☆ मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग ☆
पंडित संजीव अभ्यंकर
वाढदिवस / जन्म : ५ ऑक्टोबर १९६९
त्यांना घरातच गुरु हजर होता. त्यांची आई शोभा अभ्यंकर यांनी त्यांना प्राथमिक सांगीतिक धडे दिले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांनी संजीव अभ्यंकर याना मार्गदर्शन केले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची दिनचर्या पूर्णत: बदलली.
गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरातील वेगळा दिनक्रम सुरु झाला. आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी गुरुजींची शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.
गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू असताना,पं. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती झाली . अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणार्या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.
देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सव आणि परदेशातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या भागांतही पं.संजीव अभ्यंकरांची गायकी पोचली आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पार्श्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतांतही त्यांनी स्वतःची छाप उमटवली. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या माध्यमातून देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
महाराष्ट्र शासनाने समर्थ रामदास स्वामी लिखित “दासबोध “पं.संजीव अभ्यंकरांच्या कडून गाऊन घेतला आहे व तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व तो विनाशुल्क डाउन लोड करता येतो.
‘माचिस’, ‘निदान’, ‘दिल पे मत ले यार’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘गॉडमदर’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.ऑल इंडिया रेडिओ ने १९९० साली त्यांना उत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार दिला होता.
थोड्या दिवसांपूर्वी आयॊध्येला राममंदिराच्या उभारणीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि जगभरातली सर्वाना ध्यान लागलें रामाचें त्या प्रित्यर्थ पंडित संजीवजीं नी गायलेला अभंग
ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें
राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी
रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी
तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले
कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी
रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं
यूट्यूब लिंक >>> ध्यान लागलें रामाचें
पंडित संजीव अभ्यंकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
© श्री प्रसाद जोग
सांगली.
९४२२०४११५०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈