सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ खानदेशी पाहुणाचार… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खानदेशी  पाहुणचार !

दरवर्षी हा थंडीचा सीझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात  आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर  येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.

सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिशकालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता  येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले. बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता.  दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती.  त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरतीला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.

एक दीड वर्षाचा कालावधी, पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारीची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे. इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत. बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!

रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडूच्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे ! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू  होती.  ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे. केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.

माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी  लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या  आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई  भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक  शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे. असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं !

त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई. उकाडा खूप ! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती. ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादरचे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या ! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे ! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या. उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक  खाऊ घालत!

सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.

तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच ! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या ! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्याझाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी  मला दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले !

खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपीक होता. शिरपूर जवळ ‘ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम  आहे.’ प्रती काशी ‘ म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला !

गव्हाची  शेती खूपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली ! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा  होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती.  दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच ! माझी कामवाली सखी- लता, प्रत्येक पिक्चर बघून  यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची !तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूरचा  तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूरची खास तुरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड,सांडग्यांचे कालवण,डाल बाटी, तऱ्हेतऱ्हेची लोणची ,खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते ! तिथले तीनही ऋतू अनुभवले ! उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा ! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो. पण अजूनही शिरपूरचा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोकगीतातून  दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि  तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्यरूप होऊन डोळ्यासमोर आले ! इतक्या वर्षांनंतरही शिरपूरचे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments