डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंती मनाची— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सोसायटी मध्ये गॅस ची pipeline टाकण्याचे काम सुरू झाले. खोदण्या साठी आलेले कामगार, आणि बायकापोरे यांचा नुसता कलकलाट सुरू झाला. सर्व बंगल्यांसमोरच मोठे खड्डे खणत होते. आमच्या गल्लीत पण मोठे खड्डे खणायचे काम सुरू झाले. 

मी रोज खिडकीतून हे दृश्य बघायची. त्या बायका  गड्यांच्या बरोबरीने पहार घेऊन जमीन खणत होत्या.

माती घमेल्यात भरून टाकायची, आणि मग संध्याकाळी ट्रक येऊन ती घेऊन जायचा. कमीतकमी आठ दहा दिवस तर हे काम चालणार होतंच.

दुपार झाली की सगळे लोक झाडाखाली जमत,आणि आणलेली भाजीभाकरी हसत खेळत खात. रोज मी त्यांच्या साठी कळशी भरून पाणी ठेवत असे. संध्याकाळी जाताना लख्ख घासलेली कळशी पायरीवर ठेवलेली असायची.

 आमच्या बंगल्या समोर काम करणारी एक मुलगी  छोट्या बाळाला घेऊन यायची. ते पोर असेल एक दीड वर्षाचे.

नुकतेच चालायला लागले होते. एका फुटक्या डबड्याला दोरी बांधली होती. ते मूल ते डबडे ओढत सगळीकडे  मजेने हिंडायचे.

त्याच्या आईशी माझी हळूहळू ओळख झाली.

“ काय ग नाव बाळाचे? “

“ नवसाचा आहे तो म्हणून मल्हारी हाये आमचा. “ तिने कौतुकाने सांगितले.

“ आणि तुझे ग? “

म्हणाली, “मी हाये रेसमा. मालकांनी हौसेने माझे नाव रेसमा ठेवलंय. “

मला हसूच आले. रेश्मा म्हणता न का येईना, पण नाव भारी होते की नाही?

तर रेसमा काळी सावळी, पण काय सुंदर  फिगर होती तिची–बघत राहावे अशी–

आत्ताच्या मुली झक मारतील अशी घाटदार. छान साडी असायची अंगावर. डोक्यात फूल, भरगच्च केस, नाकात मोरणी. आली की साडी बदलून जुने नेसायची. पोराला झाडाखाली जुन्या धडप्यावर निजवायची. तेही पडून खेळत राहायचे. मला मोठी गम्मत वाटायची या  कुटुंबाच. 

रेसमा चा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. मी  रोज तिच्या सुट्टीच्या वेळी गेटशी जाऊन गप्पा मारायची.

परदेशातल्या माझ्या  मुलींना मी रोज  reportingकरायची. डोक्याला हात लावून त्या म्हणायच्या–“ आई,तुझी पण कमाल आहे. दगडालाही बोलायला लावशील ग बाई तू. “ त्यांच्याकडे लक्ष न देता,माझ्या चौकश्या सुरूच असायच्या.

“ रेश्मा, कुठले ग तुम्ही? असलीच कामे करता का ? गावाकडे  कोणकोण असतं ? “

ही मंडळी सोलापूर कडची होती .त्यांचा मुकादम,अशी कामे आली, की या लोकांना गावाकडून घेऊन यायचा.

“ रेश्मा,किती ग रोज मिळतो तुम्हाला? “

“ ताई,गड्याला सातशे रोज आणि बाईला सहाशे पडतात रोज.” अभिमानाने रेश्मा सांगत होती. पण हे कायम नसते ना. मग गावाकडे करतो शेती. पण आता शहरच गोड वाटतं बघा.मी सांगतेय मालकाला, आपण पुण्यातच राहूया.

पोराला चांगले शिकवूया. तो नको आपल्या सारखा बिगारी व्हायला. “

 पोरगे मोठे निरोगी,गुटगुटीत होते. एक भाकरीचा तुकडा दिला की बसायचे चघळत.

नुकताच माझा नातू आणि मुलगी परदेशातून येऊन गेले होते. नातू त्याची खेळणी इथेच ठेवून गेला होता.

मी त्यातले एक छान सॉफ्ट टॉय शोधले. अगदी गोड कुत्रे होते ते.

दुसऱ्या दिवशी रेश्मा आणि मल्हारी आलेच. मी मल्हारीला ते कुत्रे दिले. आनंदाने त्याचे डोळे इतके चमकले.

त्याने आपल्या आईकडे बघितले. त्याची आई म्हणाली, “ अजून त्याला  नीट बोलता येत नाही तर तो मला विचारतोय घेऊ का असे.” 

“ घेरे बाळा,तुलाच दिलेय मी. खेळ त्याच्याशी.” मल्हारीला खूप  आनंद झाला. ते कुत्रे तो मांडीवर घेऊन बसला.

त्याच्या बोबड्या भाषेत त्याच्याशी बोलू लागला. ते डबडे कुठे टाकून दिले कोणास ठाऊक.

 रेश्मा म्हणाली, “ मावशी, तुम्ही ते खेळणे दिलेत ना, माझे काम अगदी हलके झाले बघा. मल्हारी आता एका जागी बसूनच खेळतो. आधी मला भीति वाटायची  हा चुकून खड्ड्यात तर नाही ना पडणार.” 

 रोज रोज ते कुत्रे आणि मल्हारीची जोडी सकाळी यायची.

एक दिवस म्हटले, “ अग रेश्मा, किती ग मळलेय ते कुत्रे. निदान धू तरी स्वच्छ.” 

रेश्माने कपाळाला हात लावला. म्हणाली “ अवो मावशी,त्याने दिले तर धुवू ना. चोवीस तास ते बरोबर असतय बघा–

झोपताना,जेवताना. वस्तीतली पोरे लै  द्वाड हायेत. त्याला भ्या वाटतं, कोणी चोरलं तर. म्हणून एक मिनिट त्याला दूर करत नाही .मावशी,मल्हारीला  कुत्र्याचे नाव विचारा ना.” 

“ मल्हारी,काय रे नाव तुझ्या कुत्र्याचे?”

लाजत लाजत बोबडा मल्हारी म्हणाला- “ लघु.”

आम्ही दोघी हसलो. रेश्मा म्हणाली, “ वस्तीत एक कुत्रा आहे रघु, म्हणून याचा पण रघु.”

 आता रस्त्याचे काम संपले होते. पाईपलाईन टाकून खड्डे बुजवले सुद्धा. रेश्मा माझा  निरोप घ्यायला आली

“ मावशी,लै माया केलीत आमच्यावर.आठवन ठेवा गरीबाची.”

पायावर डोके ठेवून तिने नमस्कार केला. मलाही गहिवरून आले. शंभरची नोट तिच्या हाती ठेवून म्हटले,

“ खाऊ घे मल्हारीला.”

 यालाही होऊन गेले 4 महिने. एक दिवस दुपारी बेल वाजली. कोण आहे  बघितले तर रेश्मा.माझ्या हातात एक पुडके दिले. “ अग हे काय? हे कशाला?”

“ काही  नाहीये हो जास्त. गावाला गेलो होतो ना, तर तुमच्यासाठी आमची शेंगदाणा चटणी आणि मसाला आणलाय बघा. सांगा बर का,आवडते का गरीबाची भेट.” 

 चहा पिऊन रेश्मा निघून गेली. पण मला विचारात पाडून गेली. —–

किती ही छोटी,गरीब माणसे. सहजच तिच्या बाळाला मी दिलेले खेळणे ती विसरली नाही. आपल्या परीने तिने कृतज्ञता व्यक्त केली.—-

हे इतके मोठे मन, या छोट्या माणसांना कोण देते?

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments