सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
मी अजून लढते आहे
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
माझ्या आई-बाबांना माझ्यावर आलेल्या संकटाची,उद्भवणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आली होती. माझ्यासमोर त्याबद्दल काहीही बोलले जात नसे. इतर भावं डाप्रमाणेच मलाही वागवले जात होते .
शाळेमध्ये सुद्धा माझ्या वागण्यावर खूपच मर्यादा येत होत्या. कितीतरी उणीवा,अर्थात उणीवा असे मी आता म्हणू शकते, त्यावेळी इतके समजत नव्हते. त्या उणिवा म्हणजे लिहिणं नाही. मैत्रिणींचे चेहरे दिसत नव्हते, समोरच्या बाई दिसत नव्हत्या. ग्राउंड वर पळवणे नाही, लंगडी पळती खेळणे नाही. नवीन वस्तू समजत नव्हती. रंग डिझाईन काहीच दिसत नव्हते. अशा कितीतरी मर्यादा होत्या, तरी बाबांनी माझं डोकं वक्तृत्वा मध्ये घातल्यामुळे शाळेमध्ये भाषण करण्याचा मी सपाटाच लावला होत. कितीतरी स्पर्धांमध्ये भाग घेत होते. बरेचदा बक्षीसही मिळे, पण नाही मिळाले तरी वाईट वाटून घ्यायचे नाही, रडायचे तर नाहीच नाही असे मला बाबांनी बजावून ठेवले होते. थोडक्यात काय माझ्या व्यक्तीमत्वा मधली रिकामी जागा वक्तृत्वाने भरून काढली. अजूनही मला नवीन नवीन ऐकण्याचा,ऐकलेले लक्षात ठेवण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचा अतिशय उत्साह आहे च.
साधारण मी तिसरी-चौथीत असताना माझ्या बाबांना प्रोजेक्टर आणि स्लाईड्स बक्षीस मिळाल्या होत्या. त्यावेळी मला पुसट पुसट दिसत होते. म्हणजे पडद्यावरची आकृती थोडे थोडे रंग जे माझ्या मनावर चांगले बिंबवले गेले. त्या स्लाईड्समध्ये भारतातील निरनिराळ्या नृत्य प्रकार यांची माहिती होती. त्यातील नृत्यांगना, त्यांचे छान छान ड्रेस, मस्त मस्त दागिने, आलता लावलेले लाल हात हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आणि मनासमोर चांगलेच उमटले होते. ते नाच बघू न मी घरी गाण्यांवर आपली आपणच नाच करत होते .माझा मी आनंद मिळवत होते. साधारण सहावी मध्ये मला मिरजेतील विद्या गद्रे यांची मुलगी प्रतिमाही भेटली. ती मला गाण्यावर नाच शिकवू लागली. म्हणजे आता माझा अभ्यास, वक्तृत्व आणि नृत्य जोमात सुरू झाले. प्रतिमाने माझ्याकडून कटपुतली चा नाच बसवून घेतला होता. तो मला शाळेच्या स्टेजवर करायला मिळाला. सगळ्यांना खूप आवडला .भरपूर टाळ्या मिळाल्या. पण त्यावेळी मी माझ्या बाबांवर खूप रुसले होते, थोडीशी रागावले होते म्हणा ना! कारण नाचाच्या अधिक त्यांनी माझी ओळख अंध शिल्पा अशी करून दिली होती. जे मला अजिबात आवडले नव्हते. मी बाबांशी दोन दिवस अबोला धरला होता. त्यांना ते नंतर समजले .
विशेष म्हणजे मला कशाची पण भीती वाटत नव्हती. घरी बहिणी जसे करतात तसे करायचे असे मी थांब ठरवून ठेवले होते. एखादी गोष्ट आपल्याला करता येत नाही म्हणजे काय?आलेच पाहिजे असाच माझा हट्ट असे. एकदा मी देवासमोर दिवा म्हणजे समयी लावली होती, सगळं हाताने चाचपून. घरी काकांनी ते पाहिलं होतं. घरी मॅगी करून बघण्याची मला हौस. एकदा आई स्वयंपाक घरात नसताना मी एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवलं, मॅगीचा पुडाही काढला. तेवढ्यात आई आली आणि मला धपाटा खावा लागला.
माझ्या सगळ्या वस्तू,पुस्तके,कंपास जिथल्या तिथे जागेवर असायच्या.माझ्या भावाला किंवा बहिणीला ते माहिती होतं,त्यांचं सापडेना झालं की गुपचुप माझा कंपास ते घेऊन जायच,माझ्या लक्षात आल्यावर मात्र मी रागवायची.अर्थात हे सगळं लुटूपुटूच्या असायचं.
सांगलीच्या गांधी वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धा मला अजून आठवतात . पाचवी ते दहावी दरवर्षी मी भाग घेत होते. जवळजवळ पन्नास ते सत्तर मुलं-मुली सायची. दहावीपर्यंत मला नंबर मिळाला नाही. मात्र दहावीला माझं भाषण इतकं सुंदर झालं की त्यांना मला पहिला नंबर द्यावाच लागला.
शाळेपासूनच मला रायटर घेऊन परीक्षा देण्याची सवय लागली होती. दहावी मध्ये वनिता वडेर माझी मैत्रीण होती. अभ्यासामध्ये तिनं मला खूपच मदत केली .सगळं वाचून दाखवाय ची .मी ते लक्षात ठेवायची .दहावीत मला 80 टक्के मार्क्स मिळाले .वनिताला गणितात तेवढे माझ्यापेक्षा सात मार्क्स जास्त होते.
अकरावीमध्ये मी कन्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली. अर्थातच माझ्यासाठी आर्ट्स साईडच बरोबर होती. इथेही मी खूप स्पर्धेमध्ये भाग घेतला .तिथल्या सगळ्या प्राध्यापकांची मी लाडकी होते .सगळ्या मैत्रिणी मला खूप खूप मदत करायच्या .कॉलेजला जाताना एकदा पाऊस सुरू झाला .तर एका मुसलमान मैत्रिणीं ने तिची ओढणी काढू न दिली.
तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण गोड बोललो,की समाजातील सगळ्याच आपल्याला मदत करतात .मलाही आईच्या कामामध्ये मदत करायची खूप इच्छा असायची. भाजी निवडणे, शेंगा सोलणे अशी मदत मी करत होते. माझे असे सहज वागणे बघून शेजार पाजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. मला काम करताना बघून त्यांनाही आश्चर्य वाटे. आपण स्वतः मध्ये मॅग्नेटिक पॉवर निर्माण केली पाहिजे हे मी ठरवलं होतं.
कॉलेजमध्ये मी जे ऐकत होते,ते मनामध्ये टिपून ठेवत होते. सगळे पीरियड्स अटेंड करत होते. त्यामुळे प्राध्यापकही माझ्यावर लक्ष ठेवून होते. माझे एकूण छान चालले होते.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈