श्री सतीश स.कुलकर्णी
☆ मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆
‘The only thing you absolutely have to know is the location of the library.’
अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आमच्या वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ‘स्थान’ काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच सार्वजनिक वाचनालयांची दारं अजून बंदच आहे. ती कधी उघडणार, ह्याची काहीच कल्पना नाही.
राज्य सरकारनं ५ ऑक्टोबरपासून बार, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. आणखी काही गोष्टी केल्या आणि काही जुने निर्बंध चालूच ठेवले. ह्यात कुठेच ग्रंथालयांचा-वाचनालयांचा उल्लेख नाही, हे विशेष. असा अनुल्लेख म्हणजे उपेक्षाच!
साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात गेलेल्या आपल्या देशातील बहुसंख्यांना वाचनालये उघडावीत, त्यासाठी काही मागणी करावी, असं वाटल्याचं दिसलं नाही. (काही तुरळक अपवाद असतील.) वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा फैलाव होतो, अशा ‘व्हॉट्सॲप विद्यापीठीय’ बातम्यांचा पूर आल्यानंतर तसा तो होत नाही, हे सांगण्यासाठी वृत्तपत्रांची एकच घाई उडाली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी ह्यांना बोलते करून त्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे छापण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरत नसेल, तर तो पुस्तकांच्या पानांमधून कसा पसरेल, असा प्रश्न वाचनालयांच्या बाबतीत विचारायचं मात्र विसरूनच गेलं.
‘अनलॉक : ५’च्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र जाग आली. ‘ग्रंथालये बंद असणं, ही बाब एकूण साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे ती उघडण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी साहित्य परिषदेनं केल्याची बातमी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये आहे. पण एकूणच साहित्य व्यवहार पाहणाऱ्यांना काय किंमत द्यायची किंवा त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे प्रशासन हाकणाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे ‘मागणी केली, बातमी आली’ एवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ.
अधिकृत परवानगी मिळाल्याच्या किती तरी दिवस आधीपासून रेस्टॉरंट आणि बारमध्ये सहजपणे ‘बसता’ येते, अशी चर्चा कर्णोपकर्णी असते. तिथे ग्रंथालयावरचे निर्बंध मात्र कडकपणे चालू असतात. त्यावाचून कुणाचे काही अडत नाही, ही तर भावना त्यामागे नसावी ना?
ह्या कसोटीच्या काळात वाचन-संस्कृतीच्या कसोटीला आपण उतरावं, ह्या भावनेनं वाचनालयाकडून काही झाल्याचं दिसलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. वाचनालय सुरू व्हावं ह्यासाठी आम्ही सभासदांनीही रेटा लावला नाही. (हा लेख khidaki.blogspot.com इथे प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांपासून काही वाहिन्या व वृत्तपत्रे ह्यांनी ही मागणी लावून धरली.)
इंटरनेटवर भटकताना कॅनडाच्या ओंटारिओ परगण्यातील ‘किचनेर पब्लिक लायब्ररी’ चं संकेतस्थळ दिसलं. काही शाखा असलेलं हे वाचनालय १० ऑगस्टपासून पुन्हा चालू झालं. त्याचा आनंद संकेतस्थळावर व्यक्त झालेला दिसतो. सभासदांना उद्देशून तिथं लिहिलं आहे – ‘आमच्या ह्या जागेत तुमचं पुन्हा स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे! खूप दिवसांपासून आम्हाला तुमची आठवण येत होती…’ सरकारच्या अनुदानावर (म्हणजे जनतेच्या पैशातून) चालणाऱ्या इथल्या सार्वजनिक वाचनालयांना आपल्या वाचकांची अशी मनापासून आठवण झाली का?
समर्थ रामदास स्वामींनी ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असं लिहून ठेवलं. त्यातलं अखंडित महत्त्वाचं आहे. सफ़दर हाशमी ‘किताबें’ कवितेत लिहितात –
किताबें करती है बातें
बीते जमानों की
दुनिया की, इंसानों की
आज की कल की
एक-एक पल की।
खुशियों की, ग़मों की
फूलों की, बमों की
जीत की, हार की
प्यार की, मार की।
सुनोगे नहीं क्या
किताबों की बातें?
आपण सगळ्याच पातळ्यांवर कान बंद करून घेतल्यानंतर पुस्तकांचे हे अस्फुट उद्गार त्या पानांतून कसे ऐकू येतील!
वाचल्यानं माहिती मिळते, ज्ञान वाढतं. माणूस शहाणा होतो म्हणतात.
आपली प्रजा शहाणीसुरती असावी, असं कोणत्या जमान्यातील राज्यकर्त्यांना वाटत असतं हो!
हा सविस्तर लेख व असे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – khidaki.blogspot.com
© श्री सतीश स.कुलकर्णी
संपर्क – [email protected], [email protected]
(चित्र साभार श्री सतीश स. कुलकर्णी )
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
????