डॉ अभिजीत सोनवणे
@doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-4 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली ! ) इथून पुढे —-
मी कुराण वाचलं नाही….
मला पवित्र गीता वाचायला जमलं नाही….
मी बायबल सुद्धा वाचलं नाही….
गुरु ग्रंथसाहिब माझ्यापासून खूप दूर होते, मी तीथपर्यंत पोचूच शकलो नाही….
माझ्यासारख्या नालायकाला, ज्ञानेश्वरी काय कळणार ? म्हणून मी ज्ञानेश्वरीला हात सुद्धा लावला नाही…. …!
पण मी माणसांची वेदना वाचत गेलो, त्यांची सहवेदना होत गेलो…. आणि हे वाचता वाचता, मी त्यांची संवेदना झालो… !
या तिघांचीही मी समवेदना झालो !!!
यातल्या ज्या माझ्या बंधूला डोळ्यांना दिसत नाही, तो आश्रमात जाताना मला म्हणाला, ‘सर, माजी एक शेवटची विच्छा आहे…. पुरवाल का ?’
मी म्हणालो, ‘अरे हो, का नाही? बोल ना…!’
मला वाटलं होतं, तो खाण्याच्या पिण्याच्या किंवा इतर आणखी कोणत्या गोष्टीबाबत बोलेल….
पण, तो म्हणाला, ‘ज्या आबिजित सोनवने नावाच्या मानसानं माझ्यासाटी इतकं केलं, त्या आबिजित सोनवनेचा मला येकदा चेहरा पाहायचा आहे… कसा दाकवाल सर ?’
त्याच्या या वाक्याने मला गहिवरून आलं…. !
काय बोलू मी यावर ?
त्याला मी म्हणालो, ‘तुला पूर्वी दिसत होतं ना …? तेव्हा तू स्वतःला आरशात पाहत असशील, तेव्हा तुझा चेहरा कसा दिसतो हे तुला माहित असेल ना …? बरोबर…?
‘हां बरोबर सर….! ‘
‘अरे मग मी तुझ्यासारखाच दिसतो… आपण दोघेही सेम टू सेम आहोत… आपण जुळ्या भावांप्रमाणेच आहोत रे दिसायला राजा…. !
‘खरंच सर…?’ असं म्हणत तो भाबडा जीव, त्याच्या अंध काठीशी, मुठीने चाळवाचाळव करत आनंदला होता… !
अवकाशात बघत तो स्वतःचा हरवलेला चेहरा आठवत असावा….
‘आपून दोगे दिसायला सारकेच आहोत काय …?
भारीच की सर…. म्हंजे मी आबिजित सारखा …. आणि आबिजित माझ्यासारकाच आहे का ? .. भारीच की सर….
पिच्चर मदी दाकवतात तसं….
तुमचा डुप्लिकेट मी, माजा डुप्लिकेट तुमी…. आयला, भारीच की सर….!
दोन शरीरं….. पण आपलं मन आणि तोंडावळा येकच …. व्हय ना सर ??? ‘
होय रे होय, मित्रा आपण एकच आहोत….!
ज्ञानेश्वरी न वाचताही “अद्वैत” ही संकल्पना आज मला त्याने समजावली होती… !
“तो” आणि “मी” आम्ही दोघेही एक झालो होतो…. !
हे तिघे….!
यातील ज्याला दिसत नाही, तो माझ्या वयाचा ….
दुसरे बाबा ज्यांच्या पायात किडे होते, ते माझ्या वडिलांच्या वयाचे….
आणि तिसरे बाबा, ज्यांना Paralysis आहे ते माझ्या आजोबांच्या वयाचे….
तीन पिढ्यांमधील हे तीन प्रतिनिधी…. !
यातल्या एकाला आई-वडिलांनी सोडलंय…
दुसऱ्याला मुलांनी घराबाहेर काढलंय…
आणि तिसऱ्याला नातवाने टाकून दिलंय…. !
आपण कुठे चाललो आहोत आणि कशासाठी ?
नाती न टिकणं, यामध्ये मीपणा आडवा येतो…. माघार कोणी घ्यायची…. ???
कधीकधी स्वतःचा प्रकाश चंद्राला देऊन
काळोखी रात होऊन जगावं….
कधीतरी स्वतःचा उजेड दिव्याला देऊन
नुसती वात होऊन पहावं…
नाती टिकवण्यासाठी माघार घेण्यात लाज कशाची ?
कधी कधी आपणच शिंपी व्हावं आणि तुटलेलं एखादं नातं जोडून द्यावं…
वायरमन होऊन आपणच कधीतरी दोन तूटलेल्या
तारांचं मिलन घडवावं…
माळी होऊन कधी तरी रडणाऱ्याच्या हाती
फुल द्यावं…
दुसऱ्याच्या वेदना समजून घेत
गुणगुणनारं आपणच एक हृदय व्हावं…
पण, नेमकं इथेच कुठेतरी काहीतरी चुकतं आणि नाती तुटतात – फाटतात आणि लोक रस्त्यावर येतात… !
क्रमशः….
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈