सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 1 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
(सुश्री शिल्पा मैंदर्गी यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू करत आहोत. धन्यवाद – सम्पादक मंडळ (मराठी))
(हम आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी के ह्रदय से आभारी हैं। उन्होंने हमारे आग्रह पर अपने जीवन की अब तक की लड़ाई पर विमर्श हम सबके साथ श्रृंखलाबद्ध साझा करना स्वीकार किया है। आप हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। हम आदरणीया सौ अंजली गोखले जी के भी आभारी हैं। ई-अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग सम्पादक – हेमन्त बावनकर )
मी अजून लढते आहे
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
मी शिल्पा. शिल्पा मैंदर्गी. ई अभिव्यक्तिच्या साहित्यिकांमध्ये मला सामावून घेतल्या बद्दल सर्व प्रथम हेमंत बावनकर सर, सुहास पंडित सर आणि उज्वला तांईचे मनापासून आभार !
मी जन्मतः पूर्ण अंध नाही. साधारण तिसरी पर्यंत मला धूसर दिसत होते. अगदी लहान असताना आजीला शंका आली आणि माझ्या आईबाबांची डोळ्याच्या डॉक्टरांकडे धाव सुरू झाली. डॉक्टरांनी खूप तपासण्या केल्या. खूप स्पेशलिस्टना दाखवले. पण सर्वांचे म्हणणे एकच होते, ते म्हणजे हिची दृष्टी जाणार.
घरी मी दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर मोठी होत होते. बरोबरीने खेळत होते, दंगा करत होते. जेवढे दिसत होते, तेवढ्यावर माझे सगळे सुरु होते. मला गांभीर्य काही नव्हतेच कारण मला काही समजतच नव्हतेना! मला कमी दिसते, तेही मला कळत नव्हते. सगळ्यांचेच असे असते, असेच मला वाटे. आईच्या बोटाला धरुन शाळेत जायची, यायची त्यामुळे माझ्यात काही कमी आहे असे कधी जाणवले नाही.
तिसरीमध्ये गेल्यापासून माझ्या डोळ्यांची बरीच ऑपरेशन्स झाली. आई बाबा खूप धिराने घेत होते. एकाही ऑपरेशनचा उपयोग झाला नाही. जवळ जवळ ८ – १० ऑपरेशन्स झाली पण काही फरक नाही. मात्र शाळा अभ्यास नियमित सुरु होते. माझे बाबा विद्यामंदिर शाळेमध्ये शिकवत होते. माझ्यावर त्यांचे पूर्ण लक्ष होते. ते मला खूप गोष्टी सांगत. पाचवी मध्ये गेल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.पहिल्या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी सादर केले आणि आश्चर्य म्हणजे मला पहिल्या नंबर चीढाल मिळाली.
अभ्यास, शाळा, वक्तृत्व स्पर्धा, घरी दंगा, डोळ्याचे इलाज सगळेच सुरु होते. दिसणे अंधूक अंधूक होत पूर्ण बंद झाले होते. पण डोळ्या मधून सतत पाणी येत होते. ते थांबवण्याचे ही ऑपरेशन झाले. ते झाले मद्रासला म्हणजे आत्ताच्या चेनईला. डॉक्टरांनी आई बाबा ना आता डोळ्याच्या बाबतीतले सर्व प्रयत्न थांबवायला सांगितले. नाहीतर विनाकारण मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता होती. आई बाबांनी ते मान्य केले आणि माझा अभ्यास, वक्तृत्व इकडे लक्ष द्यायचे ठरवले.
मला घरी अडगळीत टाकले नाही किंवा तेही हताश झाले नाहीत. मला सतत प्रोत्साहित करत राहिले. घरी मी खेळत होते, भांडत होते. दंगा ही करत होते. हिला दिसत नाही, म्हणून माझे फाजील लाडही केले नाहीत.
ऑपरेशन्स झाल्यामुळे माझे डोळे म्हणजे नुसत्या पांढऱ्या खोबण्या झाल्या होत्या. दुसऱ्यांना भयावह दिसू नये म्हणून ऑपरेशन करून बुब्बुळ बसवले. तेही एकाच डोळ्याला बसले. डॉक्टरांनीच मग अथक् प्रयत्नांनी मला कृत्रिम डोळा बनवून दिला. जो मी अजूनही वापरते, काढते, घालते. अर्थात मला त्याचा काहीच उपयोग नाही. माझे डोळे फवत समोरच्या साठी आहेत. त्यांना भिती वाटू नये, त्रास होऊ नये म्हणून. थोडक्यात काय माझे डोळे अर्थात कृत्रिम तुमच्या साठी’, माझ्यासाठी नाहीत बरं !
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
ही लेखमाला सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे.त्यामुळे सर्वांनी वाचावी असे वाटते.त्याबद्दल शिल्पा मैंदर्गी व सौ.अंजली गोखले यांचे आभारच मानले पाहिजेत.कारण आयुष्याला कसे सामोरे जायचे असते हे या मालिकेमुळे समजणार आहे.
शैला नमस्ते , खूप प्रेरणादायी आहे तुझा जीवनप्रवास. लिखाणात सहजता आणि साधेपणा आहे .
अाापल्या खंबीर वाटचालीतून अनेकाना प्रेरणा मिळेल.