श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ पुजारी हॉटेल ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
डॉ. आंबेडकर चौक हा आमच्या गावातील एक प्रमुख चौक. याच चौकात असलेलं पुजारी हॉटेल आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी वेगळेपण जपून होतं. आमच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या आमच्या जीवनात या हॉटेलचे अनेक अनुभव स्मृतीपटलावर कोरले गेले आहेत .आज सहजच पुजारी हॉटेलच्या जागेवर बांधल्या गेलेल्या शोरुम कडे पाहिलं आणि पुजारी हॉटेलच्या आठवणी मन:चक्षुसमोरून सरसरत गेल्या.
पुजारी हॉटेल म्हणजे काही भव्यदिव्य वास्तू नव्हती. दहा बाय वीस पंचवीस फूट क्षेत्रफळ असलेल्या टिनाच्या शेडमध्ये हे हॉटेल होते. पण इतके लहान असले तरी आम्हाला ते कधी अडचणीचे वाटले नाही. पश्चिम व दक्षिण दिशेला असलेले दरवाजे आम्ही कधी बंद झालेले पाहिले नाहीत .दोन तीन टेबलं , त्याभोवती खुर्च्या. कोपऱ्यात एक निमुळता टेबल व त्यामागे लाकडी खुर्ची म्हणजे मालकाचे काऊंटर. उत्तरेकडे सदैव पेटत असलेली भट्टी. कोपऱ्यात पाण्याचे टाके, त्यावर पाण्याचा नळ. याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. नोकरही चार ग्लास बोटात धरून टाक्यातील पाण्यात बुडवत आणि तसेच टेबलवर आणून ठेवत. आणि याला त्यावेळी कुणाचाही आक्षेप नसायचा. मिनरल वॉटर तर माहीतच नव्हते, पण कुणी आजारी पडल्याचे कधी ऐकले नाही .नगर परिषदेच्या नळाचे पाणी म्हणजे शुद्ध पाणी असा तेव्हा नियम होता . .या हॉटेलचे वेगळेपण म्हणजे ते जवळपास दिवसरात्र सुरू असायचे. रात्री दोन तीन तास लाईट बंद केले की हॉटेल बंद. हॉटेलचे नोकर तिथेच रहायचे .काही विशिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध म्हणावे तर तसेही नव्हते .भजी, आलुबोंडे ,शेव चिवडा असे नेहमीचेच पदार्थ तिथे मिळायचे. मिठाई म्हणजे जिलेबी व केव्हातरी बनविलेले पेढे बस. पण केव्हाही गरम मिळणारा एक पदार्थ तिथे मिळायचा तो म्हणजे मिसळ, त्याचीही रेसिपी ठरलेली होती. हॉटेलच्या भट्टीवर सदैव एक गंज मांडलेला असायचा- त्यात केव्हातरी बनविलेली दह्याची कढी सदैव गरम होत राहायची. मिसळ म्हणजे दोन चार भजी, त्यावर शेव चिवडा, आणि गरम कढी टाकलेली असायची.
हे पुजारी हॉटेल पदार्थासाठी महत्वाचे नव्हते, तर ते अनेकांचा आधार होते. त्याकाळी चंद्रपुरात सायकल रिक्षे होते.रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर असे रिक्षावाले हॉटेलच्या आश्रयाने उभे असायचे. रात्री साडेबाराला सिनेमाचे शो संपायचे ,अनेक लोक चहा नाश्त्यासाठी याच हॉटेलचा आश्रय घ्यायचे. दुसरे महत्वाचे म्हणजे तेव्हा पॅसेंजर ट्रेन हेच लोकांच्या आवागमनाचे साधन होते. नागपूरकडे जाणारी व नागपूरकडून येणारी- अशा दोन्ही गाड्या मध्यरात्रीच येत असत. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी रात्रीचा वेळ पुजारी हॉटेलच्या आसपास घालवीत असतं. साधारणतः रात्री दोन तीन पर्यंत सुरू असलेले ते हॉटेल पहाटे पाचला पुन्हा सुरू व्हायचे. रात्रीच्या गाडीने आलेले पाहुणे पहाट होईपर्यंत हॉटेल परिसरात थांबायचे, कारण तिथे रात्रीही वर्दळ असायची.
हॉटेलमध्ये नॅशनल एको कंपनीचा रेडिओ होता, जो सकाळी सहाला सुरू व्हायचा तो रात्री रेडिओ प्रक्षेपण बंद होईपर्यंत सुरू असायचा. हॉटेललगत एक मोठे सिरसाचे झाड होते.. त्यावर एक मोठा स्पीकरबॉक्स लावलेला होता. तो रेडिओला जोडला असल्यामुळे रेडिओचे सर्व कार्यक्रम परिसरात ऐकू जायचे. त्यावेळी “ सिलोन ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन का व्यापारी विभाग “ हे रेडिओ स्टेशन प्रसिद्ध होते.बिनाका गीतमाला, आपहीके गीत, भूले बिसरे गीत, असे अनेक कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक तिथे थांबायचे .अमीन सयानीचा आवाज ऐकू आला की लोकांची पावले नकळत थांबत. आमच्यासाठी तर ते घड्याळही होते.आमची सकाळची शाळा असायची. साडे सातला शाळा सुरू व्हायची. सात वीस ला प्रार्थना व्हायची . हॉटेलपासून शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर होती. सव्वासातला रेडीओवर `सत्तेशू समाचार` हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारा कार्यक्रम लागायचा व नंतर समाचार लागायचे. आम्ही तिथे पोहोचलो की कोणता कार्यक्रम सुरू आहे ते ऐकायचो.समाचार सुरू नसतील तर बरोबर प्रार्थनेला हजर. नाहीतर उशीर म्हणून छड्या बसत असेत . सिरसाचे ते झाड आणखी एका बाबतीत मनोरंजक होते. या झाडावर गावातील सिनेमा थियेटरमध्ये लागलेल्या सिनेमाचे बोर्ड टांगलेले असायचे. कोणत्या टॉकीजमध्ये कोणता सिनेमा लागलाय ते तिथे समजायचे .शाळा सुटली की तिथे उभे राहून ते बोर्ड पाहणे हा आमचा आवडीचा विषय होता .
“पुजारी हॉटेल“ या नावातील `पुजारी` या शब्दाचाही एक इतिहास आहे. पुजारी हे मालकांचे आडनाव नव्हे, तर मालकाचे वडील गुजरात राज्यातून चंद्रपूरच्या लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी म्हणून आले होते. पुढे त्यांचे मूळ आडनाव मागे पडून पुजारी हेच नाव प्रसिद्ध झाले.
हॉटेलचे एक आणखी वैशिष्टय म्हणजे हॉटेलमध्ये लावलेले फोटो. यात अनेक राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते.आम्ही शिकतांना दहावीत काँग्रेसच्या स्थापनेचा इतिहास शिकला होता. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दिन तय्यबजी,दादाभाई नौरोजी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, यालन ह्यूम, वेडरबर्न, या सर्वांचे फोटो तिथे लावले होते. हे त्यांचे अनौपचारिक शैक्षणिक कार्यच होते.
आणखी एक वैशिष्टय म्हणजे या हॉटेलच्या दर्शनी भागात बँडवाल्यांची वाद्ये लटकवलेली असायची.कारण हॉटेल मालकांच्या लहान भावाची इंडिया बँड पार्टी होती.त्या परिसरातील बँडवाल्यांनी आपसातील भांडणाला कंटाळून त्यांना आपले प्रमुख नेमले होते. ` बँड पार्टीचे ब्राम्हण प्रमुख ` हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. गावातील सर्व लग्नाचे बँड पुजारी होटलातच ठरायचे. महत्वाचे म्हणजे ही बँडपार्टी व त्याचे ` पुजारी ` हे मालक अजूनही आहेत . नुकताच त्यांनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
असे हे वैशिष्टयपूर्ण पुजारी हॉटेल नवीन पिढीने विकले– तिथे दुसरे शोरुम उभे राहिले. पण माझ्या पिढीतील अनेक चंद्रपूरकर या हॉटेलला कधीही विसरू शकत नाहीत —कारण ते फक्त हॉटेल नव्हतेच.
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈