डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 1 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट यांचं निधन..

कुणाचं अंतिम पर्व कसं असेल याची कुणीच कल्पना करु शकत नाही. आयुष्यभर सतत कामात असणारा एखादा या अंतिम पर्वात काम नाही, किंवा काही करण्याइतकी शक्ती उरली नाही म्हणूनही खचून जातो. अनेकांना या पर्वात समाजात घडत असलेल्या अनेक घटना छळतात आणि आपण काही तरी करायला पाहिजे ही खंत लागते आणि आता आपल्या हातून हे काही होण्याची शक्यता नाही याचं प्रचंड दु:ख होत असतं. त्यांची ही तळमळ अतिशय प्रामाणिक आणि नैसर्गिक असते. त्यांना पडणार्‍या अशा प्रश्नांची मालिका संपतच नसते, कारण वय झालं, शक्तीहीन झाले तरी यांच्या संवेदना तितक्याच, किंबहुना अधिक तीव्र असतात. अनिल अवचटांबाबत हे जवळपास असंच झालं होतं. खूप काही करायचं बाकीच आहे असं त्याला सारखं वाटायचं. त्याचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे,” आणखी काही प्रश्न” हे त्याच्या या मानसिकतेचंच उदाहरण आहे.

अनिलच्या सामाजिक कार्याबाबतची खडा न् खडा माहिती जवळपास सगळ्यांना आहे. त्याच्या लोकसत्तामधल्या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या तरुणाईवरची लेखमाला त्याला सामाजिक कार्यात खेचून घेऊन गेली आणि पुढे त्यातून मुक्तांगणची निर्मिती झाली. अनिलने केलेल्या अनेक सामजिक उपक्रमांची तपशीलवार माहिती बहुतेकांना आहेच. अनिल एक ’छांदिष्ट’ होता. शिक्षणाने डॉक्टर होता, हाडाचा सामाजिक कार्यकर्ता होता, चित्रकार होता, ओरिगामी कलाकार होता, तो उत्तम लिहायचा, बासरी वाजवायच, गायचा, कविता करायचा. हे सगळे छंद त्याने नुसतेच जोपासले नव्हते तर या प्रत्येकातून तो आनंद मिळवायचा. व्यसनमुक्ती केंद्र हे तर त्याचं मोठंच आकर्षण होतं. थोडक्यात काय तर सार्वजनिक अनिल अवचट सगळ्यांनाच माहीत होते.

अनिल माझा लहानपणापासूनचा मित्र. आम्ही काही महिन्यांच्या अंतराने एका वयाचे. अनिलचे वडील डॉक्टर होते आणि अनिलनेही डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांनी त्याला तसंच वाढवलं होतं आणि अनिल डॉक्टरही झाला. तो ज्यावेळी एमबीबीएस ला बीजे मधे होता त्या पहिल्या वर्षी मी आणि आणखी एक मित्र त्याला भेटायला कॉलेजवर गेलो होतो. अनिलने आम्हाला तिथल्या कॅन्टीनमधे नेले होते. थोड्या वेळाने आत काही मुली येताना दिसल्या. अनिलने त्यातल्या एका मुलीकडे खूण करुन सांगितले, ” ती निळ्या साडीतली मुलगी दिसते ना, तिच्याशी मी लग्न करणार आहे”. त्यावेळी मी विचारलं होतं, की ठरलंय का, तर अजून नाही पण होईल. ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं…..

क्रमशः…..

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments