डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
एक आटपाट नगर होतं … या नगरात एक चिऊताई राहायची.
गरीब घरातल्या या चिऊताईचं एका कावळ्याशी लग्न झालं …
चिऊताईने कावळ्याशी आनंदाने संसार मांडला…काडी काडी जमवून घरटं बांधलं …. यानंतर काही दिवसांनी चिऊताई आणि कावळ्याला एक मुलगी झाली, त्यांनी तिचं नाव “चिमणी” ठेवलं…. !
पण काळा कावळाच तो…. काही दिवसांनी चिऊताईला आणि या छोट्या चिमणीला सोडून तो पळून गेला… त्याने नावाप्रमाणे तोंड काळं केलं…!
चिऊताईला कळेना, की छोट्या बाळाला…या माझ्या चिमणीला आता खाऊ काय घालायचं ?
बिन बापाच्या या चिमणीला कुणाचा आधार नव्हता…. चिऊताईने तिच्या या बाळाच्या डोक्यावर आपले पंख धरले…. पण तिचे इवलेसे ते पंख अपुरे होते….
छोट्या चिमणीसाठी अन्न शोधायला….चिऊताई काम शोधायला निघाली… वाटेत खूप गिधाडं भेटली…. त्यांनी चिऊताईला हवं तसं “ओरबाडून” घेतलं …! काम कोणीच दिलं नाही आणि केलेल्या कामाचे पैसे सुद्धा !
तिच्या कडून मात्र “मोबदला” घेतला.
सगळे पर्याय संपल्यावर, चिऊताईला भीक मागणे हा पर्याय सोपा वाटला… भीक मागून तान्ह्या चिमणीला तिने वाढवलं …. चिऊताई स्वतः निरक्षर होती…. परंतु शिक्षणाचे महत्त्व जाणून होती…भीक मागून चिऊताईने तिच्या छोट्या चिमणीला शिकवलं… पहिली… दुसरी… तिसरी …. चौथी नव्हे, तर तब्बल बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं…
नोकरी / जॉब असणारे … सिक्युअर्ड पगार असून सुद्धा मुलांना शिकवताना कितीतरी पालकांची तारांबळ उडते….
अशा परिस्थितीत भीक मागून, अनिश्चिततेच्या वातावरणात राहून, या चिऊताईने तिच्या चिमणीला बारावी कॉमर्स पर्यंत शिकवलं….
——महाराजांच्या गडावरील हिरकणीचं आधुनिक रूप होतं हे…. !
तर…. ही छोटी चिमणी आता बारावीपर्यंत पोहोचली…. स्वतंत्र विचार करू लागली….
आईला ती एके दिवशी म्हणाली, “ इतकं शिकवलं आहेस तू…. पण आता मला इथून पुढे ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” मध्ये जायचं आहे…” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन” (BBA) हा बारावी नंतरचा ग्रॅज्युएशनचा कोर्स करायचा आहे मला…”
निरक्षर चिऊताईला तर हे शब्द म्हणतासुद्धा येत नव्हते…
पण चिऊताईला हे जाणवलं…. आपल्या चिमणीची स्वप्नं फार मोठी आहेत…. !
या छोट्या चिमणीला माहीतच नव्हतं, की आपली आई भीक मागून आपल्याला शिकवते आहे….चिऊताईने आपल्या या छोट्या चिमणीला असं कधी जाणवूच दिलं नव्हतं …
चिऊताई च्या मातृत्वाला माझा सलाम ! चिऊताईने स्वतः भीक मागितली….पण मुलीला ते कळूही दिलं नाही…
हीच चिऊताई स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून, पोटच्या पोरीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द देत होती…. तिच्या पंखात बळ भरत होती…
—-आई… आई …. म्हणतात ती हीच असेल का ?
पण …. पोरीला ” बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कोर्स ” करायचा आहे, हे ऐकून चिऊताई हबकली….
एका वर्षाचा खर्च साधारण ३५००० रुपये…. अशी तीन वर्षे….???
कुठनं आणायचे हे पैसे ?
चिमणीचं मन तरी कसं मोडायचं ??
चिमणी आता शिकणार… की… की आपल्यासारखीच भीक मागणार ????
चिऊताईचा रात्र रात्र डोळा लागत नव्हता… नेमकं काय करावं ? चिऊताई चिंतेत होती…. पण चिमणी निश्चिंत होती…. ! आई सर्व काही व्यवस्थित करेल यावर तिचा विश्वास होता…. आईच्या पदराखाली ती सुरक्षित होती….
आईच्या पदराला खिसा नसतो. परंतू जगायला बळकटी देण्याचं सामर्थ्य याच जीर्ण पदरात असतं… जगातील सर्व संपत्ती इथेच दडलेली असते….!!!
तर, चिऊताई चिंतेत होती….
आणि नेमकी याच काळात माझी आणि या चिऊताईची भेट व्हावी…. हा कोणता संकेत असेल ?
चिऊताई एकदा भीक मागताना मला दिसली… तरुण बाई भीक मागते…
माझ्या स्वभावाप्रमाणे मी तिला टोकलं… खोदत गेलो, खणत गेलो ..! यानंतर रडत तिने वरची कहाणी मला सांगितली…. !
मी म्हणालो, “ मी जर तुझ्या चिमणीचं सर्व शिक्षण पूर्ण केलं तर चालेल का तुला ? “
माझ्या या वाक्यानंतर…. शॉक लागावा तशी ती माझ्यापासून दूर झाली ….साशंक चेहऱ्याने आणि कावऱ्या बावऱ्या नजरेने म्हणाली, “ पन या बदल्यात मला तुमाला काय द्यायला लागंल ? “
मी हसत म्हणालो, “ फक्त एक राखी….! “
तिचा विश्वास बसेना…
“ खरं म्हणता काय ??? “ तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.
क्रमशः…
© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈