सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

अतिशय सुंदर चिंतनात्मक लेख.