सौ. विद्या पराडकर
मनमंजुषेतून
☆ माझिया माहेरा जा – लेखिका – सौ. रेणुका आशिष ओझरकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
~माझ्या जीवनाचे शिल्पकार
लग्न होऊन मी माप ओलांडून सासरी आले. सुखाच्या व आनंदाच्या पायघड्यावरून माझी पावले पडलीत. कालची मुलगी आज सून झाली. मुलगाही एकुलता एक- इंजिनियर- गुणसंपन्न- पती म्हणून मला लाभला.
आई-वडिलांची उणीव भासू न देणारे सासू-सासरे, बहिणीची उणीव भासू न देणारी माझी नणंद या सर्व गोकुळात मी व्यस्त होते.
मला तीन भाऊ व मी शेंडेफळ, अत्यंत लाडात वाढलेली जणू लाडू बाई. माझ्या संसारात मी पूर्णपणे रमले होते. पण म्हणतात ना कळीचे फूल कधी झाले, वेलीला वृक्षाचा आधार केव्हा मिळाला, हे सर्व स्वप्नाप्रमाणे घडले.
मनपाखरू क्षणार्धात भूतकाळात विहार करावयास लागले—–
माझे माहेर नागपूरचे. टुमदार व सुंदर माझे घर. समोरचे मोठे अंगण, त्या अंगणात तुळशी वृंदावन, सुरेख व सुबक रांगोळी सजलेली समोरील बाजू, स्वागत करण्याकरता फाटकाच्या दोन्ही बाजूला जाईचा नाजुक वेल, थोडं पुढे गेल्यावर गुलाब व शेवंती वाऱ्यावर नाचत असताना दिसतात. मागे पेरू व सिताफळाचे झाड, परसदारी आळू कोथिंबीर खेळत असतात. गोड पाण्याची विहीर मुक्तहस्ताने सर्वांची तृष्णा तृप्त करीत होती . आम्ही वरच्या मजल्यावर रहायचो. खाली माझे आजोळ होते.
माझे आई बाबा दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे आम्ही भावंडे आजीच्या अंगाखांद्यावर खेळून शैशवातून बालपणात आलो. आमचे बालपण मामी व मावशीचे बोट धरून संपन्न झाले. माझे व्यक्तिमत्व घडविणारे जणू हे तीन खांब होते. चौथा खांब माझे आई-वडील त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता देऊन आकार देण्याचाही प्रयत्न केला. उत्तम संस्कार करून विद्या विनय संस्कार यांनी संपन्न केले. मला सर्वांग सुंदर बनवण्याकरता शास्त्र व कला यांचा सुंदर संगम माझ्यात केला. मी गायन व नृत्य शिकले.
नृत्याच्या बाबतीतला एक अविस्मरणीय प्रसंग व आठवण तुम्हाला सांगते. माझे नृत्य –शाळेतर्फे पहिला वहिला नृत्याचा कार्यक्रम झाला व त्याला प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला. अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस घेतले तो क्षण व आईला मारलेली मिठी तो क्षण अविस्मरणीय अजरामर असा आहे.
माझी आईही विद्यार्थीप्रिय अध्यापिका होती. ती माझ्या आयुष्याची बॅकबोन आहे .तिने मला अभ्यास निरनिराळ्या अध्यापन पद्धतीने शिकविला. माझी आई एक प्रतिभावंत लेखिका व कवयित्री आहे .तिच्याच प्रेरणेमुळे माझ्यात लेखनाचा गुण आला असावा .मी नवव्या वर्गात असताना ‘क्रिकेट’ वर व एका अध्यात्मिक विषयावर कविता केली .सर्व लोक अचंबित झाले त्या कविता वाचून. लेखनाची सवय मला तिच्या motivation मुळे लागली.
माझे बाबा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकवले. माझ्या आई-बाबांनी माझ्यावर उत्तम संस्कार करून उत्तम माणसाची प्रेरणा केली .माझे आई-बाबा व आजोळ म्हणजे माझ्या संस्काराचे चालतं बोलतं विद्यापीठच जणू ! माझ्या शैक्षणिक बाजूकडे तर त्यांचे लक्ष होते पण मला सोशल बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
मी सुद्धा आज उत्तम शिक्षिका आहे अध्यापनाच्या विविध पद्धती मला ज्ञात आहे .माझ्या कर्तव्यात पूर्णपणे मी devoted आहे .हे सर्व माझ्या आईने motivation केले म्हणून शक्य झाले. जणू काही ही सर्व माहेरची मंडळी माझ्या जीवनाचे शिल्पकारच नव्हे का ?
माझ्या माहेरची आठवणींची दृश्य, त्याची चित्रफित माझ्या डोळ्यासमोरुन अखंडपणे जात होती . किती वेळ झाला तरी मी भूतकाळाच्या हिंदोळ्यावर बसून झोके घेत होती. तेवढ्यात मला माझ्या मुलीची हाक ऐकू आली. एकदम मी वर्तमानात आले. या सर्व व्यक्ती व आठवणी हृदयाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवल्या होत्या, त्यांना आज संधी मिळाली.
लेखिका :- सौ. रेणुका आशिष ओझरकर (पूर्वाश्रमीची रेणुका वसंत पराडकर )
Mobile no. 9372912230
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈