सुश्री उषा जनार्दन ढगे

? मनमंजुषेतून ?

☆ पदर ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

रविवार होता त्या दिवशी, मी प्रथमच पाहिले होते त्यांना..

त्या घरात प्रवेश करीत होत्या..आबांसोबत विवेक व विलासदादांसोबत..

पहायला आल्या होत्या त्या आमच्या बिंबाला–अदबीनं सावरत होत्या त्या– 

डोईवरला तो आपला पदर..!

 

मग पसंती..शकुनाची देणी-घेणी..वाडःनिश्चय-विवाहाची बोलणी

संबंधित नातेवाईकांची यादी– मी पाहिलं डोळ्यांच्या कडेनं,

जराशा झटक्यानंच लगबगीनं ओढून घेतला होता—

माईंनी तेव्हाही आपला पदर..!

 

नंतर आमंत्रणं..लगीनघाई–मिरवल्या होत्या मनसोक्त

थोरल्या लेकाच्या लग्नात..ठसक्यात,सासूबाईंच्या तोर्‍यात..

आठवणीत राहिला झळाळणारा—

तो रुंद काठाचा जरतारी पदर..!

 

ढग्यांची बिंबा आता राधिका झाली–

राधिका राधिका म्हणून माईंच्या सावलीत वावरू लागली..

मग सासूरवाशीणीला जवळचा,आधाराचा वाटला होता तो

माईंचाच…मायेचा पदर..!

 

अमळनेरच्या भल्या मोठ्या घरात–घर कसलं हो–चिरेबंदी वाडाच तो..

माणसांचा रगाडा..होता दबदबा–होते नोकर-चाकर फार–कधी शेतकामाचा भार

कामे वाटून सांगतांना..सूचना-सल्ले देतांना–खोचलेला असायचा

कमरेला तो माईंचा पदर..!

 

मग कधी समारंभ–पूजा-अर्चा..लग्न सोहळे–प्रसंगोत्तर माई भेटत..

दरवेळी वयाची बेरीज होतांना दिसलेल्या–काहीशा पाठीत झुकत चाललेल्या..

पण माईंच्या डोक्यावर डौलात दिसायचा मात्र..

तो सोनेरी भरजरी पदर..!

 

माईंच्या घट्ट बांध्याला, मोहक हसर्‍या गौरवर्णी रुपाला..

खानदानी घरंदाज व्यक्तिमत्वात भर घालणारा साजेसाच होता,

नेहमीच त्यांच्या डोईवरला तो पदर..!

 

लेका-बाळांच्या,सुना-नातवंडांच्या अखंड स्मरणात राहील

तो हरवलेला……तरीही ममतेचा वात्सल्याचा जिव्हाळ्याचा

माईंचा तोच मायेचा ऊबदार पदर..!!!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments