डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या रुग्ण मी बघत असायची. काहीवेळा, श्रीमंत लोक अत्यंत विचित्र वागताना मी बघितलेत. तर काहीवेळा,अत्यंत निम्न स्तरातले लोक फार मोठ्या मनाचे आढळून आलेलेही बघितले.
माझ्याकडे सरला बाळंतपणासाठी आली. त्याकाळी सोनोग्राफी भारतात आलेली नव्हती. तेव्हाची ही गोष्ट.
आधीच्या दोन मुलीच होत्या सरलाला. यावेळी मुलाच्या आशेने तिसरा चान्स घेतला होता खरा.
पण मग मात्र operation नक्की करायचे ठरवले होते तिने. योग्य वेळी सरला प्रसूत झाली. मी प्रसूती पार पाडून बाळाकडे वळले. मुलगी होती ती. पण दुर्दैवाची गोष्ट, मुलीला डावा हात कोपरापासून नव्हता.
कोपरालाच बोटासारखे दोन विचित्र कोंब होते. मला, आमच्या सर्व स्टाफला अतिशय वाईट वाटले.
सरलाने उत्सुकतेने विचारले, “ बाई काय झाले मला,सांगा ना “
मी म्हटले, “ सरला, सगळे उत्तम आहे. तू आता छान विश्रांती घे हं.उद्या बाळ देणारच आहोत तुझ्या जवळ. “
सरलाने निराशेने मान फिरवली.
दुसऱ्या दिवशी राऊंड घेत असताना सरलाच्या कॉटजवळ गेले तर ती धाय मोकलून रडत होती.
“ अहो डॉक्टर,आता मी काय करू. ही असली अपंग मुलगी कशी सांभाळू मी. देव तरी बघा कसा. देऊन द्यायची ती मुलगी,आणि वर असली अपंग.”
मी तिची खूप समजूत काढली. “ सरला,देवाचीच इच्छा म्हणायचे ग. तू हिलाच आता नीट वाढवायला हवेस.
नशीब समज, ती बाकी ठीक आहे. आणखी कोणते व्यंग नाहीये नशिबाने. अग, फारसे नाही अडणार ग तिचे.
शिकव ना तू तिला सगळे. “
सरला गप्प बसली आणि पाचव्या दिवशी घरी निघून गेली. तिचा नवरा बिचारा खरच समजूतदार होता.
म्हणाला, “ बाई,देवाचे लेकरू म्हणून आम्ही सांभाळू हिला.काय करणार.”
सरलाने मुलीला खंबीरपणे वाढवायचे ठरवले.
तिचे ना कोणी बारसे केले, ना कसला समारंभ. पहिल्या दोघी रुपाली दीपाली म्हणून ही वैशाली. हेही बहिणीच म्हणू लागल्याम्हणून पडले नाव. बहिणी म्हणाल्या,” आई हिला आमच्या शाळेत नको हं घालू . सगळ्या चेष्टा करतील आमची.”
सरलाने चौकशी केली आणि तिला मिशनच्या फुकट असलेल्या शाळेत घातले. निदान तिथे तरी तिला कोणी हसणार नाही, तिच्या व्यंगावर बोट ठेवणार नाही,अशी आशा वाटली सरलाला.
मुलगी चांगली वाढत होती. बुद्धी सुद्धा छान होती तिची. मिशन स्कूलमध्ये उलट ती छान शिकत होती.
इंग्लिश माध्यम असल्याने तिला फायदाच होत होता.
सरला घेऊन यायची तिला माझ्याकडे–कधी औषधासाठी, कधी काही विचारायचे असेल तर–
एकदा मला म्हणाली,” बाई हिला कृत्रिम हात नाही का बसवता येणार हो ?”
मी तिला आमच्या बालरोग तज्ञांकडे पाठवले. ते म्हणाले, “अजून ही खूप लहान आहे. जरा मोठी झाली की करूया आपण प्रयत्न.”
दिवस भरभर पळत होते. मोठ्या बहिणी डिग्री घेऊन लग्न करून गेल्या. त्यांचीही माया होतीच वैशालीवर.
तिला कोणी हसू नये, कुचेष्टा करू नये म्हणून त्याही दक्ष असायच्या. वैशाली समजूतदार होती. आपल्यात काहीतरी कमी आहे, हे त्या लेकराला जणू जन्मापासून माहीत होते.
वैशालीचे त्या हातामुळे कुठेही अडत नव्हते. ती लाटणे हातात धरून छान पोळ्या करायची. त्या बोटासारख्या कोंबाचा उपयोग करून शिवणसुद्धा शिवायची. खरे तर मोठ्या बहिणींपेक्षा वैशाली दिसायलाही खरंच चांगली होती.
वैशाली 10 वी झाली, तेव्हा सरला म्हणाली,” आपण तुला कृत्रिम हात बसवूया का “.
वैशाली म्हणाली, “ नको आई. मी आहे ही अशी आहे। माझे काहीही अडत नाही ग. नको मला तो हात.”
वैशाली बी.कॉम. झाली. सरकारच्या अनुकम्पा तत्वावर तिला सरकारी बँकेत नोकरीही लागली. छान साडी नेसून,डाव्या हातावर पदर घेतलेली वैशाली बघितली की मला कौतुक वाटे तिचे. लक्षात सुद्धा येत नसे की हिला डावा हात पुरा नाहीये. ती भराभर बँकेत काम करत असायची.
नंतर बँकेत कॉम्प्युटर आले. वैशालीला बँकेने training साठी पाठवले. हसतमुख वैशाली,सगळ्या बँकेची लाडकी झाली. क्लायंट पण ती नसली की विचारायचे,`आज वैशाली ताई दिसत नाहीत. मग उद्याच येतो,त्या आल्या की.`
सरलाने वैशालीचे नाव विवाह मंडळात घातले. वैशाली म्हणाली, “ आई मला निर्व्यंग मुलगा नको. व्यंग असलेलाच नवरा बघ, जो मला समजून घेईल, स्वतः जो या भोगातून गेलाय, त्याच्याशीच मी लग्न करीन. नाही मिळाला तर राहीन की अशीच. आई, तुला सांगितले नाही ग कधी, पण शाळेतही खूप भोगलय मी. डबा खायला मुले बोलवायची नाहीत
मला उजव्याच हाताने पाण्याचा ग्लास उचलावा लागतो म्हणून चेष्टा करायची मुले. खरकटे हात लावते मी म्हणून.
माझे पाठांतर किती छान आहे. पण टीचरने मला स्पर्धेत कधीही निवडले नाही. .म्हणूनच जो या सर्वातून गेलाय,असाच जोडीदार मला हवा। “
सरलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
“ किती ग सोसलस माझ्या बाळा. पण मिळेल हो असा समजूतदार मुलगा तुला. देव असतो ग वैशू.”
वैशू खिन्न हसली. म्हणाली, “असता तर त्याला माझा पूर्ण हात का नाही देता आला त्याला “. सरला निरुत्तर झाली.
बँकेत एक दिवस एक आजोबा आले. या मुलीला ते खूप दिवस बघत होते. तिला म्हणाले,” जरा बोलायचे आहे तुझ्याशी. येतेस का लंचअवर मध्ये ? हे बघ,मी तुला गेले खूप महिने बघतोय. तुला अवघड वाटणार नसेल तर
एक विचारू का? माझा नातू खूप हुशार आहे. इंजिनीअर आहे, छान नोकरी आहे त्याला. तो तुला बँकेत येऊन बघून गेलाय. त्याला तू मनापासून आवडली आहेस. हे बघ, या गुणी मुलाला लहान असताना पोलिओ झाला दुर्दैवाने.
वेळीच उपचार केले म्हणून सावरला, पण तरीही, तो एका पायाने लंगडतो. त्याचे काहीही अडत नाही. कार चालवतो, चांगली नोकरीही आहे त्याला. आमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बघ भेट त्याला. तुमच्यावर कोणतीही बळजबरी नाही.”
वैशालीने आईला हे सांगितले. सरलाला तर स्वर्ग ठेंगणा झाला. पुढच्या आठवड्यात आजोबा आणि नातू मनीष वैशालीच्या घरी आले. दोघे अनेक वेळा भेटले बोलले. सहा महिने एकमेकांना भेटल्यावर मगच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अगदी साधे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वैशाली मनीषचे लग्न झाले.
आज वैशाली एका गोंडस मुलीची आई आहे. एकाच मुलीवर तिने ऑपरेशन करून घेतलंय. मुलगी एकदम
अव्यंग, हुशार आणि छान आहे.
आता सांगा,—
देव लग्नगाठी स्वर्गात बांधतो , आणि एक दार बंद असेल तर तो दुसरे उघडतो हे किती खरे आहे न..
©️ डॉ. ज्योती गोडबोले