श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(समोर पिंपळाचा पार होता . त्याभोवती असलेल्या ओट्यावर बसून घरूनच आणलेला डबा अनेक प्रवाशी खायचे. )
इथून पुढे —
बस थांबली की हॉटेलचा हलवाई कढई चा जाळ वाढवायचा तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तो पाण्याचे छिटे मारायचा त्याचा चर्र चर्र आवाज यायचा, तेल गरम झाले की मग भजी तळली जायची, त्याचा गंध परिसरात पसरायचा, बरेच प्रवाशी गरम भजी घ्यायचे हॉटेलात टेबल वर बसून घरची शिदोरी खायचे. मालक कुणालाही विरोध करायचे नाही उलट पाणी पाठवायचे कधी कांदे मिरची द्यायचे. आई मला कधी भजी घेऊन द्यायची. तो कडकं मिशी वाला मालक मला आठवतो लहान मुले असली की जिलबी चा एखादा आडा द्यायचा. मला मात्र दोन आडे द्यायचा. त्यामुळे तो मला अधिक आवडायचा. खाणे पिणे आटोपले की ड्रायव्हर ची वाट पाहात सर्व प्रवासी चर्चेत रंगायचे. एकमेकांची चौकशी केली जायची अनेकाचे नातेवाईक गावचेनिघायचे, जुन्या ओळख्या असल्याप्रमाणे लोक आत्मीयतेने चर्चेत रंगायचे. मदतीची भावना एवढी तीव्र की अनेकांचे अवजड सामान उतरविण्यासाठी लोक बसवर चढायचे. बस लागणाऱ्या लोकांचे कान झापायचे त्यांना पाणी द्यायचे. एखादा प्रवाशी हळूच एखादी गोळी द्यायचा. कुणी आजीबाई पिशवीतून लवंग विलायची काढून द्यायची. तेव्हड्यात कंडक्टर काका जोरजोराने घंटी वाजवायचे. सर्व प्रवाशी धावपळ करीत चढले की ड्रायव्हर काका ला कुणीतरी तंबाखू द्यायचे नी ते चढले की दोनदा टन टन वाजले की बस निघायची. आता बस ची गती थोडी वाढायची कारण पुढे घाट लागायचा व हळूहळू बस चालवावी लागायची त्यामुळे ड्रायव्हर काका गती वाढवायचे,मला मात्र घाट आवडायचा,रस्त्याची वळणे,तीव्र चढ़ाव उतार कुठे समोरुन येनारी वाहने त्याना साइड देतानाची घसाघिस सर्व मजेशिर वाटायाचे. सर्वात आवडणारी बाब म्हणजे पळसाची केसरी फुले, नी बहाव्याची पिवळी फुले त्यांनी बहरलेली झाडे, मध्येच शेळ्या मेंढ्यांच्या कळप हाकनारे आदिवासी, लभान समाजाच्या लोकांचे तांडे दिसायचे. त्यांच्या स्त्रियांचे रंगबिरंगी पेहराव हातातील पांढऱ्या बांगड्या नी कानातील लोंबकळत असलेली कर्णफुले सर्व पाहत रहावेसे वाटायाचे. सर्वात लक्षवेधक असायचे ते डोंगरावरून पडणारे धबधबे नी पाण्याचे वाहणारे ओहोळ. घाट संपला की एका खेड्यात बस थांबायची दुधाच्या खव्यासाठी हे आदिवासी गाव प्रसिद्ध होते तिथूनच शहराला खव्याचा पुरवठा व्हायचा,खव्यामुळे तिथे गुलाबजामुन ही मिठाई विकणारे हॉटेल होते . लोक मनसोक्त आस्वाद घ्यायचे सोबत खवा व गुलाब जामुन पार्सल घ्यायचे. आई मामासाठी हमखास खवा घ्यायची मला मात्र गुलाब जामून खायला मिळायचे. . . .
आणखी एक महत्वाचे म्हणजे बस थांबली की काही आदिवासी स्त्रिया यायच्या त्यांच्या जवळ विकण्यासाठी सीताफळे,आवळे,जांभळं, टेंबर, खीरण्या,येरोण्या,बोर,कवठ असा रानमेवा असायचा लोक कमी पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न करायचे मात्र आई त्यांना योग्य किंमत द्यायची,म्हणायची रानावनात फिरून आणतात बिचाऱ्या दोन पैसे मिळालेच पाहिजे त्यांना. मी मात्र त्या स्त्रियांच्या अंगावर गोंदलेली चित्रे न्याहाळीत असो.
स्पीड बेकरच्या धक्क्याने माझी तंद्री तुटली समोर टोल नाका होता यांत्रिक सुविधेने आपोआप त्याचे पैसे देऊन कार समोर निघाली.
बस आता दहा मिनिटात माझे शहर येणार होते. नवीन महामार्गांने प्रवास सुकर झाला होता. वेळ वाचला होता. पण लहान असतानाच आलेला तो एकही अनुभव आला नाही. सिमेंटचे महामार्ग बनले काळाची गरज म्हणून पण अनेक गोष्टींना पारखे करून. मनात विचार घोळू लागले या महामार्गांमुळे खरंच बरेच मिळविले की बरेच हरपले?
— समाप्त —
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈