सुश्री शुभदा जोशी
मनमंजुषेतून
☆ शोध आनंदाचा…भाग – 5 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆
निखळ, मोकळा आणि अर्थपूर्ण संवाद ही आनंदाची पर्वणीच म्हणायला हवी!
मी एकटी जेव्हा विचार करते तेव्हा एका टप्प्यावर येऊन मला थांबल्यासारखे वाटते. पुढचे दिसत नाही. जेव्हा मी मला काय वाटतं आहे, समजलं आहे ह्या बद्दल मी इतरांशी बोलते तेव्हा माझ्या विचारांमध्ये अगदी वेगळी, अनपेक्षित अशी भर पडू शकते. किंवा माझ्या विचारांमधली तृटी दाखवणारा एखादा मुद्दादेखील हाती लागू शकतो. माझ्या विचारांना चालना मिळते. थांबलेले विचार प्रवाही होतात. अशा देवाणघेवाणीतून, मंथनातून जे आकलन आकार घेते त्याची अनुभूती चकित करणारी असते.
एकाच अनुभवासंदर्भात देखील त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक माणूस हा एकमेवाद्वितीय असतो. त्याचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत, दृष्टीकोन वेगवेगळा असतो. हे वेगळे पण कुठून येते?
माणूस ज्या सामाजिक – सांस्कृतिक परिवेशात वाढतो आणि त्या अनुभवांचा अर्थ तो त्या त्या वेळी कसा लावतो यावर हे वेगळेपण अवलंबून असते. या Cultural Capital बद्दल जेव्हा मी पहिल्यांदा वाचले होते तेव्हा मला बरेच काही उलगडले होते.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे, तो एकटा जगू शकत नाही. इतरांच्या साथीनेच तो समृद्ध बनत जातो. एकमेकांना पूर्ण करणारे हे परस्परावलंबन सर्वांच्याच आयुष्यात आनंद फुलवते.
© सुश्री शुभदा जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈