☆ ते रवी, मी साधा चंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆
(दिग्गज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचे दि. ११/६/२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्द – सुमनांजली)
साहित्य, कला, संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राला, अनेक थोर चित्रकार लाभले आहेत.. एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, एम.आर. आचरेकर, इत्यादींनी सप्तरंगांवर हुकूमत गाजवून कलाजगतात प्रसिद्धी मिळविली.. या थोर चित्रकारांच्याच पिढीतील ज्येष्ठ चित्रकार, रवी परांजपे यांनी काल आपले ‘ब्रश मायलेज’ गाठले..
मला लहानपणापासूनच चित्रकलेचे आकर्षण आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदी पिशवीवर एखादे चांगले चित्र दिसले, तर ती पिशवी पाण्यात बुडवून खळ निघून गेल्यावर तो कागद सुकवून जपून ठेवलेली चित्रं, अजूनही माझ्या संग्रही आहेत.. अशाच छंदातून मुळगावकर व दलाल यांची चित्रे, कॅलेंडर्स जमविली. त्याकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या धर्मयुग, इलस्ट्रेटेड विकली अशा पाक्षिकात रवी परांजपे सरांची रंगीत कथाचित्रे, पाहिल्याची आठवतात..
काही वर्षांनंतर त्यांची चित्रे असलेली ग्रिटींग्ज कार्ड्स पाहिली. काही कॅलेंडर्स, सरांच्या वेगळ्या शैलीमुळे लगेच ओळखू यायची.. वर्तमानपत्रातील व रीडर्स डायजेस्ट या इंग्रजी मासिकातील सरांच्या जाहिराती पाहिल्या की, सरांच्या शैलीचं कौतुक वाटायचं.. अशा ज्येष्ठ चित्रकाराशी कधी संपर्क येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.. तरीही, तो आला…
माझ्या मोठ्या भावाने, रमेशने अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक मारुती पाटील सरांच्या शिफारशीवरुन, मुंबईला रवी परांजपे सरांकडे कलाक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठरविले..
सरांचा स्टुडिओ दादर येथील काॅलेज गल्लीतील, मनाली बिल्डींगमध्ये होता. त्यावेळी सर बिल्डर्सना लागणारी माऊंट साईजमधील बिल्डींगची कलरफुल पर्स्पेक्टिव्ह ड्राॅईंग्ज काढून देत असत. सरांकडे रमेशसारखेच चार असिस्टंट काम करीत असत.
त्यावेळी परांजपे सरांना भेटायला कधी अभिनेत्री स्मिता पाटील तर कधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येत असत. मी दोन वेळा रमेशला भेटायला म्हणून, स्टुडिओत गेलो होतो. सर मितभाषी होते. याच दरम्यान सरांकडे काम करणाऱ्या, दिपक गावडे या चित्रकार मित्राशी मैत्री झाली.. जी आजही अबाधित आहे..
सहा महिन्यांनंतर रमेशने, सरांकडचा अनुभव घेऊन मुंबई सोडली. १९९० साली, सर पुण्यात आल्यानंतर आम्ही दोघेही सरांना भेटत होतो. सरांची अनेक प्रदर्शने पाहिली. कधी सरांचं प्रदर्शन मुंबईत जहांगीरला असेल तर तेही जाऊन पाहिलं..
वर्तमानपत्रातून आलेले सरांचे लेख वाचत होतो. मोठमोठ्या सांस्कृतिक समारंभांना सरांची उपस्थिती हमखास असायची. तिथे भेट होत असे..
आठवड्यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर यांचा मेसेज आला.. ‘काही दिवसांपूर्वी सर घरात पडले, घोले रस्त्यावरील हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आहे. आयसीयू मध्ये आहेत..’ हे वाचून मला धक्काच बसला..
..काल दुपारी परांजपे सरांच्या कलाप्रवासाने पूर्णविराम गाठला.. दिग्गज चित्रकारांमधील जो एक शेवटचा दुवा होता, तोही निखळला.. दीनानाथ दलालांना, केतकर सर गुरुस्थानी होते.. रघुवीर मुळगावकरांनी, एस.एम. पंडितांना गुरुस्थानी मानलं होतं.. एम.आर. आचरेकरांकडे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी चित्रकार झालेले आहेत.. रवी परांजपे सरांची चित्रशैली ही इतरांपेक्षा खूप वेगळी होती.. अशी ही चालती बोलती विद्यापीठं काळाच्या ओघात नाहीशी झाली.. वास्तव चित्रशैली जपणारी पिढी, हळूहळू नामशेष होत आहे.. नवीन पिढीचा कल, हा वास्तव पेक्षा अमूर्त कलेकडे अधिक आहे.. यातूनही वास्तव कला टिकवायची असेल तर, जुन्या पिढीतल्या पंडित, दलाल, मुळगावकर, परांजपे सरांना कदापिही विसरुन चालणार नाही..
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे.. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत.. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला.. मीही असाच एक…
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे सरांना, ही शब्दफुलांची भावपूर्ण श्रद्धांजली!!!
© सुरेश नावडकर
१२-६-२२
मोबाईल ९७३००३४२८४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈