सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ऋग्वेद काळात अनेक ऋषिका होऊन गेल्या. त्यातील घोषा या विदुषी ची कथा आपण ऐकूया.

घोषा ही दीर्घतामस ऋषींची नात व कक्षीवान ऋषींची कन्या. ऋषींच्या आश्रमात ती सगळ्यांची लाडकी होती पण दुर्दैवाने लहानपणीच तिच्या सर्व अंगावर कोड उठले. त्यामुळे तिने लग्नच केले नाही. अध्यात्मिक साधनेत तिने स्वतःला गुंतवून टाकले. तिला अनेक मंत्रांचा साक्षात्कार झाला. तिने स्वतः अनेक मंत्र आणि वैदिक सूक्ते रचली. ऋग्वेदाच्या दशम मंडलात तिने दोन पूर्ण अध्याय लिहिले आहेत. प्रत्येक अध्यायात 14/ 14 श्लोक आहेत. आणि सामवेदामध्ये सुद्धा तिचे मंत्र आहेत.

ती साठ वर्षांची झाली. त्यावेळेला तिच्या एकदम लक्षात आले की आपल्या पित्याने अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे आयुष्य, शक्ती आणि आरोग्य प्राप्त केले होते. आपणही अश्विनीकुमार यांना साकडे घालू.

अश्विनी कुमार यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोषाने उग्र तप केले.”अभूतं गोपा मिथुना शुभस्पती प्रिया

अर्यम्णो  दुर्या अशीमहि ” अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे कोड नाहीसे केले  व ती रूपसंपन्न यौवना बनली. त्यानंतर तिचा विवाह झाला. तिला दोन पुत्र झाले. त्यांची नावे तिने घोषेय आणि सुहस्त्य अशी ठेवली. दोघांना तिने विद्वान बनवले. युद्ध कौशल्यात देखील ते निपुण होते.

घोषाने जी सूक्ते रचली याचा अर्थ असा आहे की,”हे अश्विनी देवा आपण

अनेकांना रोगमुक्त करता.आपण अनेक रोगी लोकांना आणि दुर्बलांना नवीन जीवन देऊन त्यांचे रक्षण करता. मी तुमचे गुणगान करते .आपण माझ्यावर कृपा करून माझे रक्षण करा आणि मला समर्थ बनवा. पिता आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतो तसे उत्तम शिक्षण, आणि ज्ञान तुम्ही मला  द्या. मी एक ज्ञानी आणि बुद्धिमान स्त्री आहे. तुमचे आशीर्वाद मला दुर्दैवा पासून वाचवतील. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांनी आणि नातवांनी चांगले जीवन जगावे. तिच्या तपश्‍चर्येने प्रसन्न होऊन  अश्विनी कुमारांनी तिला मधुविद्या  दिली . वैदिक अध्यापन शिकवले. रुग्णांना रोगमुक्त  करण्यासाठी , अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी, त्वचेच्या आजारापासून बरे होण्यासाठी गुप्‍त शिक्षण विज्ञान शिकवले.

अशाप्रकारे कोडा सारख्या दुर्धर रोगाने  त्रासलेल्या या घोषाने वेदांचे रहस्य उलगडून दाखवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि तिला वैदिक युगातील धर्मप्रचारिका ब्रह्मवादिनी घोषा हे स्थान प्राप्त झाले. अशा या बुद्धिमान, धडाडीच्या वैदिक स्त्रीला शतशत नमन.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments