☆ मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
ती आईला आणि नातवाला भेटायला निघालीय. म्हातारपण लहान मुलासारखं अस तं म्हणून आईला काय खाऊ न्यायचा, नातवाला काय न्यायचा याचा ती विचार करते. आता तीही थकलीय पण दोन्ही ठिकाणी काळजाचे घड होते. त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तिला उत्साह येतोच. नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतर ते गावाजवळ राहत होते। मुलगा नोकरिमित्त शहरात। माहेर जवळच होतं तिथून. आईला भेटून तसंच मुलाकडे जायचं. दोघांनाही काहीतरी न्यायला हवं हे सतत आतून वाटतं. मोकळं जाणं बरं वाटत नाही. विकतचे खाण्याचे पदार्थ घेणे पटत नाही. भले ही भेट महिन्या दोन महिन्यातून का असेना. विकतचे काही नेणं तिला आवडतच नाही. विकत त्याचं ते घेऊ शकतातच की. आपलं माया, प्रेम त्यात उतरणार आहे का?
आईसाठी बिनतिखटाची चार थालीपीठ केली. नातवाला एक घेतल. खजूर आईसाठी तर काजू बदाम नातवासाठी खडीसाखर दोघांना आवडते. रव्याचे लाडू लेकासाठी बेसनाचे सुनेला आवडतात. माहेरी भाऊभवजयीला, भाचरांना लाडू. असा सगळा हिशोब करत तिची आवरा आवरी चाललेली. नवऱ्याचा दोन्ही वेळेचा सैपाक करायचा. उद्यासाठी मदतनि
साला सांगायचं कसा कसा सैपाक कर… नवऱ्याला बजावलं, चारदा जेवण झालं की, नीट झाकून ठेवा। चपतीचा डबा पाण्याच्या ताटात ठेवा, नाहीतर मुंग्यांनी लगेच भरतो। वेळेत गोळी खा आणि तसा मेसेज करा. हे सगळं करुन नऊच्या गाडीने निघायला हवं. नाहीतर गाडी चुकली कीं बारालाच एकदम. तिची घाई चाललेली.
नवऱ्याच्या सूचना ऐकयला लागत होत्याच. परवा लवकर निघ. वगैरे, वगैरे…
तिला आईजवळ दोन दिवस आणि नातवाजवळ चार दिवस राहावं वाटत होतं, पण नवऱ्याला एकटं सोडून नकोही वाटत होतं. ती म्हणायची आपण मुलाजवळच राहू पण नवऱ्याला हे पटत नाही. स्वातंत्र हवं प्रत्येकाला.
एकत्र राहून नाही का मिळत???? कुणाच्या जगण्यात ढवळाढवळ नाही करायची. आपापली कामे करायची.
तिला मात्र एकत्र राहण्यामुळे सुरक्षित वाटतं. तसं एकेकट नाही वाटत. आतापासून सवय लागली एकमेकांची तर पुढे सेवा करतील. तिला मुलांपासून दूर राहणं पटतच नाही. मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या भावना का कळू नयेत???
ती एसटीत बसली तेव्हा तिला विसावा मिळाला. शांतपणे ती डोळे मिटून बसली. काय घेतलं, काय राहिलं तर नाही ना याची मनोमन उजळणी करत असताना तिचं मन भरून आलं. का कुणास ठाऊक तिला रडावस वाटलं. दुःख नाही राग नाही तरी असं का व्हावं????
ती विचार करत असताना जाणवलं, आपली आई असच सगळ करायची. नको म्हटलं तरी ऐकायची नाही. तिचा त्रास बघून रागवायचेही, तरी ती करत राहायची॰ एकदा दिवाळी झाल्यावर आम्ही गेलो होतो आणि तिचे लाडू संपलेले. लेक आली आणि लाडू नाहीत म्हणजे काय….
आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी परतायचे होते. ती पहाटे उठली, जात्यावर डाळ दळली. कारण बेसनही संपले होते। आम्ही उठायच्या आत तिचे लाडू तयार झाले होते. किती वाजता उठली होतीस असं विचारलं तर म्हणाली, झोपले कुठे होते ?…
आत्ता कळू लागलंय ती हे सगळं का करत होती? हे करण्यात तिला केवढी ऊर्जा मिळत होती. कष्टाचं तिला काहीच वाटत नव्हतं. यालाच तर प्रेम माया जिव्हाळा म्हणतात.
हे प्रेम एकत्र राहून नातवाला शिकवायला हवं. सहवासातील प्रेम त्याला नाही मिळालं तर तो माणूसघाणा होईल, असं तिला वाटायचं. पण नवरा ऐकत नाही.
तिला नातवापासून दूर राहावं लागतं. त्यामुळे तिला वाईट वाटतं….
आई फोनसाठी जीव तोडते. सतत फोन कर म्हणते, तेव्हा कळते की आपल्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी जीव किती आसुसलेला असतो.
ही असोशी कशानेही मिटत नाही. नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तीही अशीच व्याकुळ होते. आत्ता तिला आईचं मन कळू लागलंय. ती आजी झाल्यानंतर……
© सौ. सावित्री जगदाळे
१४/२/१९
१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
कथा आवडली.