1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ || मालक ||…भाग 1 – शब्दांकन – श्री उपेंद्र चिंचारे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

(११ नोव्हेंबर : वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. “स्वरमंगेश” ह्या गौरवग्रंथामध्ये “मालक” ह्या शीर्षकाने, सोमवार दिनांक २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! मा. लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं !) ……   

” माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही “, असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या निऱ्या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, ” तू काय हमालाची बायको आहेस का ?”

– आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा साऱ्या  स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !

माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? ” यापुढे पान बंद “, असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, ” जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा. ” !

एक दिवस मालक, खालूनच “माई, माई”, अश्या मोठ्याने हाका मारीत आले. “अहो काय झालं?” मी विचारलं.  पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं. म्हणाले, ” तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय “! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !

माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला ” घाटी ” म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, “अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?” इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुसऱ्याला हसवायचे !

मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभऱ्याची भाजी फार आवडायची. मटण, मासे, कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत. कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, ” काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास का नाही ? नाही तर ये आणि जेवून जा.”

काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, ” खाली पडलेल्या नोटा भिकाऱ्यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये.”

प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्याबरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !

मालकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मीही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे, ” माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन.”

मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.

मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते, तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं, तर भगवं धोतर !

मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, “मुलीच का झाल्या ?” असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलींना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.

– (क्रमशः भाग पहिला ) 

— माई मंगेशकर 

शब्दांकन : श्री उपेंद्र चिंचोरे

ईमेल – chinchoreupendra@yahoo.com 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈