सुश्री आसावरी केळकर-वाईकर

परिचय

  • एम. ए. (म्युझिक), SNDT विद्यापीठात प्रथम क्रमांक
  • संगीत अलंकार (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) विशेष योग्यता प्राप्त.
  • एम. कॉम. (अकाउंट्स अँड कॉस्टिंग)
  • PHD student (ABGMVM)
  • सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.
  • गेल्या दहा वर्षांपासून मराठी मासिकांमधे, दिवाळी अंकामध्ये सातत्याने लेखन.
  • पूर्वी शब्दबंध हा कथासंग्रह, गवतूचं गाणं आणि घनिष्ठ मैत्री हे बाल कथासंग्रह व कल्पवृक्ष कन्येसाठी ही काव्यसंवादरुपी पुस्तिका प्रकाशित झाली आहे.
  • गेल्याच महिन्यात निरभ्र  व भूपातला निषाद हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • कालच जाहीर झालेल्या डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथस्पर्धेच्या निकालानुसार ‘ज्याचं त्याला’ ह्या कथेस विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

अर्थातच कविवर्य ग्रेस!

आज अचानक ह्या ओळी सामोऱ्या आल्या आणि नव्यानं भेटल्या! पूर्वी हे वाचल्यावर काय उमटलं होतं मनात आठवत नाही… मात्र आज राधा आणखी खोलवर रुतली…! खरंतर पदोपदी मोहवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या ह्या गोष्टी तरीही सगळ्याचे अर्थ लागणं तितकं सोपं नाही.. पण माणूसपणातला न आवरणारा हाही एक मोह… आपल्या नजरेतून सगळं पाहाण्याचा!.. म्हणून अक्षरं मांडणं अनावर झालं!

राधा स्वतः कृष्णमय होऊन गेली आणि कृष्णाला तिच्याजवळ असण्या-नसण्याचा  पर्यायच तिनं ठेवला नाही… तिनं त्याला कधी स्वतःपासून वेगळं केलं/मानलं नाही आणि ना कधी स्वतः त्याच्यापासून वेगळी झाली… त्यामुळं तिच्याजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडे उरला नाही… म्हणूनच तो तिला पुरून उरला… आजही तो उरलाय तो फक्त राधेसोबत… राधाकृष्ण होऊन!

इतकं अतूटपण निभावणं म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर क्षणोक्षणी चटके सोसत निखाऱ्यावर चालत राहाणं… त्यातला सोपं वाटण्याचा पर्याय विश्वासाशी जोडलेला… अंतरी तो आहेच ह्या अढळ विश्वासाशी… जगण्यातल्या क्षणांत त्याच्या असण्या-नसण्याशी तसूभरही संबंध नसलेला…! अपार मोह पडला तरी हे निभावणं सोपं नाही… पण हे जमलं तर मिळवण्यासारखं काही  उरतच नाही… तोच मोक्ष तीच मुक्ती म्हणजेच ‘राधा’ अनुभवणं!

तुलना मनात उभी राहातेच राहाते… ग्रेस प्रभृतींनीही ह्या रचनेत रूक्मिणी-सत्यभामा आणि राधा ह्यांच्यातलं तुलनात्मक वेगळेपणच इतकं अचूक मांडलंय की वाचताक्षणी राधा नेमकेपणी कडकडून भेटावी… त्यांनी म्हटलंय रुक्मिणी-सत्यभामेला साध्यापेक्षा साधन महत्वाचं वाटलं आणि राधेला साध्य कळलं होतं, तिचं लक्ष फक्त साध्याकडं होतं… फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण… म्हणूनच त्यानं त्यांना साधन दिलं आणि स्वत: राधेला साध्य झाला!

मनात आलं की  रुक्मिणी-सत्यभामेला कृष्णापेक्षा  कृष्णाचं आपल्यावरचं  प्रेम आणि आपला त्याच्यावरचा हक्क जगासमोर सिद्ध होणं जास्त गरजेचं वाटलं आणि राधेनं त्याला ते सिद्ध करून दाखवायचा पर्यायच ठेवला नाही, अर्थात तिला त्याची गरजही भासली नाहीच… कारण तो आपल्याजवळ च असल्याचा तिचा विश्वास!… तसंही आपणच पर्याय निर्माण न करणं किती चांगलं! आपल्याला मिळणार असलेल्या गोष्टीवर आणि ती मिळणारच ह्यावर अतूट विश्वास ठेवणं हा एकच पर्याय, हे एकच ध्येय आणि हा एकच ध्यास… कुठल्या अडथळ्याला मधे येण्याचा पर्यायच उपलब्ध नाही… आणि त्यातूनही काही आलंच आड तरी विश्वासाच्या भक्कम तटबंदीसमोर ते दिसणार नाही आणि टिकणारही नाही!… केवढं प्रचंड आत्मबल, केवढा दुर्दम्य आशावाद आणि किती अर्थपूर्ण जगणं… कृष्णानं राधेला बहाल केलेलं कि राधेनं कृष्णमय होऊन अल्लद ओंजळीत पाडून घेतलेलं!?

सत्यभामा-रुक्मिणीच्या बाबतीत तो लौकिकार्थाने त्यांचा होऊनही त्यांच्याजवळ उरला नाही आणि राधेजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडं नव्हता!… भूल पडते ह्या अशा आयुष्याची… त्याच्याशिवायही त्याच्यासोबत त्याचं होऊन जात जगण्याची आणि खरंतर राधेचं गारूड पसरत जातं मनभर… पण ती स्वतः उरलीच कुठं होती म्हणून मग तिच्या अवघ्या अस्तित्वावरचं त्याचं गारूड आपल्यातही भिनत जातं आणि आपल्या दृष्टीनं सर्वव्यापी ठरतो तो! तसा तो आहेच सर्वसाक्षी, सर्वव्यापी.. पण राधेचा होऊन अंतरी ठसला, तिच्या नेत्रांतून दिसला, तिच्या जाणिवांनी अनुभवला की परिपूर्णतेचं एक वेगळं वलय त्याच्याभोवती तेजाळतं आणि कसलाच किंतू मनात न उरता त्याच्या अस्तित्वाचीच खात्री पटते!

अस्तित्वाची खूण ही अंतरीच पटावी… प्रतिकांतून नाही, दृश्य स्वरूपात नाही! बाह्यरूपात भुलावण होऊ शकते, अंतरी नाही! त्याच्या प्रीतीच्या प्रतिकाचा ध्यास घेतलेल्यांना साधं ते प्रतीकही पूर्णपणे मिळालंच नाही आणि फक्त त्याचा ध्यास घेतलेल्या राधेसोबत तो युगानुयुगे उरलाय! एका दृष्टीनं हाही त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच… ज्याला जे हवं त्याला ते देणारा ‘तो’… राधेला ‘तो’च हवा होता तर फक्त त्या एका जन्मी नाही तर युगानुयुगे तिची साथ निभावणारा!

कुणाची आस धरण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन जाणंच खरं… कारण ती आपली स्वत:ची अनुभूती, कुणावरही अवलंबून नसलेली… हे ढळढळीत सत्य राधा जगली आणि अनंतयुगे त्याच्यासोबत अमर झाली!

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments