श्री सुहास सोहोनी
मनमंजुषेतून
☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
एक आणा तासवाली भाड्याची सायकल घेऊन, तिच्या दांड्यांच्या त्रिकोणाच्यामधून पलिकडच्या पॅडलवर पाय टाकून सायकल चालवतांना कितिदा पडलो असू त्याला काही गणतीच नाही. पडतांना शाळेच्या गणवेशाची खाकी अर्धी चड्डी चेनमध्ये अडकून किती वेळा टरकली होती, ते आता आठवतसुद्धा नाही. पण चड्डी वीतभर फाटल्याचं आईच्या लक्षात आलं की आपली हातभर फाटायची हे बरोब्बर लक्षांत आहे !! शिवाय सायकलीत अडकून वाकडं-तिकडं पडायला व्हायचं. त्या अष्टवक्रावस्थेतले सुरुवातीचे काही क्षण भ्रमिष्टावस्थेत जायचे. नेमकं काय घडलंय हेच कळत नसे. जरा भान आल्यावर आपल्या हातापायांवर खरचटलंय्, ओरखडे आलेत, डोकं आपटलंय् याचा सुगावा लागायचा !! चेनवर आणि तिच्या कांटेवाल्या चाकावर तेलाच्या बुदलीतून ओतलेल्या लिटरभर मशिन ऑइलचे रांगोळीछाप ठसे हातापायावर, कपड्यांवर उमटायचे. आणि खरंच सांगतो, त्या सगळ्याची गंमतच वाटायची आणि पडायची हौस वाढायची.
पुन्हा पुन्हा पडून सुद्धा त्या लहान वयातली सायकल शिकायची जिद्द, चिकाटी वाखाणण्यासारखी होती. पुढे पुढे टांग टाकून शिटेवर बसता यायला लागलं की दिग्विजयी आनंद व्हायचा. वेळेचं भान सुटायचं. दोन दोन तास सायकल चालवली हे भाड्याचे दोन आणे देतांना समजायचं. सुरुवातीला सायकल शिकवणारा शीट धरून मागेमागे धावत यायचा, त्याचा केवढा मोठा आधार वाटायचा. नंतर नंतर तो मधेमधे शीट सोडतो हे लक्षात यायचं आणि आपण आता आदळणार या भीतीने सायकल लटपटं लटपटं धावायला लागायची.
आणि एकदा सायकलवर प्रभुत्व मिळवलं की हात सोडून सायकल चालवणं, दांडीवर एक, शिटेवर एक आणि स्प्रिंगच्या चापामुळे बोचणार्या कॅरियरवर एक, असे तिब्बलशिटचे तीन तीन भिडू एकदम बसून, सर्कशीतले धाडसी प्रयोग करण्याचा आत्मविश्वास वाढीला लागायचा. त्या काळी बहुतेक सगळ्यांकडे हर्क्यूलसची सायकल असायची. काळ्या नाही तर हिरव्या रंगाची. ती विकत घेतांना तिच्यासोबत, धोतरवाल्यांसाठी धोतर पोटरीवर बांधून ठेवणार्या स्टेनलेस् स्टीलच्या नाही तर पितळेच्या क्लिपा मोफ़त मिळायच्या. काही तरी मोफत मिळतंय याचं आकर्षण तेव्हाही होतं ! त्या काळी, म्हणजेच १९५५-६० च्या दरम्यान , माझ्या अटकळीप्रमाणे सायकलची किंमत ३५/४० रुपयांच्या आसपास होती. सायकलला दरमहा आठ आणे – म्हणजे वर्षाचे सहा रुपये म्युनसिपाल्टीचा टॅक्स् होता. तो वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच महिन्यात भरावा लागायचा. त्याचा एक अल्युमिनियमचा बिल्ला मिळायचा. तो हॅंडलजवळच्या ब्रेकच्या ताड्यांना नटबोल्ट असायचे, त्यातल्या एका बोल्टवर फिक्स् केला जायचा. पोलिसांचं लक्ष बिल्ल्यावर असायचं. खरं म्हणजे पोलिस हे काही म्युन्सिपालटीचे नोकर नव्हेत. पण नसलेल्या बिल्ल्यात त्यांना संधी दिसायची. टॅक्स् भरायला उशीर झाला तर तीन रुपये दंड भरून तेवढ्याच पैशात – म्हणजे त्या तीन रुपयात बिल्ला मिळायचा. हे काय गणित होतं ते मला अद्यापही सुटलेलं नाही !! लोक टॅक्स् न भरता दंडच भरायचे ! त्यांना दंडात संधी दिसायची !!
संग्राहक – सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈