☆ मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

माझ्या मैत्रिणीला तिच्या वैभवसंपन्न,विद्याविभूषित,अशा माहेरच्या आठवणींचे पुस्तक करायचे होते त्याचे पुनर्लेखन करताना, त्यात १९६२ च्या चीन युद्धात वीरगती मिळालेल्या तिच्या भावाची हकीकत आहे.

पुण्याला लष्कर भागात, दक्षिण कमांडच्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचा स्मृतीस्तंभ उभारला आहे. एका संध्याकाळी मी व माझी मुलगी हा स्तंभ बघायला गेलो. थोडासा अंधारच झाला होता, परावर्तीत प्रकाश दिवे तो परिसर उजळून टाकत होते. विस्तीर्ण आवारचे सुशोभित फाटक बंद होते. बाहेर सुगंधित बुचाच्या फुलांचा सडा पडलेला होता तेवढ्यात एका लष्करी जवानाने फाटक उघडले. आम्ही स्तंभाच्या दिशेने मार्गक्रमित झालो तेथील शांततेमुळे वातावरण उगाचच गंभीर वाटत होते. स्तम्भाशी जाऊन आम्ही मनोमन नमस्कार केला. स्तंभाच्या मागील बाजूस संगमरवरी फरश्यांवर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे दिमाखाने झळकत होती. आम्ही डाव्या बाजुने उतरलो व नावे वाचण्यास सुरुवात केली. मनात विलक्षण भावना गोळा झाल्या होत्या. एवढ्या नावात अपेक्षित नाव कस मिळणार ? भ्रमणध्वनीचा प्रकाश बघता बघता एका नावावर स्थिरावला, ‘व्ही. एन. आठल्ये’. दूरभाष संचावर टंकलिखित केले, “IC  12635 21 LtAthaley VN.” !

विष्णू भावाच्या नावामागील क्रमांक लष्कराच्या रेकॉर्ड मधील होता. स्तंभाला प्रदक्षिणा घालून शेजारच्या पांढऱ्या शुभ्र फ्लोरीबंडा जातीच्या गुलाबपुष्पातील एक सुंदर पुष्प तोडून घेतले सद्गदित अंत:करणाने ती पुष्पमय श्रद्धांजली आपल्या विष्णूभाऊबरोबर इतर वीरजवानांना अर्पण केली. नकळत डोळ्यात अश्रू आले.

इतक्या फरश्यावर असलेल्या अनेक नावात नकळत अपेक्षित नावाच्या फरशीसमोर पोहोचले हा एक ‘विलक्षण योगायोगच नव्हे का’ !

त्या घरातील व्यक्तींशी नकळत माझा पूर्वीचा ‘ऋणानुबंध’ असावा असं मला जाणवलं.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

याला जीवन ऐसे नाव.