्यासाठी आधी कम्युनिटीची नाममात्र फी भरावी लागते, मगच ते विशिष्ठ फुगे देतात. दोन्ही दिवस ९ ते १ पर्यंत वेळ असते. १ वाजता सेल बंद होतो.
खूप लोक या सेलमधून संसारोपयोगी वस्तू घेतात. कोणीही मोडके तोडके असे काहीही ठेवत नाही. आणि अगदी नाममात्र किमतीत हे मिळते.
उद्देश फक्त एकच —आपल्या वस्तू हलवणे, ज्यांचा आता घरमालकाला उपयोग नसतो. मुले मोठी झाली की खेळणी पडून राहतात. मोठा tv घ्यायचा तर आधीचा कुठे ठेवणार? आपल्या इकडच्यासारखा exchange तिकडे नाही.
अशीच फिरताना मला माझ्या खूप आवडत्या, सिडने शेल्डनची कोरी पुस्तके दिसली. मोठे खोके भरून बाहेर ठेवली होती. केवढा आनंद झाला सांगू—लेक म्हणाली,” बाई ग ही सगळी घेणारेस की काय ? बॅगेचे वजन माहीत आहे ना ?”
मी सरळ खाली वाकून ती बघू लागले. किंमत फक्त 1 डॉलर लिहिली होती. मला इतका आनंद झाला. जवळ आरामखुर्चीवर एक खूप म्हाताऱ्या बाई विणत बसल्या होत्या.
मी त्यांना ‘ हलो ‘ म्हटले आणि विचारले,” बघू ना ही मी पुस्तके?”
त्या म्हणाल्या ,” बघ की. कुठून आलीस ? इंडियातून का ? ” मी ‘ हो ‘म्हटले. माझ्या खांद्याला लोकरीची विणलेली सुंदर स्लिंग बॅग होती–माझ्या आईने विणलेली. त्यांनी ती बघितली आणि म्हणाल्या, ” मी ही बॅग बघू का ?”
मी म्हटले, ” हो,बघा ना. माझ्या आईने विणलीय. तिला खूप हौस आहे विणायची. तुमच्या एवढीच आहे ती आता. “
त्या हसल्या आणि म्हणाल्या, “ मी ८९ वर्षाची आहे. माझ्या मुलाचे हे घर आहे. तोही आता ६५ वर्षाचा आहे. कोण कोणाला सांभाळणार ? मी आपली वृद्धाश्रमात राहते. इकडे अशीच पद्धत आहे. तेच बरेही पडते. चांगला आहे मी राहते तो वृद्धाश्रम. “
त्यांनी माझी स्लिंग बॅग नीट बघितली– “ छानच विणली आहे “ म्हणाल्या.
मी पटकन ती रिकामी केली. अदितीच्या purse मध्ये माझे सामान टाकले आणि त्यांना म्हणाले, “ घ्या ही तुम्हाला .नवीनच आहे हं. मी इकडे येणार म्हणून आईने नवीन विणून दिली.” त्या खूप संकोचल्या.. ‘नको नको. मी सहजच म्हटले अगदी.’ असं म्हणत राहिल्या.
“ पण तुम्हालाही आवडते ना विणायला, म्हणून देतेय,”
त्या खुश झाल्या. म्हणाल्या “ थँक्स डिअर. आता मी अगदी अशाच विणून माझ्या वृद्धाश्रमातल्या मैत्रिणींना देईन.: मला सांग, तू इकडे का आली आहेस ? “
“ ही माझी मुलगी. तिला छोटी मुलगी आहे ४ वर्षाची. तिला सुट्टीमध्ये सांभाळायला मी आलेय.”
“ थांब हं जरा “ असं म्हणत त्या तुरुतुरु आत गेल्या आणि एक भलेमोठ्ठे टेडी बेअर घेऊन आल्या. अदितीच्या हातात देऊन म्हणाल्या, “ नवीनच आहे हं हे. माझा नातू मोठा झाला त्याचे आहे. घे तुझ्या बेबीला. खेळेल ती याच्याशी. याचे नाव ब्लु बेरी आहे बरं का–माझ्या नातवाने ठेवलंय ते. “
आम्ही संकोचलो आणि म्हणालो, “ नको हो. उगीच कशाला ? “
पण त्यांनी ते परत घेतले नाही. उलट म्हणाल्या, ”तुझ्या आईला सांग, खूप छान विणतात त्या. मला एक गोड गिफ्ट मिळाली इंडियातून–थँक् यू सो मच–हे कसे म्हणतात तुमच्या भाषेत?”
मी म्हटले,” आभारी आहे “
त्या म्हणाल्या, “ आईला सांग आभारी आहे “
आम्ही त्यांचा निरोप घेतला. अदितीने त्यांचा फोन नंबर घेतलाच होता.
म्हणाल्या,” कधी जमले तर ये ग मला भेटायला आईला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात. “
आम्ही घरी आलो. आद्याने टेडी बघताक्षणीच कडेवर घेतले. त्याचे नाव विचारले.आणि त्या ब्लु बेरीशी जी काय दोस्ती तिने केली की विचारू नका. २४ तास ते तिच्या बरोबर।–अगदी
झोपताना जेवतानासुद्धा.
मी भारतात परत आले. एकदा फोनवर बोलताना अदिति म्हणाली,
“ आई,त्या जेनी आजी गेल्या ग. मी त्यांना भेटायला गेले होते एकदा तेव्हा तुझी चौकशी करत होत्या. झोपेतच गेल्या म्हणे. त्यांच्या मुलाने कळवले मला. “
–मला वाईट वाटले. त्यानंतर जेव्हा केव्हा मी गराज सेल बघते, तेव्हा त्या गोड, निळे डोळे असलेल्या, पांढरेशुभ्र कापसासारखे केस असलेल्या, बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जेनी आजीची आठवण येते.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈