डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”) –इथून पुढे….
बापरे… मी हा विचार ऐकून हादरलो…. केवळ शील जपण्यासाठी जाणुनबुजुन ही घाणीत राहते…
आपण कुठल्या समाजात राहतो ? स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं… दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं…
या आज्जीनं नवऱ्यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवून घेतली होती. मुद्दाम दुर्गंधित झाली होती. गंमत पहा कशी, एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं.. काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं…
मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला. आता तिच्या अंगावरची एक इंचाची घाण म्हणजे तिनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र भस्म आहे असं मला वाटायला लागलं, आणि तिच्यातून येणारा दुर्गंध म्हणजे सुगंधी कापराचा वास…!!!
या आजीला मी डोळ्याच्या आॕपरेशनसाठी घेऊन आलो 27 तारखेला. अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी आणि तोच वास…!
दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं. नाकाला पदर लावले. कुणी कुणी चक्क उठुन निघून गेले. बरोबरच आहे, चिखलात फुललेलं हे कमळ आहे, याची कुणालाच जाण नव्हती… इतरांसाठी हा वास होता… आणि माझ्यासाठी सुगंध… संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ? बाळाच्या शी शु चा “आईला” कधीच “वास” येत नाही… दुर्गंधीत असूनही….
जवळचं कुणी माणूस गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वासही नकोसा वाटतो मग… सुगंधित असूनही….!
वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत. समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची. चांगली भावना असेल तर सुगंधच सुगंध- नाहीतर फक्त घाणेरडा वास…!!!
मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं पाहिलं आणि मूक नजरेनं आमच्या भुवडताईकडं पाहिलं…
भुवडताईने त्याच मुक्या नजरेनं भुवडबाबांकडं पाहिलं. कुणीच कुणाशी काही बोललं नाही.
बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले. बरोबर 20 मिनिटांनी परत आले. हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टाॕवेल…!
मला हेच सांगायचं होतं भुवडताईंना. न बोलताही त्यांना कळलं. मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा …?
भुवडताईंनी मग या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुममध्ये नेलं. बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली…
भुवडताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली. कुठल्याही वासाची लागण न झालेली…! जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजून तो सुगंध अनुभवणारी…. आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ…
बाथरुममधून दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवडताईच्या हाताचा. जगातले सर्वात सुंदर हात होते ते, आणि तितकेच सुगंधी….! शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो…
आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं आॕपरेशनही करुन घेतलं. आता तिला दिसायला लागेल !
आॕपरेशननंतर मी तिचे हात हातात घेऊन म्हटलं, “आज्जी, तुझ्या अंगावरचं “भस्म” आणि “कापराचा वास” आज आम्ही काढून टाकलाय. तुझी ही कवचकुंडलं काढून घेतली आहेत, पण काळजी करु नकोस. तुला आजपासून अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही….”
“म्हणजे?” आज्जी बोलली….
मी म्हटलं…. “आता जिथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे. इथून पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस. मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ….!”
“पण तू हे का करतोयस माझ्यासाठी ?” तिनं निरागसपणे विचारलं….
“मी ही तितक्याच निरागसतेनं सांगितलं, ” तू मला सांगितलं होतंस ना ? तुझं बाळ दोन वेळा पोटातच गेलं…. अगं ते गेलं नव्हतंच कधी…. डाॕक्टरांनी खोटंच सांगितलं होतं तुला… मी तेच बाळ आहे तुझं….!! फिरुनी पुन्हा जन्मलो मी….!!!”
तिचे डोळे डबडबले…. माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली… म्हणाली “श्लोक म्हणू…?” नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता तिनं डोळे मिटले. माझे हात हाती घेतले. ते हात तसेच हातात ठेऊन तिने स्वतःचेही हात जोडले… आणि विश्वप्रार्थना सुरु केली…. माझे हात हाती घेऊन…. “सर्वांना चांगली बुद्धी दे…सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात, ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर… आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे….!”
मी तिच्याकडे एकटक पाहत होतो. स्वतः जळत राहून दुसऱ्याला सुगंध देणारी ती एक सुवासिक अगरबत्ती आहे असा मला त्यावेळी भास झाला….!!!
आणि सारा आसमंत चक्क सुगंधी झाला…..!!!
समाप्त
© डॉ. अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈