☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ मंगळसुत्र ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
लग्नात सप्तपदी चालून सातजन्म एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात दोघेजण, तेव्हा खोलवर मनात रुजते ती आपुलकीची, प्रेमाची, आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव. एकमेकांची सुख, दुःख,आता दोघांची होऊन जातातआणि नकळत माझे, तुझे हे आपले होऊन जाते. कोणते ही संकट आले, तर त्याला दोघांनी मिळून सामोरे जाऊन त्या संकटाशी दोन हात करायचे आहेत ह्याची जाणीव होते.
काळ्या मण्यांचा सुरेख दागिना जेव्हा आपला जोडीदार आपल्या गळ्यात बांधतो तेव्हा पावित्र्याची, कर्तव्याची, प्रेमाची जाणीव होते. सगळ्या दागिन्यात हा उठून दिसत असतो. मुहूर्तावर बांधलेला तो मुहूर्त मणी सगळ्या अलंकाराना मागे टाकतो आणि सौभाग्याचे लेणे म्हणून दिमाखात सजतो.
त्याचे पावित्र्य घेऊन जेव्हा नववधू घरचा उंबरठा ओलांडते तेव्हा ती घरची लक्ष्मी म्हणून गृह प्रवेश करते. तांदुळाने भरलेले मापटे जेव्हा ती ओलांडून आत येते तेव्हा माझे हे घर आनंदाने समृद्धीने सुखशांतीने भरून जाऊदे हीच मनोकामना करत असते.
ती ह्या नवीन घरात रूळायचा मनोमन प्रयत्न करत असते. फक्त हे करत असताना तिला साथ हवी असते ती आपल्या जोडीदाराची. त्याने समजून घेण्याची. ज्याच्या विश्वासावर ती आपली सारी माणसे, आपले माहेर मागे सोडून आलेली असते. नवीन घरात नवीन माणसांचे स्वभाव आवडीनिवडी समजून घेण्यासाठी तिला साथ हवी असते आता आपल्या मित्राची. म्हणजेच आपल्या नवर्याची.माझ्या मते जर आपला जोडीदार उत्तम मित्र बनू शकला तरच उत्तम जोडीदार बनू शकतो. नाही तर तिथे पुरुषी अहंकार डोकावतो.
एका गाडीची आता आपण दोन चाक आहोत आणि आपल्याला आता बरोबरीनं जायचे आहे हे जर त्याला उमगले तर खरच सुखी संसार होण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. पण हे त्याला खरच उमगत असते का? का फक्त मणी गळ्यात बांधले म्हणजे आता ती आपल्या मालकीची झाली, आता तिने त्याच्या होला हो म्हणून फक्त चालत रहायचे त्याच्या बरोबर त्याची साथ नसतानाही?
त्या काळ्या मण्यांनां खरा अर्थ तेव्हा मिळतो जेव्हा नवरा आपल्या बायकोला आपल्या बरोबरीचा दर्जा देतो, मान देतो.मान देणे म्हणजे तिच्या प्रतेक म्हणण्याला होला हो करणे नव्हे, पण तिच्याही मनाचा, मतांचा आदर करणे, तिलाही भावनां आहेत ह्याची जाणीव ठेवणे .खांद्याला खांदा लावून जेव्हा दोघ संसाराचा गाडा ओढतात तेव्हा होतो खरा सुखी संसार.
आता नेहमी मला प्रश्न असा पडतो की ह्याची जाणीव खरच नवऱ्याला असते का?का असूनही तो डोळेझाक करतो सोईस्कर रित्या? कित्येक घरं अजूनही अशी आहेत जिथे अजुनी पुरुष प्रधान संस्कृती आहे. मी म्हणीन तेच आणि तसेच, जिथे बायकोच्या भावनांना शुन्य किंमत असते. की एकदा काळे मणी बांधले गळ्यात की तिच्यावर हक्क गाजवायला मोकळा होतो तो ?आपण जे सांगू ते तिने करायचे,तिच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून?
जो हे गळ्यात बांधतो त्याला हीआपली सहचारिणी, अर्धांगिनी आहे ह्याची जाणीव असते का? आता तीची सुख दुःख ही आपली आहेत ह्याची कल्पना असते का?तिच्या भावनांची कदर खरच केली जाते का?
मंगळसूत्र नुसते काळे मणी नसून शक्ति असते तिची. दागिना नसून सौभाग्य असते तिचे. तिचा अभिमान असतो. ज्याच्या जिवावर ती आपले घर, आई, वडील सगळे सोडून आलेली असते ते फक्त त्याच्या विश्वासाच्या आधारावर. हा विश्वास टिकून द्यायचा की नाही हे सर्वस्वी जोडीदाराच्या हातात असते. तस झाल नाही तर तो नुसताच एक दागिना म्हणून गळ्यात राहतो.
एक सामान्य दागिना. फक्त काढता येत नाही म्हणून गळ्यात अडकवलेला.
सहज मनाच्या कोपऱ्यातून?
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
(19.8.2020)
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈