डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! ) इथून पुढे
यानंतर पुढच्या दोन दिवसात मला आणखी चार दिव्यांग तरुण भेटले….
यापैकी दोघांचे टेलरिंगचे व्यवसाय होते…. परंतु कोविड काळात व्यवसाय थांबला… रोजच्या घरखर्चासाठी शिलाई मशीन सुद्धा मातीमोल किमतीने विकाव्या लागल्या…. दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली…!
माणसाने नेहमी झऱ्यासारखं वहात रहावं…. कारण हे वाहणे थांबलं की याच झऱ्याचं डबकं तयार होतं…. झऱ्यावर नेहमी राजहंस येतात…. परंतु डबक्यावर मात्र येतात ते डास आणि घाणेरडे किडे…! …. यांच्याही आयुष्याचं वाहणं थांबलं…. मनामध्ये डबकं साठलं….पुढे अंधार दिसायला लागला…. आणि मग वाईट-साईट विचार या साचलेल्या डबक्यावर घोंघावायला लागले…!
या दोघांनाही शिलाई मशीन द्यायचं आम्ही ठरवलं…!
श्री. जिगरकुमार शहा सर Upleap Social Welfare Foundation या सामाजिक संस्थेत सक्रिय – सन्माननीय सभासद आहेत. या संस्थेमार्फत त्यांनी एक शिलाई मशीन आम्हास मिळवून दिले. …… “अर्ध्यावर फाटलेला डाव या मशीनवर शिवायचं आपण आता ठरवलं आहे …!”
उरलेले इतर दोघे…. एका चाळीत राहतात….घरासमोरच्या बोळातच काही न काही वस्तूंची विक्री करून आपलं कुटुंब चालवत होते…! कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने दोघांचीही घरं हळूहळू लुटून नेली…!
“आमच्या वाईट काळात आमच्याच नातेवाइकांनी आमचे पाय खेचले…. आम्हाला गाळात घातलं “ यातला एक जण डोळ्यातून येणारे अश्रू, पालथ्या मुठीने पुसत म्हणाला होता…
“ दुसऱ्याचं घर लुटायला “पोती” घेऊन येतात ती कसली “नाती” मित्रा ? अशा नात्यांचा विचार करू नकोस इथून पुढे….आणि कायम लक्षात ठेव…. आपले पाय खाली खेचणारे लोक नेहमी आपल्या पायाशीच असतात…. असे लोक फक्त आपल्या पायाशीच घुटमळतात ; परंतु ते कधीही आपल्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत….कारण त्यांची “उंची” तितकी नसते…हातात दम आहे तोवर कुणी पाय खेचले तर विचार करू नकोस…!”
या दोघांनाही विक्रीयोग्य सर्व साहित्य देऊन ” पुन्हा त्यांना पायावर उभं करण्याचं ” आपण ठरवलं आहे…!
…. “अर्ध्यावर मोडलेले संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत…!”
यानंतर माझे सहकारी श्री मंगेश वाघमारे आणि श्री अमोल शेरेकर यांना झटपट आवश्यक त्या सर्व सूचना देऊन …. आम्ही सर्वांनी आपापसात कामे वाटून घेतली…. करावयाची कामे आणि हातात असलेला वेळ यांची सांगड घालता; सर्व बाबी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी १४ एप्रिलला करण्याचे आम्ही ठरवले. माझ्या दोन्ही सहकार्यांनी जीवतोड मेहनत घेऊन दोन दिवसात सर्व घडामोडी जुळवून आणल्या.
१४ एप्रिल रोजी साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्ट पुणे जवळ, या सर्वांना एकत्र बोलावलं…. आणि या सर्व गोष्टी श्री. जिगरकुमार शहा साहेब यांच्या हस्ते या सर्व दिव्यांग व्यक्तींना अर्पण केल्या…!
श्री जिगरकुमार शहा साहेब आणि Upleap Social Welfare Foundation दोहोंचे आम्ही ऋणी आहोत…!
कोणताही समारंभ नाही, कसलाही गाजावाजा नाही …. रस्त्यावर मी, डॉ मनीषा, श्री जिगर कुमार आणि आमची याचक मंडळी…. यांच्या सहवासात हा हृद्य सोहळा पार पडला…! … नाही म्हणायला दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं…. सूर्य आग ओतत होता….पण खरं “तेज” मला या पाचही जणांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं दिसत होतं….! जाताना त्यातला एक जण हात जोडत म्हणाला, “ मनापासून आभारी आहे सर…. आम्ही शून्य झालो होतो….तुम्ही आम्हाला जगण्याची…. उभं राहण्याची परत संधी दिलीत…”
त्याने बोललेल्या या वाक्यावर सहज मनात विचार आला…
प्रत्येक जण शून्यच असतो… पण प्रत्येक शून्याला त्याची स्वतःची एक किंमत असते… या शून्याची किंमत जर आणखी वाढवायची असेल…. तर “कुणीतरी” त्या शून्याच्या शेजारी जाऊन फक्त उभं राहायचं असतं “एक” होऊन…! अशाने त्या शून्याची किंमत तर वाढतेच…. पण किंमत वाढते त्या शेजारी उभ्या राहणाऱ्या “कुणातरी एकची” सुद्धा !!!
या विचारात असतानाच फोन वाजला…. पलीकडून आवाज आला, “अहो सर येताय ना ? आम्ही वाट पाहत आहोत….” मी गोंधळलो…. “कुठे यायचं आहे मी ?“
“अहो सर, आज भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर सरांच्या नावे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे ना ? तिथे आम्ही आपली वाट पाहत आहोत, तुम्हाला आणि डॉ मनीषा दोघांनाही आज पुरस्कार आहे, विसरलात काय, मागे मी फोन केला होता …!”
— ओह…. मी या सर्व गडबडीत हे पूर्ण विसरून गेलो होतो…मी संयोजकांची मनापासून माफी मागून….
सकाळ पासून घडलेल्या सर्व बाबी सांगितल्या…!
संयोजक मनापासून माफ करत म्हणाले…., “ आज खुद्द आदरणीय बाबासाहेब जरी इथे असते, तर ते म्हणाले असते…. ‘ इथे येवून पुरस्कार स्विकारण्यापेक्षा, तिथल्या गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस हो…. मला ते जास्त आवडेल….!’ आदरणीय बाबासाहेबांना जे आवडलं असतं…. असेच आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वागला आहात…. आम्ही तुम्हाला इथे एक पुरस्कार देणार होतो … पण तुम्ही तिथे राहून ५-५ पुरस्कार मिळवले…. अभिनंदन डॉक्टर…!!! “ हे ऐकून, माझ्या डोळ्यात पाणी तरळलं….! आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या…. या “महावीरांच्या” चरणांशी मनोमन आम्ही नतमस्तक झालो…!
यानंतर मग हसणारे पाच चेहरे मनात साठवत…. मी आणि डॉ मनीषा आम्ही गाणं गात निघालो ….
“अर्ध्यावरचा डाव जोडला…. अशी ही गोड कहाणी …!”
— समाप्त —
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈