? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 1 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा, २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना रंगमंचावर साकारल्या. आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं  वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या ‘आवाजात’ सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर ‘मुलाखत’ द्यायला फारसे उत्सुक नसत. त्यामागे त्यांचं  लॉजिकल कारण होतं. ते म्हणत, ‘आम्ही बनवतो काय, तर शेतात चालणारी इंजिनं. त्यांच्या आवाजातून ‘किर्लोस्कर’च बोलत असतात. वेगळं कशाला बोलायचं?’ पण चरित्रकार सविता भावे यांच्यामुळे माझी थेट शंतनुरावांशी भेट झाली. ‘लकाकी’ या पुण्याच्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्यावर हिरवळीवर दोन खुर्च्या समोरासमोर टाकून आम्ही मुलाखतीसाठी बसलो. पण ते त्यांच्या स्वभावानुसार खुलत नव्हते. त्यांचा एक वीकपॉइंट मला माहीत होता. त्यांना जगभरचे ‘ऑपेरे’ खूप आवडत. ‘ऑपेरा शो’ दाखवायला आणि तो कसा पाहावा, हे शिकवायला शंतनुरावांना आवडत असे. ते मुलाखतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीयत, हे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘बाबा, मुलाखत राहू दे बाजूला. तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का हो !’’ ते एकदम खुलले. हिरवळीवरून ते मला आत बंगल्यात घेऊन गेले. दृकश्राव्य पडद्याची व्यवस्था केली आणि मला सिडनीचा ऑपेरा दाखवायला खुशीत सुरुवात केली. ते मूडमध्ये आले आहेत, हे ध्यानात घेऊन माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मी मनातले नियोजित प्रश्न, ऑपेरा पाहता पाहता, त्यांना विचारत गेलो. ते उत्तरं देत गेले. मी खूश. मुलाखतीच्या साफ नकाराकडून वीकपॉइंट काढताच, खुलून सगळी उत्तरं त्यांच्याकडून काढून घेतली. या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत असताना, किर्लोस्कर साहेबांनी मला पुन्हा बोलावलं आणि म्हणाले, ‘‘माझा वीकपॉइंट काढून, माझ्याकडून साऱ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली, हे मला कळलंच नाही असं समजू नका. तुमचा अ‍ॅप्रोच आवडला म्हणून उत्तर दिलं. पुन्हा असं कुणाला गृहीत मात्र धरू नका.’’ माझ्यासाठी हा धडाच होता.

प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा अशा पडद्याआडच्या गोष्टीच या विविध क्षेत्रांतल्या अनेक मुलाखतींमधून शिकत गेलो. समोरच्याचा अंदाज, आवाका बांधण्याइतपत ही माणसं हुशार असल्यानेच, आपल्या क्षेत्रात क्रमांक एकच्या पदावर असतात, हे या ‘दृष्टीआडच्या सृष्टी’चा अनुभव घेताना मला कळत गेलं. गायकांच्या मुलाखती, गाण्यांचे कार्यक्रमही मी खूप केले. श्रेष्ठ गायकांच्या गाण्याचा आनंद तर मिळालाच, पण दौऱ्यांमध्ये गायक-गायिकांचा सहवास घडला. व्यक्तित्त्वाचे पदर उलगडले. गाण्यापलीकडचे पैलूही उलगडले..

पं. भीमसेन जोशीसाहेबांच्या ‘संतवाणी’ कार्यक्रमाचं ‘निरूपण’ मी काही काळ करत होतो. त्या काळी रात्री दहा वाजता कार्यक्रम थांबवण्याचं बंधन नव्हतं. पंडितजी मंडईमागच्या बांबूआळीत रस्त्यावर एकदा ‘संतवाणी’ सादर करत होते. रात्री दीड वाजता मैफल संपली. रस्ता निर्मनुष्य झाला. वादकांनी वाद्य मिटवली. बुवांनी मांडीवरची शाल काढली. आम्ही उठणार, एवढय़ात त्या उत्तररात्री निर्मनुष्य रस्त्यावरून एक हमाल गुरुजींकडे आला. बुवा त्याला म्हणाले, ‘ काय आवडलं का गाणं? ’ यावर तो वृद्ध हमाल उत्तरला, ‘‘आवडलं. पण ते ‘जो भजे..’ घ्यायला हवं होते.’’ यावर भीमसेनबुवा म्हणाले, ‘‘अस्सं. बरं..’’ त्यांनी पुन्हा वाद्यं लावायला लावली आणि मध्यरात्री पावणेदोन वाजता, त्या एकटय़ा हमालासाठी ‘जो भजे..’ म्हटलं. मला आजही त्या वृद्ध हमालाचे कृतज्ञतेने पाणावलेले डोळे आठवतात. अशा गोष्टींमुळेच, ‘भीमसेनअण्णा’ हे बंदिस्त मैफलीतल्या जाणकाराइतकेच, रस्त्यावरच्या कष्टकऱ्याच्या मनात रुजले. असे अनेक प्रसंग मनात घट्ट रुतून आहेत.

क्रमशः ….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments