मनमंजुषेतून
☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
गदिमांचे आपली आई बनुताई यांच्यावर विलक्षण प्रेम होते. आई बनुताई खूप छान ओव्या रचत असत. पपा आपल्या कवितेला आईच्या ओव्यांची दुहिता (लेक) म्हणायचे. ते म्हणत, “आईच्या गीतगंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो.” आईंना दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तोंडपाठ होते. त्या सकाळी तुळशीकट्ट्यावर खूप सुंदर रांगोळी रेखाटत असत.
माझा मुलगा आणि त्यांचा पणतू सुमित्र याच्यावर आईंचे विलक्षण प्रेम होते. त्यांच्यातले अर्धे डाळिंब आवर्जून त्याच्यासाठी राखून ठेवलेले असे. त्याच्या जन्मामुळे त्यांना काशीयात्रेचे पुण्य मिळाले अशी त्यांची भावना होती. मला त्या म्हणायच्या, “किती गुणी पोर आहे ग! असे पोर दररोज एक घरात जन्मले तरी चालेल.” मला या त्यांच्या बोलण्याची खूप गंमत वाटायची.
दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या पंचवटीच्या मागच्या अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत. मग तुळशी कट्ट्यावर बसून आम्हाला पालेभाजी निवडून देत, किंवा ताक घुसळून छान ताजे लोणी काढून देत.
एके दिवशी त्या असच काठी हातात धरून मागच्या अंगणात फेऱ्या मारत होत्या. माझ्या सासूबाई विद्याताई तिथेच व्हरांड्यात चटईवर बसून भाजी चिरून देत होत्या. मी स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत होते.
तो सव्वा वर्षाचा होता त्यावेळी.. आपल्या दोन्ही आज्यांच्या संगतीत सुमित्र आपल्या लाल जीपगाडीत बसून, पायडल न मारता पायांनी ती छोटी जीप चालवत होता.
थोडा वेळ गेला आणि एकदम सुमित्रचे जोरात कळवळणे आणि मोठ्या आवाजात रडणे मला ऐकू आले. मी धावत मागच्या अंगणात गेले….. पपा खोलीत निघून गेले होते.. ताईंनी सुमित्रला जवळ घेतले होते आणि त्या त्याच्या लाल झालेल्या गोऱ्यापान, गोबऱ्या गालांवर हळुवार फुंकर घालत होत्या…. मला काहीच कळेना… नंतर कळले की आई अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत असताना सुमित्र त्याची जीप जोरात चालवत होता आणि अगदी त्यांच्या पायाजवळ नेऊन थांबवत होता… पपांनी त्याला दोनतीनदा सांगितले, “सोन्या, असे करू नकोस.” त्यांचे नेहमी सर्व ऐकणाऱ्या सुमित्रला त्या दिवशी कसला चेव चढला माहिती नाही, त्यांचे न ऐकता तो परत परत तसेच करत राहिला. मग मात्र पपांचा संताप अनावर झाला. अनवधानाने त्यांनी त्याच्या एक जोरात कानशिलात दिली. पपांचे हात जरी गाद्या बसवल्यासारखे मऊ होते तरी मुलांना मारताना मात्र त्यांना खूप लागत.
सुमित्रच्या गोऱ्या, गोबऱ्या गालावर चार बोटे उठली होती…. त्याला जवळ घेऊन मी शांत केले. इतक्या छोट्या नातवाला आपण मारले याचे पपांनाही खूप वाईट वाटले. ते बराच वेळ खोलीत झोपून राहिले. नीट जेवलेही नाहीत.
मी सुमित्रला नंतर समजावून सांगितले की, ‘पपा आजोबांना सांग की मी परत असे करणार नाही.’ त्याला हेही सांगितले की अशी पणजीआजीच्या अंगावर गाडी नेलीस तर चालताना घाबरून तिचा तोल जाऊन ती पडली असती आणि तिला खूप मोठा बाऊ झाला असता. मग मात्र तो घाबरला आणि मला ‘सॉरी’ म्हणाला. पण पपांच्या जवळ जाऊन माफी मागायला काही तयार होईना.
जवळजवळ दिवसभर तो त्यांच्या जवळपासही फिरकला नाही. आडून आडून हळूच पपांकडे बघत होता. संध्याकाळी पपा फिरून आले. आल्या आल्या सुमित्रला जोरात हाक मारली,
“सोन्याss”, तो सगळं विसरून आपल्या लाडक्या आजोबांकडे पळत पळत गेला. त्याला कडेवर घेऊन त्याच्या अस्पष्ट झालेल्या गालांवरच्या वळाची पापी घेऊन पपांनी त्याला कुरवाळले… आणि त्याच्या आवडीचे एक मोठे जेमच्या गोळ्यांचे पाकीट त्याला दिले…
त्याने आपल्या बोबड्या स्वरात पपांना विचारले, “आता पलत मला नाही ना मालनाल? मी अशे कलनाल नाही पलत.”
यावर पपा त्याचा पापा घेऊन मोठ्या प्रेमभराने म्हणाले, “नाही ले माझ्या लाज्या…”
मला त्या दोघांचे प्रेम बघूनच डोळ्यांत अश्रू आले… पपांना कोणीतरी विख्यात ज्योतिषांनी सांगितले होते की, तुम्ही ज्या दिवशी गाडी घ्याल त्या दिवशी तुमच्या आईला गमवाल. खेळण्यातली जीपगाडी पण आपल्या आईला चुकून लागली तर..? हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…
क्रमशः…
– सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈