☆ मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
घराच्या पल्याड, उसाच्या शेतात, बरीच वर्षे मोर वस्ती करून होते. सकाळी ते मधली भिंत ओलांडून, नारळाच्या बागेत आपल्या कुटुंबकबिल्यासह चारा टिपायला येत. तीनचार लांडोर आणि मोर मात्र एकटाच बापडा! लांडोर, मोराच्या मागे मागे जात. बराच वेळ त्यांचा मुक्तपणे संचार चाले.
साखर झोपेतून जाग येई ती त्यांच्या केकानीच!पुन्हा:निद्राधीन होताहोता उजाडेच. रोज त्यांच्या हालचाली पाहता पाहता, मनात येई, एकदातरी, पिसारा फुलवून तुझे ते मोरपंखी सौंदर्य मला दाखवशील का? आणि तो क्षण एकदा येऊन ठाकला. शेजारच्या अपर्णाने दूरध्वनीवर सांगितले, “अग सुधा, लवकर बाहेर ये!” . मोराने पिसारा फुलवला आहे, आणि मग मागीलदारी जाण्याची धांदल उडाली. मोरपंखी रंगाचा विलोभनीय सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहता पाहता मनाला रंगसुख देत होता. तो पिसारा पाहता मनात आलं, उगाच नाही त्या मोरपंखी पिसाने, श्रीकृष्णाच्या मुकुटावर आढळस्थान मिळवलयं. त्या पिसाऱ्याचा मनोहारी रंग मनाला आनंद देतो. मन जेव्हां आनंदाने फुलून येते, तेंव्हा म्हटले जाते, “बाई, बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला, फुलला!”. काही आठवणी हळूवार मनात डोकावतात, आणि मग त्या अंगावर मोरपीस फिरवल्या सारख्या सुखद वाटतात.
लहानपणी, त्या मोरपंखी रंगाचा ठेवा, पुस्तकाच्या पानात जपून ठेवताना रंगांची ऊब देते. एखादा फकीर आपल्या हातातील मोरपिसांच्या झुपकेदार पंखा धुपाटण्यावर फिरवून ऐख्याद्याच्या डोक्यावर हळूवार फिरवत दुवा देतो. आशा असंख्य प्रसंगात, हे मोरपीस आपल्या रंगानी आणि विलोभनीय रूपाने दिमाखात मिरवीत असते. अशा ह्या बहुरंगी पक्ष्याची आपल्या देशाचा पक्षी म्हणून निवड झाली.
एकेदिवशी नारळाच्या बागेत येणारा मोर संध्याकाळच्या वेळेस चक्क नारळाच्या शेंड्यावर जाऊन बसला. ते पाहून मन चिंतेत पडले. अरे बापरे!आता याला खाली कसे आणायचे. मोर खरंतर पाच फुटाच्यावर उडणारा पक्षी नव्हे. प्राणीमित्राना आता बोलवायला हवे. असे म्हणत सकाळ झाली. मागे उगाचचं मोराच्या काळजीने डोकावले तर हा त्या झाडाच्या शेंड्यावरून गायब!
रोज संध्याकाळी मागे नारळाच्या बागेत डोकावून, निरीक्षणाचा छंदच जडला. एकेदिवशी, या मोराचे झाडावर चढणे, मी चोराला पकडल्यागत, पाहिलेच, हा पठ्या आधी भिंतीवर मग भिंतीवरून लहान नारळाची झावळी, त्यावरून वरची, त्यापुढची
असं करत वरचढून शेंड्याला जात असे, आपले शयनकक्षच नारळाच्या झाडावर करू लागला. त्याच्यामागे लांडोर असत, पण त्या कधी झाडावर चढत नसत. असे
कित्येक दिवस तो मोर झाडाचा व आमचाही सोबती झाला. केका हा जीवनाचा रोजचा भाग झाल्या. मनाला सुखवणारे मोराचे हे रंगीत सुख नंतर, २००५च्या पुरात
वाहूनच गेले. ऊसाची शेतं उजाड झाली. मोरांना बसायला, आपला कुटुंबकबिला जपायला जागाच गेली. मोराने दुसरी सुरक्षित शेत पाहिले असावे. मोराच्या विरहाने मनाचा विरंगुळा हरवला. नारळाची बाग सुनीसुनी झाली. मनात त्या रंगसोहळ्याची
सुखद स्मृती जपत राहिलो.
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈