? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

मुळात मुंबईचं राजकारण- सिनेमा- जाहिरातींचं विश्व मला जवळून अनुभवता आलं ते एका वेगळ्याच साप्ताहिकामुळे. आज बऱ्याच नव्या पत्रकारांना ते साप्ताहिक माहीतही नसेल. ते साप्ताहिक म्हणजे ‘तेजस्वी’. चौगुले आणि किर्लोस्कर या दोन उद्योगपतींनी निर्मिलेले. विविध दैनिकांतून ज्येष्ठ नामवंत पत्रकार (सुमारे चाळीस) या नव्या साप्ताहिकांत रुजू झालेले होते.

 किर्लोस्करांचे जनसंपर्क अधिकारी नारायण पुराणिक सूत्रधार संपादक होते. ‘इंडिया टुडे’ येण्यापूर्वीच तसं वृत्त- साप्ताहिक मराठीत आणण्याचा हा ‘तेजस्वी’ प्रयत्न होता. त्याचं ऑफिस पुण्यात मोदी बागेत होतं. मला आठवतंय, त्या वेळी राजकारणाची जाण असलेल्या वरुणराज भिडेला पुराणिकांकडे इंटरव्ह्य़ूला घेऊन मीच गेलो होतो. त्या ‘तेजस्वी’चा मुंबई मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी त्या माझ्या उमेदवारी काळात नेमणूक झाली होती. माझी निवड होण्याचं कारण फक्त मी मुंबईत जायला तयार असणं एवढंच होतं. त्यावेळी मी उल्हास पवारांच्या जुन्या आमदार निवासातल्या रुम नं. ६०२ मध्ये बऱ्याचदा असायचो. मधू शेटय़े, गोगल मला त्या वेळी खूप मदत करत. पदच असं होतं की, वसंतराव नाईक, अंतुलेंसह सर्व राजकीय नेते, उद्योजक तर सहजतेनं भेटत. मला आठवतंय की, वडखळ नाकाप्रकरणी बॅ. ए.आर.अंतुले, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद नवलकर, मृणाल गोरे यांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या. १९७१-७२ सालातले सारे ‘तेजस्वी’चे अंक माझ्याकडे आहेत.

मुलाखतींच्या राज्यातही अनेक गमती घडल्या आहेत. मी आणि वरुण भिडे ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ स्कीमखाली कॉलेजात शिकत असतानाच्या काळात रेस्टॉरंट नसलेल्या ‘श्रेयस’ हॉटेलात अटलबिहारी वाजपेयीसाहेबांबरोबर सहज गप्पा झाल्यात. तर राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक मुलाखती बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याबरोबर झाल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ षण्मुखानंद हॉलमध्ये दीदींच्या उपस्थितीत बाळासाहेब शेवटचे भेटले. ७, सफदरजंग रोड, दिल्ली या प्रमोद महाजनांच्या तत्कालीन निवासस्थानी सलग सात तास चित्रबद्ध केलेली महाजनांची मुलाखत शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं. राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांनी आपलं पद- ग्लॅमर विसरून मुक्त गप्पा मारल्या आहेत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांशी पुस्तकांवर त्यांच्या निवृत्ती काळात चतु:शृंगी पायथ्याशी बोललोय तर पृथ्वीराज बाबांशी अगदी अलीकडे सॅटर्डे क्लबमध्ये धावत्या गर्दीत बोललोय. हे दोन ‘चव्हाण’ आणि कन्नमवार सोडल्यास वसंतराव नाईक ते देवेन्द्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमारजी तर आमच्या कट्टय़ावरच्या गप्पाष्टकातही सहभागी झालेत.

नवी गाडी ‘मनोहर’ साप्ताहिकाच्या कचेरीत दाखवायला आलेला आणि बिनधास्त बोलणारा ‘नामदेव ढसाळ’ तर त्या काळात दोस्तच झाला होता. आळंदीच्या साहित्य संमेलनात अक्षरश: रस्त्यावरच्या धुळीत बसून, दया पवार मुक्तपणे जीवन कहाणी ऐकवताना मी एकटय़ाने अनुभवले आहेत. नितीन गडकरी- गोपीनाथ मुंडे यांनी खासगी विमान प्रवासातही स्टुडिओत बसल्याप्रमाणे सहज मुलाखती दिलेल्या आहेत.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments