मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्या घरात बाई नाही त्या घरातला पुरुष म्हणतो, “घरात कोणी बाईमाणूस नसेल तर घराला घरपण येत नाही!

एखादं अवघड काम नाईलाजाने अंगावर घेतांना, घरातली एकटीच बाई म्हणते, “निपटायचं कसं हो सगळं? घरात कोणी पुरुषमाणूसच नाही ना!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे त्या घरातलं बाईमाणूस आणि पुरुषमाणूस असं दोघेही म्हणतात की , वर्षातून निदान पंधरा-वीस दिवस तरी कुठे तरी एकटंच जाऊन रहावं!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार तसा गुण्यागोविंदाने चालू नसतो त्या घरातलं पुरुषमाणूस विचार करत असतं की, घरांतलं बाईमाणूस निदान महिन्याभरासाठी माहेरी कां जात नाही?

तर बाईमाणूस विचार करत असतं की, “हल्ली घरातल्या या पुरुषमाणसाला पूर्वीसारखं ऑफिसच्या कामासाठी आठ-दहा दिवससुद्धा बाहेरगांवी कां बरं जायला लागत नाही?

माणूसप्राणी हा असाच आहे. रोजच्या कामांपासून, – अगदी आवडत्या कामांपासून, माणसांपासून सुद्धा – त्याला चार क्षण विरंगुळा हवा असतो. पण अनेकदा तसे क्षण येतच नाहीत. आणि तो चेहेर्‍यावर न दाखवता मनांतून काहीसा निराशच होतो.

पण आश्चर्याची गोष्ट अशी – घरातला संसार गुण्यागोविंदाने चालू असो किंवा नसो, विरंगुळ्याचे क्षण लाभलेले असोत किंवा नसोत, एक माणूस हरपला की दुसरा माणूस कोसळतो ! बधिर होतो ! भुतासारखा जगतो! खरं तर आता सारे क्षण विरंगुळ्याचे असायला हवेत !   पण तसं होत नाही. आता प्रत्येक क्षण भकास असतो ! माणूस हे खरोखरच न सुटलेलं अवघड कोडं आहे !

अखेर हे माणसांचं जग आहे. प्रत्येक माणूस आपली आपली भूमिका जगत असतो. त्यातून कोणाचीही सुटका नाही!!!

मग ‘बाईमाणूस’ काय आणि ‘पुरुषमाणूस’ काय !!

© सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈