श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
मनमंजुषेतून
☆ रेडिओ सिलोन…भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)
Source: Radio Ceylon – Wikiwand
या रेडिओचा इतिहासही मोठा गमतीदार आहे. सिलोन म्हणजे आजचे श्रीलंका. भारताच्या दक्षिणेला असलेल्या या देशातही इंग्रजांची सत्ता होती. द्वितीय महायुद्धा्त हिंदमहासागरात नौदलाला संदेशवहनात मदत व्हावी म्हणून ब्रिटिश शासनाने दि. १६ डिसेंबर १९२५ ला कोलंबो येथे सिलोन रेडिओची स्थापना केली . पुढे संन १९४९ ला सिलोनला स्वातंत्र्य मिळाले व सिलोन सरकारला या रेडिओचे हस्तांतरण झाले. पुढचा १९७५ पर्यंतचा काळ या रेडिओने अक्षरशः गाजवला. एकूण बारा भाषेत या रेडिओचे प्रसारण व्हायचे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगला देश ,नेपाल, व जवळपास सर्व दक्षिण आशियाई देशात सिलोन रेडिओची फ्रिक्वेंसी पोहोचत होती. मनोहर महाजन, अमीन सयानी, गोपाळ शर्मा, के .एस. राजा, माई लोईलगम्म ही रेडिओ उदघोषकांची नावे लोकांना परिचित झाली होती. सन १९७२ ला सिलोन रेडिओचे नाव बदलून श्रीलंका झाले व ‘ये श्रीलंका ब्राडकास्टींग कारपोरेशन का विदेश विभाग है” हे वाक्य प्रसारित होऊ लागले. या रेडिओच्या लोकप्रियतेचा कळस म्हणजे, “बिनाका गीतमाला” हा कार्यक्रम होय. बिनाका ही टूथपेस्ट निर्माण करणारी कंपनी होती. नवीन चित्रपटाच्या गीतांच्या रेकॉर्ड (तबकड्या) एच. एम . व्ही. सारख्या कंपन्या निर्माण करायच्या. कोणत्या नवीन चित्रपटांच्या किती रेकॉर्ड विकल्या गेल्या यावरून त्या गीतांची लोकप्रियता ठरविली जायची. व अश्या १३ गीतांची निवड करून हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा.सर्वात लोकप्रिय गीत सर्वात शेवटी लावले जायचे. दर बुधवारला रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण व्हायचे. उदघोषक अमिन सयानी हे या कार्यक्रमाचे आत्मा होते. त्यांची बोलण्याची व सादरीकरणाची पद्धती एवढी लोकप्रिय की पुढे अनेक ऑर्केस्ट्रा उदघोषक त्यांचीच पद्धत वापरायचे. या कार्यक्रमामुळे हिंदी सिनेमाला आपल्या गीतांची लोकप्रियता वाढविण्यात व सोबत प्रेक्षकही वाढविण्यास खूप मदत झाली. पुढे या कार्यक्रमाचे नाव बदलून सिबाका गीतमाला झाले, पण हा कार्यक्रम पुढे बंद झाला. अनेक चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या रेडिओचा उपयोग करीत असत. चित्रपटाचे पंधरा मिनिटांचे रेडिओ प्रोग्राम प्रसारित व्हायचे. त्यात गीतांचे अंश, चित्रपटाचे संवाद आणि कथानकाचा काही भाग यांचा उपयोग करून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित केले जात असे.
असा हा सिलोन रेडिओ सन १९७५ नंतर लोकप्रियतेच्या ओहोटीस लागला. विविध भारतीची स्थापना, त्याची स्पष्ट प्रसारण सेवा, श्रीलंका रेडिओची ढासळलेली आर्थिक स्थिती, टेप रेकॉर्डरची उपलब्धता, दूरचित्रवाणी या सर्व कारणांमुळे रेडिओ श्रीलंका मागे पडली. आज ती केवळ यू ट्यूब पुरती मर्यादित झाली आहे. पण आज साठी सत्तरीच्या वयात असलेली मंडळी रेडिओ सिलोनला कधीही विसरू शकत नाहीत हे तेवढेच सत्य आहे.
— समाप्त —
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈