☆ मनमंजुषेतून ☆ झेप ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆
ऑस्ट्रेलियातील एका grandpa ची गोष्ट आहे. हे आजोबा रोज पहाटे समुद्र किनारी फिरायला जात. जाताना हातात एक टोपली असायची. किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे. अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले “Grandpa, हे काय करता?” आजोबा हसले आणि म्हणाले “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो, अगं भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात पण त्यांची चाल मंद असल्याने बिचारे पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अश्याना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.” ही गोष्ट वाचल्यावर वाटले आपल्याही समाजात असे अनेक आजोबा, आजी समाजातील मुलामुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडण्यास मदत करतात. त्यापैकीच ही एक देवी, ” मालती ताई निमोणकर”
नाव जरा अपरिचित वाटले ना? गुजरवाडीत एका उंच ठिकाणी एका आश्रमात राहायच्या. एकदा चैत्रात आम्हा मैत्रिणींना बोलावून हळदी कुंकू केले होते. गुजरवाडीतील पण बायका आल्या होत्या. भजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच ह्या आजी. नागपूर जवळील मध्यप्रदेशातील एका छोट्याश्या गावात राहत होत्या. घरी अत्यंत कडक अश्या चालीरिती. पण सासू सासरे सुधारलेले होते. मॅट्रिक झालेल्या आजीने त्या काळी लग्न झाल्यावर BA केले. घरी खूप राबता होता. अश्या वातावरणात वाढलेल्या मालती ताई वरून पाहता खूप सुखी होत्या. दोन उच्चविद्याविभुषित मुली, उच्चविद्याविभुषित मुलगा, सून, सधन पती, काय नव्हते? परंतु मनातून मात्र त्या समाधानी नव्हत्या.
सर्व जवाबदार्यांतून मुक्त झाल्यावर, लग्नाला ४० वर्षे झाल्यावर त्यांनी घरात एक निर्णय सांगितला. मी हे घर सोडून समाज कार्यासाठी बाहेर पडत आहे. थोडे समाजाचे देणे फेडून पहाते. घरातल्यांनी समजावले, थोडे दटावले पण, म्हणाले, एकदा बाहेर पडलीस तर ह्या गृहस्थाश्रमात पुन्हा येणे नाही.. पण आजी ठाम राहिल्या आणि त्यांच्याच मुशीत घडलेल्या त्यांच्या लेकीने त्यांना पाठिंबा दिला. एके दिवशी ह्या ध्येयाने पछाडून त्या आनंदवनात दाखल झाल्या. साधारण ५९-६० वर्षे वय. पहा, आपल्या घरातली वाटी, भांडी जरी हरवली तरी आपण कासावीस होतो. आजींनी क्षणात आपला भरलेला संसार सोडला. आनंदवनात बाबा व साधना ताईंनी त्यांना आपल्या बराकी जवळच खोली दिली. साधना ताईंचे आणि त्यांचे फार जुळले होते. पण अत्यंत कोमल हृदयाच्या मालतीताई कुष्ठरोग्यांची पीडा पाहून खिन्न होत. माणसाला पुस्तकाप्रमाणे वाचू शकणाऱ्या बाबांच्या डोळ्यांनी हे वाचले आणि त्यांनी डॉ. हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले ह्यांच्या बरोबर काम करण्यास सुचविले. आणि त्या तेथून पुण्यात दाखल झाल्या.
पुण्यात ओंकार ट्रस्ट व डॉ. हर्डीकर ह्या संयुक्त कामात त्या दाखल झाल्या. गुजरवाडीत डॉ. शरयू घोले ह्यांच्या संस्कार वर्गाची धूरा त्या सांभाळू लागल्या. मुले आणि आजी खूपच रमून जात. आणि इथेच पुढे एक निवासी आश्रम सुरु झाला. ‘अनाथ आश्रम’ हा शब्द जरी उच्चारला तरी आजींना आणि त्यांच्या सहकारी मानसी ताई ह्यांना राग येत असे. “अगं, आम्ही नाही का त्यांचे पालक? सनाथच आहेत ही मुले. “शुभम, मयूर अशी ५ व ३ वर्षाची मुले दाखल झाली आणि आजींचे विश्वाचं बदलले. आजींचे व शरयू ताईंचे कार्य वाढू लागले. हळू हळू मुलांची संख्या वाढली. तिथेच त्यांची शाळा सुरु झाली. आजी मुलांची खूप काळजी घेत. हे चालू असतानाच आजी वाडीतील स्रीयांना एकत्र करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवू लागल्या. अनेकांना त्यांचे निवास स्थान हे माहेरंच होते. मी पण त्याचा खूपदा अनुभव घेतला आहे. आजींच्या आश्रमात खूप प्रसन्न वातावरण होते. मुले तर आजींच्या भोवती सतत लुडबुडत असायची. मुलांसाठी आजींचा शब्द म्हणजे ‘वेद वाक्य’ होते. एक राम नावाचा छोटा तर म्हणायचा “मी मोठा होणार, खूप शिकणार आणि आजीला सोन्याची पैठणी आणणार.”
एक प्रसंग आठवतो! काही मुले अवती भोवती च्या परिसरात गवत काढायला गेली. रविवार होता, १-२ वाजे पर्यंत काम करून ती जेवायला आली. माझा ३ ला गणिताचा तास होता. मीही पोहोचले. तर काय! आजी सर्वांच्या हाताला तेल लावत होत्या. मी विचारले “काय झाले?” “अगं, गवत काढताना हाताला चरे पडलेत ना म्हणून मी तेल लावत आहे.” असे होते ते आजी-नातवांचे नाते. माझ्या तर डोळ्यात पाणीच आले. अनेक वर्ष ही माउली तिथे काम करत होती पण त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या दोन्ही लेकीने त्यांना नंतर घरी परत आणले. आज त्या ८५ वर्षाच्या आहेत आणि आपल्या लेकीकडे अमेरिकेत ध्यान साधना करत वानप्रस्थाश्रमात मग्न आहेत!
चला येणार का अमेरिकेत ह्या देवीचे दर्शन घ्यायला?
© सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈