सुश्री सुनिता गद्रे
मनमंजुषेतून
☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(हिंदीभाषिकांकडून ” आपकी हिंदी बहूत अच्छी है “असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.) इथून पुढे —–
सुरुवाती सुरुवातीला उत्तर भारतीयांच्या शब्दप्रयोगाचं मला खूप हसू यायचं. त्यातले मुख्य म्हणजे स् वर्ण प्रथम असलेली जोडाक्षरे. एकदा श्रीराम सेंटरला एक हिंदी नाटक पाहायला आम्ही गेलो होतो. हिंदीतले खूप नामवंत कलाकार त्यात होते. एक असाच गंभीर प्रसंग त्यात चालला होता…. आणि नायक नायिकेला एका मोठ्या संवादात,” मैं पुरुष हूँ और तुम एक इस्त्री हो”…असे जेव्हा म्हणाला,तेव्हा एकदम मला जोरात आलेल्या हसण्याच्या आवाजानं आजूबाजूचे, मागचे पुढचे लोक माझ्याकडं रागानं बघू लागले होते.
खूप जण हल्ली जाणीवपूर्वक स्कूल, स्टेशन असं म्हणायला लागलेत. पण बरेच जण अजून इस्कूल, इस्टेशन असेही म्हणणारे आढळतात. कोणी कोणी अनावधानाने बोलून पण जातात—
” सुनिता वो राईस इस्पून (भातवाढी)जरा इधर देना.” माझी एक उच्चशिक्षित मैत्रिण मला म्हणाली होती—-“ माझा एका विद्यार्थी इस्कूल म्हणायचा. माझे खूप प्रयत्न करून झाले पण काही उपयोग झाला नाही. मग एकदा मी त्याच्या आईला ते सांगितले. तर ती म्हणाली ” मुझे कहाँ बोलना आता है जो उसको आएगा. फिर भी मैंने उसको बताया है कि बेटा,सकूल या अस्कूल बोला करो।” कपाळावर हात मारून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.
मोठे मोठे सुशिक्षित नेते सुद्धा भाषण करताना…’ देश में महिलाओं का जीवन अस्तर हमें उपर उठाना है…’ अशा तर्हेची वाक्ये बोलून जातात। हे जरा तरी ठीक आहे. पण ‘ देश को हम अस्थायी किंवा अस्थिर सरकार देंगे, किंवा यह मेरा अस्पष्ट मत है।’ असं म्हणत असतात तेव्हा त्याचा एकदम विरुध्द अर्थ होतो, याची त्यांना जाणीवही नसते.
‘स ‘च्या ठिकाणी ‘श’ आणि ‘श’च्या ‘स’ हे तर पहाडी, बिहारी,पूर्व यु.पी.तल्या लोकांत नॉर्मलच असतं. तो थोडा अर्धमागधीचा प्रभाव पण म्हणता येईल. पण बिहारी लोक ‘ हम हूँ ना ‘ ..’मैं नरभसा गई’ (मी नर्व्हस झाले ),हमारा भिलेज (व्हिलेज ),अशा तऱ्हेने बोलतात, नंतर मला त्याही शब्दांचे अर्थ चांगले कळू लागले. तोंडात रोशेर गोला भरून बोलणारी माझी बंगाली मैत्रीण ‘’आज शोपिंग के लिए कोमला नगर मत जाना.आज वहाँ बोंद है.” किंवा अशा तऱ्हेचं काही बोलली तर त्यावर हसणं मी बंद केलं.
आठ कोसावर भाषा बदलते म्हणतात. ते तर खरे आहेच. पण थोड्याथोड्या कालांतरानेही भाषा बदलते. पूर्वी अंकल, आंटी, सर, मॅडम यापुढे ‘जी’ लावायची जी पद्धत होती, ती आता बंद झालीय. एकदा माझी आई दिल्लीला माझ्याकडे आली होती. मी एका वयस्कर ऑंटीबरोबर फोनवर बोलत होते…आणि माझं हाँजी,हाँजी चालू होतं.( जिथे साधारणपणे मराठी हो,हो- हो, बर,बरंय असं बोललं जातं.) ” तू इतरांची किती हांजी- हांजी करतेस गं “हे माझ्या आईचे बोलणे ऐकून मला खूप हसू कोसळेले होते.
एकेकाळी बहू शब्दाचा अर्थ आजच्यासारखा सून असा होत नव्हता. तर तो होता ‘ब्याहता.’ वह शर्मा,वर्मा, गुप्ता कोई भी… उनके खानदान की,घरकी ब्याहता…मतलब बहू. और नरेश की बहू, रामलाल की बहू, मतलब सून नाही तर…उसकी पत्नी. पण काळाच्या ओघात ती आता सूनच ! काळाबरोबर भाषा बदलते याचे हे एक उदाहरण.
आता तर दिल्लीची भाषा हिंदी ऐवजी हिंग्लिश झालीय.
दरवर्षी हिंदी दिवस साजरा करताना ‘हिंदी को बढावा दो’ असे सगळ्या साहित्यिकांना, विचारवंतांना कळकळीने सांगावे लागतेय.
पण हेही खरे आहे की, बोली भाषा बदलत गेली की त्यानुसार साहित्यिक भाषाही हळूहळू बदलत जाणारच.ती जिवंत भाषेची खूण आहे. बदलणे हा निसर्गाचा आणि सजीवांचाही नियमच आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी विचारपूर्वक बदल स्वीकारणे हेच प्रासंगिक आहे.
* समाप्त *
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈