सौ कल्याणी केळकर बापट
मनमंजुषेतून
☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
साधारणतः एखाद्या गोष्टीचा आपण आधी अभ्यास करतो, ती आत्मसात करतो आणि मग आपण त्या गोष्टीला मानायला लागतो. पण शाळेत असतांना एक बाई जणू छोटासा अभ्यासवर्गच घ्यायच्या. तेव्हा खरतरं स्वाध्याय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल तसं काहीही आधी माहीती नव्हतं.पण तो वर्ग आवडला आणि मग मी माझ्या परीने स्वाध्याय म्हणजे नेमकं काय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दलची माहिती अभ्यासायला सुरवात केली आणि त्या माहितीचा, स्वाध्यायचा आवाका बघून अक्षरशः आवाक झाले.
….खूपदा आपल्याला आपल्यात करायच्या सुधारणा, बदल हे कळत असतात खरं, पण ते म्हणतात नं कळतं पण वळतं नाही ह्यानुसार हे बदल, ह्या सुधारणा अत्यावश्यक असूनही आपण चक्क त्याकडे कानाडोळा करतो. मानवी स्वभावच आहे तो. पण कधीतरी ती वेळ येते आणि आपण आपल्यात ह्या बदलांचं आणि सुधारणांचं बी रोवायला लागतो. हा सकारात्मक बदल आपल्यात खूप चांगलं चिंतन,मनन केल्यानेच होतो हे नक्की. मग ही ऊर्जा आपल्याला अमूलाग्र बदलवते,चांगल्या सुधारणा घडवून आणते.
हे सगळं स्वाध्यायमध्ये पण समजावून सांगितले आहे. १९ ऑक्टोबर– स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. मा. पांडुरंगशास्त्री हे मराठी तत्त्वज्ञ होते, व्यासंगी होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर ‘ मनुष्य गौरव दिन ‘ म्हणून साजरा करतात.आज स्वाध्यायचे लाखो अनुयायी कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये, प्रत्येक राहण्यायोग्य खंडात आढळू शकतात. श्री. आठवले यांचे ” देवाच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व ” हे स्वप्न पूर्ण करणे हे स्वाध्याय परिवाराचे ध्येय आहे.
मा.पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. शास्त्रींनी सरस्वती पाठशाळेत पारंपरिक शिक्षण,संस्कृत व्याकरण, वेदांत,साहित्य, इंग्रजी भाषा साहित्य, ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यांना पुढे रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते.
त्यांनी ग्रंथालयातील सर्व शाखेतील प्रमुख लेखकांच्या ग्रंथांचे अध्ययन केले. वेद,उपनिषदे, स्मृती, पुराणे ह्यावर चिंतन,मनन केले. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा, म्हणजे थोडक्यात जीवन जगणे, जीवनाची आराधना करणे व जीवनावर खोल विचार करणे, ह्याचा प्रामुख्याने पुरस्कार केला.ह्या व्यासंगी व्यक्तीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमण्यम म्हणाले ‘ विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत.” खरचं किती अभिमानास्पद कर्तृत्व नं.
….अनुभवांच्या जोरावर मा.आठवले न्यायव्याकरणशास्त्रात व इंग्रजी भाषेत निष्णात झाले. वयाच्या २२ व्या वर्षी ते दादाजी भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावरून रोज सायंकाळी भगवद्गीतेवर व रविवारी सकाळी सकाळी भारतीय परंपरेतील विविध दर्शनांवर व इतर विचारप्रणालींवर तरूणांचे अभ्यासवर्गही घेऊ लागले. दिवसभरातील मधला वेळ ते एशियाटीक सोसायटीच्या ग्रंथालयात आधुनिक मानव्य विद्यांवरील ग्रंथांचे वाचन करू लागले. त्याच बरोवर शरीरशास्त्राचाही अभ्यास केला. हा अध्ययन-अध्यापनाचा क्रम सततच चालू होता. जपानमध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांना जाण्याचा योग आला. या परिषदेतील ‘अवतारवाद ’ व ‘ सामाजिक शक्ती-भक्ती ‘ या विषयांवरील त्यांचे प्रतिपादन अत्यंत प्रभावी ठरले. डॉ. कॉम्प्टन या नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थ वैज्ञानिकाने भरघोस आर्थिक प्रलोभनांसह अमेरिकेच्या व्याख्यान दौ-याचे दादाजींना आमंत्रण दिले. दादा अंतर्मुख झाले आणि जागतिक किर्ती व प्रचंड पैशांचे प्रलोभन नम्रपणे नाकारून ते मायदेशी परतले.
भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही, तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा हा संदेश देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले हे खरोखरच आदर्श, विचारवंत व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी सामान्य माणसाला स्वतःची ओळख देण्याचं, त्याला उभारी देऊन सक्षम बनविण्याचे उदात्त कार्य पार पाडलं. अंधश्रध्दा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या समाजाला गीता-विचारांची दिशा दाखवणा-या हया स्वाध्याय चळवळीला आणि तिचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांना नुकत्याच झालेल्या जयंती निमित्ताने शतशः प्रणाम.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈