मनमंजुषेतून
☆ बोलता बोलता भाग 3 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆
दृष्टीआडच्या अशा असंख्य कहाण्या मी अनुभवल्या आहेत. साऱ्याच सांगणं वर्तमानपत्राच्या मर्यादेत शक्य नाही. पुस्तकंच होतील, कारण राजकारण, सिनेमा, साहित्य, नाटक, खेळ, सामाजिक क्षेत्र, गायक-संगीतकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, इतिहासकार, अशा सुमारे तीन-साडेतीन हजार व्यक्तींच्या प्रकट वा कॅमेऱ्यापुढे मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आजही वीज न वापरता अंधारात राहून पंधरा-वीस विद्यार्थिनींना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका सानेबाईंपासून, बिझिनेस समजून देणाऱ्या रस्त्यावरच्या भंगारवालीपर्यंत अनेक ‘मुद्रा’ मी ‘बोलक्या’ केलेल्या आहेत. पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षं झाली तेव्हा २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना मी रंगमंचावर साकारल्या आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या आवाजात, सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.
नोकरी सोडून देऊन हे आगळं करिअर करायला उद्युक्त करणारी माझी पत्नी शैला ऊर्फ अनघा या गौरवसोहळ्यांच्या वेळी या जगातच नव्हती, एवढीच खेदाची बाब ! पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आताचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मी, दोघेही मध्यमवर्गीय घरातले– आम्ही दोघांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता, एकाच दिवशी नोकरी सोडली. तेव्हा संपादकीय नोकरीचा राजीनामा देऊन घरी आल्यावर माझी पत्नी अनघा ऊर्फ शैला मला म्हणाली होती, ‘‘ बरं झालं नोकरी सोडलीत. तुमचा तो पिंडच नाही. आता मनाप्रमाणे कलेचं करिअर करा. जर काही आर्थिक अडचण आली तर आपण आपल्या गरजा कमी करू.’’ एखाद्या बाईनं ‘गरजा’ कमी करू म्हणून प्रोत्साहित करणं फारच मोलाचं होतं. मिळालेल्या यशामागे, कुटुंबाची साथ, मित्रांचं पाठबळ, जोडलेल्या माणसांचं सहकार्य, एकाच वेळी पहाटे बातम्या देणं, दुपारी जाहिरातींची भाषांतरं करणं, संध्याकाळी ‘दूरदर्शन’वर नव्या संकल्पनांतून कार्यक्रम करणं (अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर यांच्या साथीनं) रात्री गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला जाणं, असं व्यस्त वेळापत्रक अखंड, न कुरकुरता, न आळस करता केलं हा भाग आहेच. सतत माणसांना भेटणं, माणसांचं वाचन आणि पुस्तकांचं वाचन यातून सतर्कता कायम ठेवत, पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे मिळालेल्या दिशेतून संदर्भ साहित्याचा साठा जमा करत, तो स्मरणात ठेवत, क्वचित उत्स्फूर्तपणातून विनोद साधत, वातावरण जिवंत ठेवत, असंख्य कार्यक्रम रंगवू शकलोय. उत्स्फूर्त गंमत सहज सुचत नाही. त्यासाठी उत्तम वक्त्यांच्या शब्दखेळीचे ऐकण्याचे संस्कार व्हावे लागतात. बाळशास्त्री हरदास, आफळेबुवा, कोल्हटकरबुवा यांच्या प्रवचन-कीर्तनातून, दत्तो वामन पोतदार ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्यांच्या उत्स्फूर्त बोलीतून, ऐकता ऐकता बोलीभाषेचे नि उत्स्फूर्त शैलीचे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झालेले दत्तो वामन पोतदार एका सायंकाळी साहित्य परिषदेत व्याख्यानाला आले. ते बोलायला उभे राहणार, एवढय़ात शेजारी बसलेले कथाकार श्री. ज. जोशी त्यांना म्हणाले, ‘‘दादा, आज तरी तुम्ही शिवचरित्र कधी लिहिणार ते सांगून टाका.’’ दत्तो वामन उपरणं सरसावत उभे राहिले, म्हणाले, ‘‘मी विद्यापीठातून निवृत्त झालो. मोकळा होतो. काही तरी बरं ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो, पण काहीही नवं ऐकायला मिळालं नाही. आता बोलणार तर जोशीबुवांनी शिवचरित्राचे वक्तव्य केले. मी त्यांना सांगू इच्छितो की, जोशीबुवा, शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कथा-कादंबरी लिहिण्याइतकं सोप्पं नाही. त्यासाठी चिंतन लागतं. विचार लागतो.. वेळ लागतो..’’ अशा बौद्धिक जुगलबंदी ऐकल्याने, मी बोलण्याचा व्यवसाय सुरू केल्यावर, वाटेला जाणाऱ्यांना अपमान होऊ न देता, शब्दातून टोलवत ‘दाद’ मिळवू शकलो.
© श्री सुधीर गाडगीळ
पत्रकार, निवेदक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈