??

☆ सौंदर्य… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, ‘ मुझे कभी ब्यूटिफुल बननाही नहीं था, क्यों की मैं हमेशासे जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरताको मेन्टेन करती हूँ। ’

फार साध्या सोप्या ओळी आहेत की, ‘ मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.’ – आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं? आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.

जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला, हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो. पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे. सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे. आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे. प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता. आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता. नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता. आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमता राहिलं आहे. मी म्हणजे कॅमेरा तोंडावर असेपर्यंत झळकणारी नटी नाही. हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. पुरुषांना काय आवडेल, याचा विचार करून स्वत:ला घडवू नका. पुरुषी नजरेतून स्वत:चं सौंदर्य तोलणं म्हणजे स्त्रीत्वाचं अध:पतन करवून घेणं. पुरुषांना उद्दीपित करण्याचं साधन म्हणून आपण किती काळ जगणार आहोत?

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहू या. तुम्ही जशा जन्माला आल्या आहात त्याच सुंदर आहात, ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकलं तर दुसऱ्या सौंदर्याकरिता दुसऱ्या कुणाच्या पावतीची गरज पडणार नाही.

© प्राचार्य डॉ. पुष्प तायडे

वर्धा

मो 9422119221.

≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments