मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

आई– नुसता शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम शहारते..उत्साहाची एक वेगळीच लहर संपूर्ण शरीरात तयार होते..निर्मात्याने जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाची काळजी घेणं त्याला शक्य नव्हतं, म्हणूनच की काय…त्याने प्रत्येक प्राणीमात्रासाठी आई निर्माण केली..जी  नवीन जीवाला फक्त जन्म देत नाही तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करते..पालन करते..त्याला सुसंस्कारित करते..

मागे एकदा माझी लेक डिस्कव्हरी चॅनल पहात होती..सिंह शिकार करत होता अन् जिराफ आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी त्या सिंहाचा प्रतिकार करत होते..ते पाहून लेक  मला म्हणाली, ” जिराफाला समजत नसेल का? सिंहापुढे आपलं काय चालणार नाही..निदान स्वतः चा तर जीव वाचवायचा..” मी फक्त एव्हढंच म्हणाले,” बाळा, आता ती फक्त आई आहे..जिला आपल्या पिल्लाला वाचवायचं आहे..” 

आई..मग ती कोणाचीही असो..जेव्हा तिच्या बाळावर एखादं संकट येतं तेव्हा ती सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करते..फक्त आपल्या बाळासाठी..आई..ही शेवटच्या श्वासापर्यंत  आईच रहाते..पिल्लू मात्र आपल्या भूमिका बदलत जाते..माझी आईही अगदी अशीच आणि मीही भाग्यवान आहे आज मीही एक आई आहे..”आई म्हणायचीच, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा समजेल आई काय असते “. खरंच …आईपण मिळणं हे भाग्यच..

माझ्या प्रत्येक कणावर—आयुष्यातील प्रत्येक क्षणावर— जिच्या संस्काराचा पगडा .. ती माझी आई..माझी सगळ्यात जवळची मैत्रीण..जिच्यामुळे मी आज माणूस  म्हणून आपल्या मातीशी एकरूप झाले आहे..ती माझी आई…विजया.

नावाप्रमाणेच आयुष्यातील प्रत्येक संकटाशी झगडत..त्या त्या क्षणी न डगमगता प्रत्येक संकटावर ती मात करत गेली अन् माणूस म्हणून आम्हाला घडवत गेली. मला अन् दादाला वाढवताना रोज कळतनकळत कधी गोष्टीतून तर कधी स्वतः च्या कामातून..कधी घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करून..कधी इतिहासातून…  तिने आमच्यावर जे संस्कार केले..त्यामुळेच आज मी व माझा दादा जीवनाचा आनंद घेत आयुष्य कसे जगायचे? ..माणसं कशी जोडायची?..पैशापेक्षा माणूस का महत्वाचा?..हे शिकलो..आज माझा दादा उत्तम डॉक्टर आहे..मी प्राथमिक शिक्षिका आहे केवळ आईवडिलांच्यामुळे..

आजही जेव्हा वयाच्या ६६व्या वर्षीही तिच्यातील उत्साह..चैतन्य पाहिलं की वाटतं..कुठून येते तिच्यात ही एनर्जी ?? आणि खळखळून हसणाऱ्या तिला पाहिलं की वाटतं..तिच्यातील आत्मविश्वास..सकारात्मकता .. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..यामुळेच ती वेगळी आहे… अगदी वेगळी .. आयुष्यात इतकी संकटे आली..कित्येक वेळा अगदी एकटी पडली, पण तिच्यातला आत्मविश्वास व सकारात्मकता यामुळेच ती प्रत्येक संकटावर मात करू शकली ..फक्त तिचा चेहरा पाहिला तरी आजही मन प्रफुल्लित होतं..सगळी नकारात्मक भावना दूर पळते अन् मन तिच्या हास्यात आजही गुंतून जातं..आजही आठवतं भाकरी थापताना तिचं अभंग किंवा श्लोक म्हणणं.. स्वयंपाक करताकरता नकळत त्या  रुचकर जेवणात अमृत पेरणं  ..नवीन काही शिकवून जाणं..

माझी आई माध्यमिक शिक्षिका..गणित विषयात तिचा हातखंडा..पण लग्नानंतर शिक्षण घेताना एम .ए .ला इतिहास विषय ठेवल्यामुळे साहजिकच इतिहास विषय शिकवावा लागला..पण तरीही जे असेल ते अतिशय अभ्यासपूर्ण व मनापासून करणं हे तिचं तत्व, जे तिनं निवृत्त होईपर्यंत निभावलं..आज अभिमान वाटतो तिचा जेव्हा तिचे विद्यार्थी अगदी चाळीस /पन्नास वय असलेले, रस्त्यात वाकून नमस्कार करतात..तिची चौकशी करतात..आयुष्यात आणि दुसरं काय हवं..

आज मलाही या लेखातून  तिला सांगायचं आहे ..आज मी जी काही आहे ती फक्त तिच्यामुळेच …तिने दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे……. 

आई म्हणजे चैतन्याने सजलेलं अंगण..

आई म्हणजे देवापुढे शांत तेवणारं निरांजन..

आई असतो घराचा श्वास..

तिच्यामुळेच सगळीकडे देवत्वाचा भास..

लेकरासाठी हळवी,मायाळू, प्रसंगी चंडिकाही बनते ती..

घराला सावरताना कित्येक वार झेलते ती..

चुका पोटात घालून पडता पडता सावरते..

बाळासाठी कितीदा तरी दुःखाचे कढ आवरते..

आई …… आत्मारुपी ईश्वर..

तो ज्याला लाभला….. त्याचे जीवन अमृतमय निरंतर…… 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈