☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆
आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.
तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं . ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.
दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्चितता डोकावत नव्हती. गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता. आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.
मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.
पुन्हा एकदा दोघेच होतो.
पुन्हा एकदा पाऊस होता.
पुन्हा एकदा छत गळत होतं.
तेच टपटपणारे थेंब नव्हते. यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.
नवा पाऊस पडणार होता.
मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.
© सौ. सुनिता अनंत गाडगीळ
9420761837