मनमंजुषेतून
☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆
माझ्या वडिलांचे वय आता ८० च्या जवळपास आहे. त्यांना पार्किन्सनचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही तोंडातल्या तोंडात येते. चालताना ही वॉकर लागतो. अनेकदा वळताना त्यांचा तोल जातो. कधी कधी ते वॉकर विसरून जातात आणि हळूहळू भिंतीच्या आधाराने चालतात. तोल गेला की पडतात. थोडेफार लागते. मग पुढील दोन तीन तास त्यांना धीर द्यावा लागतो. या गोष्टी खूप सामान्य आहेत हे त्यांच्या मनावर ठसवावे लागते. मनातील भीती कमी झाली की परत पूर्ववत होतात. पण यामुळे आम्हाला कायम त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. बरे आपल्याला कायम घरात राहणे शक्य नसते. त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून दीड दोन तासांसाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना सगळे जवळ द्यायचे आणि आपण आपल्या कामाला जाऊन यायचे.
काका ( मी वडिलांना ‘काका’ म्हणतो ) दुपारी टीव्ही लावतात आणि बसल्या बसल्या झोपून घेतात. त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मग त्यावेळी आपण काम करताना एकीकडे जुने गाणे लावले की ते खुश. कधी कधी त्यांचे जुने किस्से सांगत बसतात. अनेकदा तर त्यांचे बोलणे आपल्याला समजत नाही. मग आपण फक्त होकार द्यायचा. आपल्या चेहऱ्यावरून त्यांना लगेच समजते, आपल्याला त्यांचे बोलणे काहीच कळलेले नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते.
त्यांचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे. अजूनही ते त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील ते सगळे काम करतात. रात्रीचे जेवण झाल्यावर ओट्यावर जितके कप असतील ते विसळून ठेवतात. काही निवडायचे असेल तर निवडत बसतात. ओटा आवरून घेतात. आम्ही त्यांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याशिवाय होत नाही. आम्हीही मग ‘जे करायचे ते करा’ म्हणून मोकळे होतो. कारण ज्यावेळी ते काही काम करतात त्यावेळी खुश असतात. काहींना पटणार नाही पण अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना आपण काम करू दिले नाही तर ते जास्त चिडचिड करतात असा माझा अनुभव आहे. कारण अनेकदा त्यांना असे वाटते की, त्यांचे घरातले महत्व कमी झाल्यामुळेच आपण त्यांना काम करू देत नाही.
मध्यंतरी काकांना acidity चा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यासाठी गोळ्या दिल्या. इतक्या गोळ्या कशा घ्यायच्या म्हणून त्यांनी दोन दिवस पार्किन्सनच्या गोळ्या घेतल्या नाहीत. परिणाम असा झाला की त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. त्यांना कुणी बसलेले दिसायचे. किंवा खालून कुणी खिडकीवर दगड मारताहेत असे वाटायचे. ते दोन दिवस आम्ही जाम घाबरलो होतो. एक दिवस वैतागून मी त्यांना काहीतरी चिडून बोललो. मग काय… फुल झापून काढला त्यांनी मला. संध्याकाळी तायडीचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी लगेच तिलाही सांगितले, ‘मिलिंद आज माझ्यावर चिडला होता.’ मग काय विचारता, तायडीनेही हसत हसत मला कानपिचक्या दिल्या आणि काका खुश.
एक मात्र अगदी खरे आहे, त्यांच्यासाठी जरी आम्हाला कुणाला तरी कायम घरात राहावे लागते, तरीही ते कधीच आम्हाला ‘जबाबदारी’ वाटत नाहीत. उलट आम्हाला त्यांचा “आधार”च वाटतो. याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त काकांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे आजारपण आणि त्यानंतरचे त्रास स्वीकारले आहेत. एकदा का माणसाने समोर येणाऱ्या घटनांचा स्वीकार केला की त्याला फारसा मानसिक त्रास होत नाही. ना त्यांची आमच्या बद्दल काही तक्रार आहे, ना जीवनाबद्दल. अनेकदा आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करतो त्यावेळी शेजारच्यांना वाटते, माझे वडील भाग्यवान आहेत. पण मला वाटते, आम्ही मुलं जास्त भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळाले, जे प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जो पर्यंत आई होती, तिने कायम आम्हाला वागणुकीचे धडे दिले. आणि वडील अजूनही त्यांच्या वागण्यातून ‘सकारात्मक जीवन कसे जगावे’ याचे धडे देत आहेत. मला वाटते, भलेही आपल्याकडे पुरेशा सुविधा नसल्या तरी आपल्याला समजून घेणारे पालक आपल्या सोबत असतील तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही.
लेखिका : श्री मिलिंद जोशी, नाशिक
प्रस्तुती – श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈