डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆
नमस्कार. मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे….
रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून….
दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो….
यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ?
होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार….
यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-
हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे.
तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `
आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत….
आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते…
अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत….
`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….”
येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न आम्ही यानिमित्ताने करणार आहोत….
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत….
चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत….
नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच गरज असते….
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन….. त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत…..
Yoga for humanity…. !
ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत….
21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत….
आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…
इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !
आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल….
या निमित्ताने आपण उद्या गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!!
या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….!
निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…!
—क्रमशः भाग पहिला
© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈