श्री उद्धव भयवाळ
☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीचा महिमा. … ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
भक्ती म्हणजे काय? केवळ देव देव करणे म्हणजे भक्ती नव्हे. देवावरील प्रेम म्हणजे भक्ती. संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर,
भक्ती ते कठीण । सुळावरची पोळी
निवडी तो बळी । विरळाशू
वेदपुराणात आपण बघितले की, धाडसी व्यक्तीनेच भक्ती केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. त्याचे वडील हिरण्यकाश्यपू यांना देवही घाबरायचे. अशा भक्त प्रल्हादाने भगवान श्री विष्णूंची भक्ती केली. त्याने आपल्या वडिलांना पटवून सांगितले की, भक्ती काय असते.
भक्ती आणि व्यवहारातील लौकिक प्रेम यांतील फरक असा :- लौकिक प्रेम हे सापेक्ष, सहेतुक, दुतर्फी व कार्य-कारणांनी युक्त असते. भक्ती ही मात्र निरपेक्ष, निर्हेतुक, व अखंड असते. प्रेमाची पराकाष्ठा हीच भक्ति. नारायणास /देवास आवडेल तेच करणे हेच त्याचेवरचे प्रेम होय. भगवंताचे प्रेम अखंड हवे.
देवाच्या नामाचा प्रेमाने उच्चार म्हणजे भक्ती. देवाला स्मरणे हीच भक्ती. एका दृष्टीने भक्ती ही सोपी तर एका प्रकारे ती कठिण आहे. जीवनातील सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी भक्तीचे नऊ प्रकार आहेत. त्यांना नवविधा भक्ती म्हणतात.
भक्तीचे आकर्षण असे आहे की ते भगवंतालाही खेचते. आणि न घडे ते घडते असा अनुभव येतो. प्रभू रामचंद्रही भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांना भुलले. असे भक्तिप्रेमाचे माहात्म्य आहे. भक्ति-भावाचे धन पदरी असले की सुखाला तोटा नाही. भक्तीचे रूपांतर अद्वैतात म्हणजे एका ब्रह्मस्थितीतच होते.
भक्तीचा हिशोब करता येत नाही. भक्ती कधी कमी-अधिक होत नाही.
व्यवहारात काय, परमार्थात काय सदा चैतन्याचे स्मरण असावयास हवे. आपली वृत्ति चैतन्याकडे वळविणे हीच भक्ती. चैतन्याशी तादात्म्यस्थिति हीच भक्ती. चैतन्याचे द्वारा चैतन्याशी तादात्म्य होऊन चैतन्याची अनुभूति घेणे हीच निखळ भक्ती आहे. चिद्वायूचे लहरीकडे व लहरीचे वायूकडे आकर्षण हीच शुद्ध भक्ती किंवा भक्तिप्रेम. भक्ती जीवास सुख प्राप्त करून देणारे उत्तम रसायन आहे.
‘भक्त’ या शब्दात मोठी गंमत आहे. मुळात भक्त म्हणजे काय? तर जो विभक्त नाही. ‘विभक्त’ म्हणजे ‘डिपार्टेड’ म्हणजेच दूर गेलेला, तर ‘भक्त’ याचा अर्थ एकरूप झालेला असा होतो. अर्थात भक्ती म्हणजे एकरुप होण्याची प्रक्रिया. एकरुप होण्याकरता जवळ येण्याची गरज असते किंवा जवळ येणं ही एकरुप होण्याची पहिली पायरी समजू. अर्थात हे ‘जवळ येणं’ म्हणजे काय? तर अंतर नाहीसं करणं. हे अंतर दोन प्रकारचं असतं. एक जे डोळ्यांना दिसतं, ज्याला ‘फिजिकल डिस्टन्स’ असं म्हणतात.
देवळासमोरच्या रांगेतला शेवटच्या टोकाचा माणूस आणि गाभाऱ्यातली मूर्ती यांच्यात अंतर आहे. रांग संपली, तो गाभाऱ्यात पोहोचला. शारीरिक अंतर कमी झालं. पण आंतरिक अंतर? ज्याला आपण ‘इनर स्पेस’ म्हणतो, त्याचं काय? रांगेच्या शेवटच्या टोकाला येऊन तो उभा राहिला तेव्हा त्याचं साध्य होतं गाभाऱ्यात पोचण्याचं, देवाला पाहण्याचं. तो त्या टोकाला उभा होता, पण मनाने मात्र गाभाऱ्यात होता. मग रांगेत रमला. तिथल्या लोकांशी रुळला, राजकारणावर चर्चा केली. रांगेतला एकजण त्याचा व्यवसायबंधूच निघाला. मग काय! एक महत्त्वाचा व्यवहार ठरला.. तासाभरात जर बाहेर पडलो, तर आजच हा व्यवहार साध्य होईल. आता तो घड्याळाकडे पाहतो. गाभाऱ्यातल्या देवाला विनवतो, रांग संपू दे! लवकर हा व्यवहार, हे ‘डील’ होऊ दे! पाच किलो पेढे देईन!……. साध्य बदललं !!!
मघाशी त्याचं साध्य होतं ‘देव’. आता साध्य आहे ‘व्यवहार’! देव हे फक्त साधन आहे. म्हणजे शरीराने जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचलाय, तेव्हाच मनाने तिथून कित्येक किलोमीटर दूर असलेल्या त्या व्यवहाराच्या ठिकाणी पोहोचलाय. भेट झाली, पण भक्त आणि भगवंताची नाही. कारण भक्त त्यापूर्वीच विभक्त झाला….
प्रेम आणि भक्ती यातलं हेच साम्य आहे. दोन्हीचं अंतिम रूप हे विरघळून जाणं आहे. मीपण टाकल्याशिवाय विरघळता येत नाही.
© श्री उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
email: [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
भक्तीचा महिमा सांगणारा ,भक्तीमार्ग समजून देणारा उपयुक्त लेख.
छाान अर्थ.जो विभक्त नाही तो भक्त. जो स्वत:ला विसरून भक्तिरसात बुडुन गेला अाहे तोच खरा भक्त.