सुश्री तृप्ती कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पिंपळा !
पानगळीच्या रुपानं
तुला वरदान लाभलंय
न पुरी होऊ शकणारी स्वप्नं
आपोआप गळून पडण्याचं
आणि —
काही काळानं
पुनः नव्या असोशीनं
स्वप्नांचं मातृत्व ल्यायण्याचं
पण —
या तुझ्या लेकराचं काय..
उभ्या आयुष्यात एखादाच बहर
अखेरचीच पानगळ ..
त्यामुळे ..
मी वृद्ध होण्याआधी
माझी स्वप्नं पूर्ण कर ..
नाहीतर ..
नाहीतर इतक्या सगळ्या
स्वप्नांना पुरुन उरणारं
वृद्धत्व कुठून आणू मी ———
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈