मनमंजुषेतून
☆ बोलता बोलता भाग 2 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆
१९९९ मध्ये सॅनहोजेजवळ (अमेरिकेत) बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मी आदल्या रात्री माधुरी दीक्षितची पाच हजार रसिकांसमोर प्रकट मुलाखत घेतली आणि पाठोपाठ दुसऱ्या दिवशी त्याच व्यासपीठावर आशा भोसले यांच्याशी गप्पा आणि त्यांचं गाणं होतं. कार्यक्रम सुरू करत असताना, अचानक आशाताई माझ्या दंडाला धरून स्टेजपुढे नेत, प्रेक्षकांना म्हणाल्या, ‘काल यानं (सुधीरनं) तुमच्या डोळ्यांना आनंद दिला. आज मी तुमच्या ‘कानांना’ आनंद देणार आहे.’ नमनालाच तुफान हशा. आशाताईंची उत्तम गाण्यापलीकडची ही बोलण्यातली उत्स्फूर्तता ‘शो’ रंगणार याची ग्वाहीच देऊन गेली.
ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार मुंबईचा बाडबिस्तारा गुंडाळून, पुण्याच्या बाणेर रस्त्यावर, सर्जा हॉटेलच्या पुढच्या बाजूला एका कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. एकटय़ाच होत्या. मी गप्पा मारायला गेलो. त्यांचं एकाकीपण पाहून मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, ‘‘बाई, लोकांच्या वयाची होत नाहीत एवढी वर्षे, म्हणजे साठ वर्षे तुमची अभिनय करण्यात गेली. कॅमेरा.. टेक टू.. स्टार्ट.. असं इतकी वर्षे सातत्याने ऐकत आलात. इथे या फ्लॅटमध्ये एकटं मूक बसून राहण्यानं तुम्हाला गुदमरल्यासारखं होत नाही का? त्यावर ललिताबाई हसत म्हणाल्या, ‘‘अरे इथे मी दांडीवर कपडा वाळत घालते, स्वयंपाक करते, तेव्हा या घरात माझ्यापाठी कॅमेराच लागलाय, असं मी समजते. हा स्वयंपाकघराचा सेट लागलाय, असंच गृहीत धरते. मनाच्या या खेळामुळे मी इथेही शूटिंगच्या-कॅमेऱ्याच्या जगापासून दूर गेलेलेच नसते. म्हणून इथंही एकटी रमते.’’ दुर्दैवानं त्याच फ्लॅटमध्ये त्या गेल्या, पण तीन दिवस कुणालाही त्याचा पत्ता लागला नव्हता.
एका चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन होतं. पु. ल. देशपांडे आणि बासुदा प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन सोहळ्याच्या नमनाला आयोजक आगाऊपणे म्हणाले की, प्रदर्शन चित्रकलेचं आहे. पण यातला एक पाहुणा सिनेमातला, एक नाटकातला. दोघांनी कधी हाती ब्रश धरलेला नसेल. त्याचं वाक्य ऐकताक्षणी, पुलं प्रेक्षकांकडे बघत, हातात ब्रश धरून दाढी करत असल्याची अॅक्शन घेत, उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हे काय रोज ब्रश हाती धरतो की.’’ हशा उसळला आणि नमनाचं आगाऊ बोलणाऱ्याचा चेहरा उतरला. पुढची कडी म्हणजे त्या तिथे पुलंनी भाषण करण्याऐवजी हाती ब्रश घेऊन, समोरच्या बोर्डावरच्या कोऱ्या कागदावर, तीन मिनिटांत, चार फटकारे मारत ‘महात्मा गांधी’ चितारले. टाळ्यांचा कडकडाट झाला. वर म्हणतात कसे? ‘‘मित्रहो, मी काही चित्रकार नाही. शिकलेलो नाही. तेव्हा चित्र चुकलं तरी कुणी नाव ठेवू नये, म्हणून मुद्दामच ‘गांधी’ चितारले.’’ पुन्हा हशा. माझं भाग्य असं की, त्या समारंभात नंतर बोलायला मी होतो म्हणून, ‘गांधीं’चं ते चित्र त्यांनी मला जाण्यापूर्वी भेट दिलं. १९७८ मध्ये ‘पुलं’नी काढलेले ते ‘महात्मा गांधी’ माझ्या दर्शनी हॉलमधल्या भिंतीवर आजही आहेत.
‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ चित्रपटाच्या सेटवर आम्हा त्या काळच्या चित्रपट स्तंभलेखकांना दादा कोंडके यांनी कुटुंबीयांसह सेटवर आमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. सेटवर माझ्या बायकोची मी दादांना ओळख करून देत होतो. म्हटलं, ‘ दादा, ही माझी बायको ’. माझा शब्द संपताक्षणी, दादा म्हणाले, ‘आयला, मग काल कोण होत्या?’ सेटवर हशा. असंख्य मुलाखतीतून भल्याभल्यांना निरुत्तर करणाऱ्या माझीच ‘बोलती’ दादांनी ‘बंद’ करून टाकली होती.
पुण्यात वानवडीला अपंग साहाय्यकारी संस्थेच्या कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम भाषणाला उभे राहिले. मी निवेदक होतो. राष्ट्रपती- प्रोटोकॉलनुसार मी त्यांच्या विरुद्ध बाजूला एक पायरी खाली उभा होतो. कलामसाहेबांनी भाषण सुरू करण्यापूर्वी अचानक मला जवळ बोलावले. माझी ओळखही नाही. मला कळेना का बोलावतायत. मला म्हणाले, ‘‘ही अपंग मुलं पाहून मला एक कविता सुचतीय. भाषणापूर्वी मी कविता म्हणणार आहे. तुम्ही इथेच शेजारी उभं राहून ती ऐका. आणि लगेच तिचं मराठीत भाषांतर करा.’’ त्यांनी कविता म्हटली. मी भावानुवाद केला. म्हणजे ‘चिल्ड्रेन्स ऑफ गॉड’ला ‘परमेश्वराची मुलं’ नं म्हणता ‘ईश्वराची लेकरं’ असा अनुवाद ऐकवला. टाळ्या पडल्या. त्यामुळे कलामसाहेबांना वाटलं आपली कविता नीट पोहोचली. त्यामुळे भाषण संपल्यावर त्यांनी मला पुन्हा बोलावलं. प्रोटोकॉल बाजूला ठेवून, मला घेऊन स्टेजखाली उतरले. सिक्युरिटीला दोन खुर्च्या शेजारी ठेवायला सांगितल्या. मला म्हणाले, ‘‘बसा आणि त्या अपंग मुलांना पुढय़ात बोलवा. त्यांना सांगा की, आजोबांना काहीही प्रश्न विचारा. मुलं जे विचारतील ते मला इंग्रजीत सांगा आणि मी जी उत्तर देईन, ती मुलांना मराठीत ऐकवा.’’ पडद्यामागे घडलेल्या पण प्रेक्षकांच्या पुढय़ात प्रत्यक्षात आलेल्या या घटनेमुळे प्रोटोकॉल बाजूला सारून मला कलामसाहेबांसारख्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसून, राष्ट्रपती आणि अपंग मुलं यांच्यात ‘दुभाषी’ म्हणून काम करण्याचं भाग्य मिळालं.
© श्री सुधीर गाडगीळ
पत्रकार, निवेदक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈