सौ राधिका भांडारकर

??

? व्हॅलेन्टाइन.. ? सौ राधिका भांडारकर ☆

एकदा आजीने मला माहेराहून परतताना तिच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्यात एक वस्तु बांधून दिली होती. ती वस्तु माझ्याकडे नाहीय् पण आजीच्या लुगड्याचा तुकडा मात्र मी जपून ठेवलाय. छान घडी घालून. त्या तुकड्याचा वास, मऊ स्पर्श ,त्यावरचं ते चांदण्यांचं डीझाईन म्हणजे माझ्या ह्रदयातलं आजीचं वास्तव्य आहे.

प्रेम, माया, एक हवीशी वाटणारी, सदैव धीर देणारी अशी अनामिक उब आहे…

शंभर वर्षाचं लांबलचक आयुष्य जगून ती गेली तेव्हां जाणवलं, जीवनातला एक प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला…

अवतीभवती अनेक प्रियजन आहेत…ज्यांना खरोखरच माझ्याविषयी  प्रेमभावना आहेत..आपुलकी आहे…पण आजीच्या प्रेमाचा रंग कुठेच नाही…तिनं जे माझ्यावर प्रेम केलं

त्याची जातच निराळी..ती गेल्यानंतर त्या प्रेमाला मी पूर्णपणे पारखी झाले…तसं प्रेम मला कुणीच दिलं नाही ..आणि देउही शकणार नाही…

ती तशी खूप हट्टी होती.तिचं ऐकावच लागायचं..

एकदा आठवतंय्..पावसाळा सरला होता..

छान उन पडलं होतं.. म्हणून काॅलेजात जाताना मी छत्री न घेताच निघाले.. जाताना  तिने अडवलं.. छत्री घेच म्हणाली.. पण मी ऐकलंच नाही… संध्याकाळी परतताना, आकाशात गच्च ढग.. विजांचा कडकडाट आणि धो धो पाउस..!!

पण काय सांगू..?बस स्टाॅपवर ही माझी वृद्ध आजी उभी..एक छत्री माथ्यावर अन एक माझ्यासाठी बगलेत…

घरी पोहचेपर्यंत अखंड बडबड..चीड राग..

सांगत होते तुला मी संध्याकाळी पाउस येईल ..छत्री असूदे..ऐकत नाहीस..किती भिजली आहेस..परीक्षा जवळ आली आहे..

घरात गेल्याबरोबर टाॅवेलने खसाखसा अंग पुसले ..अन् पटकन् गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली…

खरं सांगू तेव्हां तिचा राग यायचा..पण आता जेव्हां असा धुवाधार पाऊस पडतोना तेव्हां तिचीच आठवण येते..तिच्या अनेक मायेच्या छब्या आठवतात..तिच्या चेहर्‍यावरची रेष नि रेष दिसते..त्या रेषांची स्निग्ध लाट होते..आणि तो प्रेमाचा शीतल गारवा आजही जाणवतो..

मला कुणी काळी म्हणून हिणवलं तर ,पदरात लपेटून घ्यायची .. असंख्य पापे घ्यायची..

आणि सदैव मला काट्टे, पोट्टे, वानर म्हणणारी तेव्हां मात्र,

“अग!माझी विठू माऊली .. माझी रुक्मीणी ग तू..” म्हणून गोंजारायची..

तिच्या प्रेमानं मला बळ दिलं .. आत्मविश्वास दिला..आत्मसन्मान ठेवायला शिकवलं..

एक सुरक्षित भिंत होती ती आमच्यासाठी..

लग्नानंतर मी माहेरी यायची.. माझी गाडी पहाटेच पोहचायची.. पण त्या अंधार्‍या  पहाटे दार उघडून स्वागताला तीच उभी असायची..

तिच्या विझत चाललेल्या डोळ्यांत माझ्या भेटीसाठी किती आतुरता असायची…

तिने मारलेल्या घट्ट मिठीत प्रेमाचा धबधबा जाणवायचा…

त्याच दारावर त्यादिवशी आजीच्या अस्थींचे गाठोडे दिसले आणि खूप काही हरवल्याची जाणीव झाली…

मग जेव्हा मन पोकळते,उदास होते तेव्हां तिच्याच लुगड्याचा हा तुकडा मला हरवलेलं सगळं काही परत देतो…

व्हॅलेंटाईन डे ला मी पहिलं गुलाबाचं फुल माझ्या प्रेमळ  आजीच्या…जीजीच्या स्मृतींनांच अर्पण करते….???

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments