मनमंजुषेतून
☆ समजून घ्या – एक वीज कर्मचारी ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“पाऊस पडला,लाईट गेला !” या विधानाला अर्थ नाही. पाणी आणि वीज यांचा ३६ चा आकडा असतो. नैसर्गिक गोष्टी त्याला अपथ्याच्या असतात. आठ महिने तापलेले इन्सुलेटर्स अचानक पडलेल्या पाण्याने फुटतात. त्याची देखभाल आधी करता येत नाही. हेअर लिकेज डोळ्यांना दिसत नाही. मोठं नुकसान टाळण्यासाठी सुरूवातीच्या काळात मुद्दाम बंद ठेवतात. दिवसेंदिवस बंद ठेवण्यापेक्षा योग्य वेळी बंद ठेवणं योग्य नाही का? जरा समजून घ्या.
सबस्टेशन अक्षरशः विद्युतदाहिनी असते. तिथे जिवंत माणसं काम करत असतात. गमबूट, हँडग्लोव्हज् पावसात सुरक्षेचं काम पाहिजे त्या क्षमतेनं करत नाहीत . ते बिचारे रॉकेल आणि मशाल यांच्यामधे काम करत असतात. सबस्टेशनमधे धुक्याच्या दिवसातली अग्नीवलयं पहा. दिसतात सुंदर, असतात मात्र क्रूर. अनवधानानं, ग्राहकांसाठी घाईत झालेली चूक फक्त मरण देते हे लक्षात घ्या. समजून घ्या.
परमिट मागे दिल्यावर चुकून चालू करताना फिडर बदलला की, लाईनवरचा खाली पडण्याआधी वर जातो. ब्रेकर, आयसोलेटर, फीडर, सीटी, पीटी, डीपी, कंट्रोल केबिन्समधे काम करणं म्हणजे जराशी चूक नि यमाची भूक! हे समजून घ्या.
पावसात सुरुवातीला, शेवटी विजा असतात. पोल विद्युतवाहक असतो आणि लाईनमन त्यावर काम करत असतो. म्हणजे तो चक्क सरणात काम करत असतो. ग्लोव्हज् घालून ग्रीप मिळत नाही, नि काढले तर सुरक्षा मिळत नाही. अशावेळी लाईनमन सुरक्षा बाजूला ठेवताना मी बघितलंय. एबीस्विच काम करत नाही. मग सबस्टेशनला विनंती करावी लागते. ती विनंती मान्य करणं यंत्रचालकाला अडचणीत आणतं. त्यालाही आई, मुलं, बायको, उकाडा, थंडी, भिजणं असतंच. एक क्षण वैधव्य देतो, निपुत्रिक करतो, अनाथ करतो. समजून घ्या.
लाखो प्रकारची, जंगलीपेक्षा बागायती झाडं हीच वीज जायला जास्त कारणीभूत. ती तोडूही द्यायची नाही, तार जोडूही द्यायची नाही, नि वीज हवी, हे कसं चालेल? वीज जाण्याचं जास्त वेळचं कारण अर्थफॉल्ट म्हणजे झाडं आहेत. समजून घ्या.
मूर्ख राजकारण्यांच्या नादी लागून आपण बिलं भरत नाही. मग इंशुलेटर, वायर, नटबोल्ट, फ्यूजखरेदी अशक्य होतं. स्पेअर्सचा तुटवडा– तरी वीजेचा बटवडा करणारा लाईनमन – समजून घ्या.
उन्हाळ्यात मेंटेनन्स करावा, तर आपलाच पंखा, एसी, फ्रीज, टी.व्ही, वॉशिंग मशीन, पंप त्याला परवानगी देत नाही. वीजप्रवाह चालू ठेवून मेंटेनन्स करता येत नाही. आयपीएलची एक ओव्हर बघू शकत नाही, तेव्हा आपण पंख्याखाली आरामखुर्चीत चिडचिड करतो. तेव्हा लाईनमन आणि सबस्टेशनचे ऑपरेटर्स जिवावर उदार असतात– तुम्हाला नंतर पूर्ण सामना दिसावा म्हणून. समजून घ्या.
उन्हाळा सहन होत नाही याचं कारण वीज कर्मचारी असतात का? याचा विचार करा. एखाद्याच्या मरणाबाबत आपण इतके असंवेदनशील का?
फक्त समजून घेऊया. चिडचिड होण्याआधी थांबेल आणि केलेली शिवीगाळ आणि नाराजी करुणाष्टक होईल.
वीज नसताना हे टाईप करतोय, कारण मी समजून घेतलंय. मला भिजत चाललेली कामं महाभारतातल्या संजयासारखी दिसतात. घरात बसून….
–एक वीज कर्मचारी
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈