??

☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित☆

आज चिवडा करू…. उद्या लाडू…. असं म्हणत दिवाळीआधीच फराळाचं वेळापत्रक बनतं खरं… पण ते सोयीनुसार बदलतही राहतं.  म्हणजे असं, दाणे भाजून झाले नाहीत म्हणून आजचा चिवडा उद्यावर ढकलला जातो आणि भाजणी लवकरच आणली म्हणून परवाची चकली आज होऊनही गेलेली असते. थोडक्यात, हे ‘सवडीचं’ वेळापत्रक असतं… आणि ते सवडीनुसार पाळलं किंवा बदललं जातं!

आता…’आवडीचं’ वेळापत्रक सुरु होतं…. आवडीचे पदार्थ संपण्याचं वेळापत्रक !

सवडीने दिवाळीचा फराळ कोणत्याही क्रमाने बनवला जावो… आवडीने संपण्याचा क्रम आमच्या घरात अगदी निश्चित ठरलेला असतो…. या वेळापत्रकात बदल नाही म्हणजे नाहीच!—-

सर्वात पहिला मान चकलीला ! त्यामुळे, सगळ्यात आधी ती संपलेली असते. “नेहमीपेक्षा जरा जास्तच खुसखुशीत झालीय नै चकली ” असं नेहमीपेक्षा जास्त कौतुक ऐकू आलं की समजावं… चकल्या संपत आल्यात  !

तिच्या पाठोपाठ करंज्या…. !! करतांना सर्वात शेवटी; पण संपताना मात्र या आघाडीवर असतात ! अर्थात, चूक त्यांची नाहीच… चार खाऊन एक आकडा मोजायचा असं ठरवल्यावर दुसरं काय होणार म्हणा..!!

चकल्या आणि करंज्या ही पहिली आघाडी संपल्यानंतरची दुसरी आघाडी बेसन लाडू आणि कडबोळी एकत्रितपणे पार पाडतात. दोनच दिवसात कडबोळ्यांच्या डब्याच्या तळाशी  तेलकट झालेला केविलवाणा टिश्यू पेपर उरलेला असतो आणि बेसन लाडवांच्या डब्यात लाडू वळतांना टोचलेले बेदाणे, दाताखाली खडा आल्यावर जसा बाजूला केला जातो, तशी उपेक्षा झाल्याने निपचित पडून असतात.– थोडक्यात, बिनीचे सर्व शिलेदार गारद झालेले असतात. चिवड्यातले काजू चाणाक्ष नजरांनी टिपलेले असतात. मग शेव-चिवडा, चहा-शंकरपाळे अशा जोड्या, किल्ला काही काळ लढवत ठेवतात.

मानाचे पाच गणपती यात्रेत आपापल्या क्रमाने गेल्यानंतर या आळीचा, त्या गल्लीचा असं करत सगळे सामील होतात तसं .. या क्रमाने फराळाचे मानाचे डबे संपल्यानंतर कुण्या काकूकडचे अनारसे, ताईकडून आलेले चिरोटे वगैरे सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला जातो…

फराळाची ही भाऊगर्दी कमीच होती की काय !!! म्हणून अगदी ठरवून दिवाळीच्या या चार दिवसात, पहिल्या दिवशी नैवेद्याला बासुंदी, पाडव्याला छोले-भटुरे, घरातच एक वाढदिवस म्हणून गुलाबजाम आणि भाऊबीजेला भाऊ कित्येक दिवसांनी येणार म्हणून सूप, स्टार्टर्स, स्वीट, मेन कोर्स आणि डेझर्ट्स असं फाईव्ह कोर्स डिनर झालेलं असतं — आणि ……. 

हा अस्सा रविवार उजाडतो….अस्सा म्हणजे… आजच्यासारखा !!!

“आज मी फक्त मऊभात करणारे ” अशी घोषणा माझ्याकडून केली जाते… आणि सगळ्यांचे चेहेरे गेल्या चार दिवसांपेक्षा जास्त उजळतात ! 

पदार्थांच्या भाऊगर्दीत त्या गरमगरम मऊभाताला आणि त्यावर घेतलेल्या तूप-मेतकुटाला अमृताची चव येते. अगदी सकाळीच विरजलेलं दही आणि डावीकडचं लोणचं या आजच्या मेन्यूला फाईव्ह कोर्स डिनरच्या फाईव्ह स्टार मेन्यूपेक्षा जास्त स्टार दिले जातात… तळलेल्या पदार्थाचा खमंगपणा, मसालेदार फोडणीचा झणझणीत स्वाद, चीझ-बटर-क्रीमचा श्रीमंती थाट, तुपात तळलेल्या आणि साखरेत घोळलेल्या मिष्टान्नाची गोडी, काचेच्या प्लेट मधून आलेल्या डेझर्टची नजाकत… यातलं काही – काही नसतं त्या मऊभातात….. पण आजच्या दिवशी ‘तोच’ हवा असतो.. ‘ फक्त आणि फक्त तोच ‘ हवा असतो…… आणि हवं असतं त्याच्या साधेपणातलं समाधान….. 

–कित्येक दिवस परदेशातल्या झगमगाटात फिरून परत येतांना आपला देश दिसू लागल्यावर मनात असतं ते समाधान…… 

ब्रँडेड कपड्यांच्या दिखाऊपणानंतर एक जुनाच, पण मऊसूत कुर्ता घातल्यावर मिळतं ते समाधान….. 

पुस्तकांचं कपाट आवरतांना अचानक जुनी कवितांची वही मिळाल्यावर मिळतं ते समाधान….. 

सिल्कच्या गर्भरेशमी साड्यांच्या कपाटात आजीच्या साडीची गोधडी दिसल्यावर मिळतं ते समाधान…. 

महागड्या भेटवस्तूंच्या तळाशी आपल्यासाठी कुणीतरी हाती लिहिलेलं शुभेच्छापत्र सापडतं… त्यावेळचं समाधान…

आणि ……. आणि दिवाळीच्या पंचतारांकित मेजवान्यांनंतर रविवारच्या दुपारच्या मऊभाताचं समाधान……. 

खरं तर समाधान शोधावंच लागत नाही… ते आपल्या जवळपासच असतं !—– 

******

लेखक  . : अज्ञात. 

संग्रहिका : सुश्री स्मिता पंडित . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments