डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 2 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट:

…….(ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं.)…..क्रमशः

मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, म्हणजे बावीस डिसेंबरची. सकाळी साडेसातलाच अनिलचा फोन आला.”सुध्या, मी तुझ्याकडे येतोय, आहेस ना. खालचं तुझं ऑफिस उघडं आहे नां..” इतक्या सकाळी ऑफीस उघडत नाही. तू वरच ये असं मी त्याला सांगितलं. इतक्या सकाळी अनिल येत नसायचा. दुपारी, कधी संध्याकाळी असा यायचा. या वेळी मात्र त्याने ही वेळ का निवडली होती समजेना. अखेर आठच्या सुमारास अनिल आला. मी खाली आलो, त्याची अवस्था नाजूकच होती. त्याला सुट्टं चालणं त्रासदायक वाटत होत. त्याचा ड्रायव्हर अविनाश आणि मी एकेका दंडाला धरुन घरात नेलं. घरात माझी बायको आणि मी दोघेच होतो. काय खाणार विचारल्यावर म्हणाला की मी पोहे खाल्ले आहेत, तरी पुन्हा थोडे खाईन आणि चहा पण घेईन. त्याने त्याचं ’आणखी काही प्रश्न’ हेे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक मला दिलं. पेन मागून घेतला आणि त्यावर लिहिलं,’ प्रिय सुधा, तुझ्याकडे आल्यावर वेगळंच वाटत असतं’ खाली सही केली. अक्षर नेहमीसारखं नव्हतं. हाताला थोडा कंप होता.  मी म्हणालो,” अनिल, हे प्रश्न कधीच संपायचे नाहीत, आणखी काही, मग परत आणखी काही…. असं सुरुच राहणार. तू अनेक प्रश्नात हात घातला आहेस आणि शक्य ते सगळं केलं आहे. आता स्वत:कडे लक्ष दे”.

पोहे खात आणि नंतर चहा घेत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्याचा एकूणच अ‍ॅप्रोच यावेळी मला थोडा विचित्र वाटला होता. उगा तो निर्वाणीची भाषा बोलतोय असंही वाटून गेलं होतं. तो नेहमीच आल्यावर भरपूर बोलायचा. बहुतेक वेळा आम्ही दोघेच असायचो. अनेक खाजगी गोष्टी शेअर करायचा. माझ्या ’एक होतं गाव ’ या पुस्तकाला प्रस्तावना त्याने लिहिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं, ” सुधाकरची कमाई माझ्या तुलनेत खूप मोठी आहे’. हे वाक्य काढून टाक असं मी त्याला सुचवलं होतं. अरे हे वास्तवच आहे, तू जे काही केलंस ते खरोखर मोठं आहे. मी हे वाक्य काढणार नाही. आणि ते तसंच आहे. त्या दिवशी त्याने सांगीतले होते की तुझं ’पिंपळपार’ तिसर्‍यांदा वाचलं. काय आहे माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. भरपूर गप्पा झाल्यावर तो नेहमीप्रमाणे म्हणाला सुध्या, आता एक गाणं म्हणतो. त्या दिवशी त्याने आनंद सिनेमातलं ’कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हटलं. त्यादिवशी हे गाणं म्हणताना त्याच्या आवाजात शेवटी शेवटी चरचरीत अशी कातर आणि आर्तता आहे असं मला वाटून गेलं. त्यालाही हे म्हणताना आतून वेगळंच जाणवत असावं. मलाही गलबलून गेलं होतं. तो प्रत्येक भेटीत एक गाणं म्हणायचाच, पण गाणं वेगळं असायचं आणि मूडही वेगळा असायचा. या पूर्वीच्या भेटीत त्याने आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग म्हणला होता.

अनिलच्या घरी गेलं की तो पुस्तकाच्या खोलीत, जी पुस्तकाचं गोडाऊन वाटावी अशी झालेली होती, बसलेला असायचा. अघळ पघळ मांडी घातलेला अनिल, समोर आपण बसलेलो आणि गप्पा व्हायच्या. मधुनच तो बासरीवर काही वाजवून दाखवायचा. आमच्या गप्पांना त्याच्या सामाजिक कामाचा, व्यसनमुक्तीचा असा काही संदर्भ नसायचा. वेगळ्याच दिशेला गप्पा व्हायच्या. सुनंदा वहिनींच्या जाण्यानंतर अनिल आतून पोकळ झाला होता आणि त्याची आई इंदुताईंच्या जाण्यानंतर तर त्याच्यातली पोकळी जाणवतही होती. त्या दिवशी अनिल आला त्यावेळी त्याची अवस्था फार चांगली नव्हती. ’मला चक्कर येते’ असं म्हणाल्यावर मी त्याला तू सध्या बाहेर पडू नकोस अशी सूचनाही केली होती. या वयात थोडं जपूनच राहा, पडलास तर भलतंच काही व्हायला नको.

अनिलला आता आपल्याकडे फार काळ नाही याची जाणीव झाली असावी आणि तो मित्रांना, घरच्यांना भेटून घेत असावा. जे काही करु ते जीव ओतून करु, सगळ्या कलांचा आस्वाद घेऊ, अनेकांच्या अडचणींने कळवळून जाऊ, जमेल ती सगळी मदत करु असा विचार करणारा, साधी राहाणी असलेला अनिल. शाकाहारी पण चवीने खाणारा अनिल. अनिल एक अपवादात्मक आगळं व्यक्तिमत्व होतं. मला नेहमीच बरं वाटायचं की अनिल त्याच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी विश्वासाने माझ्याकडे बोलायचा. जगण्याच्या सगळ्याच पैलूंचा आस्वाद घेत, प्रचंड सामाजिक कार्य करत आयुष्य जगलेला अनिल म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. एक जवळचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा मित्र हरपला याचं मोठंच दु:ख आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments